Join us  

गोड खाऊनही वजन वाढणार नाही याची खात्री देणार्‍या या मिठाया, ही घ्या सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 6:29 PM

आरोग्य राखून गोडाची गरज भागवता येते. त्यासाठी कमी उष्मांक असलेल्या मिठाया हा त्यासाठीचा योग्य पर्याय आहे. या मिठाया बाजारात मिळणार नाही. तर आपल्याला आपल्यासाठी घरीच तयार कराव्या लागतील.

ठळक मुद्देबेक्ड रसगुल्ले आरोग्यास हानी न पोहोचवता गोडाची गरज भागवतात. कमी उष्मांकात खीर खाण्याची गरज दलियाची खीर करुन भागवता येते. वजन कमी करणार्‍यांसाठी पनीर खीर ही उपयुक्त आहे.

 आरोग्याचा विचार करुन जेव्हा आहार ठरवण्याची वेळ येते तेव्हा गोड पदार्थांवर आधी फुली मारली जाते. पण अनेकजण तर गोड खाण्याचे इतके रसिक असतात की फक्त त्यासाठी कारणं शोधत असतात. अशा परिस्थितीत गोड खायला न मिळणं हा त्यांच्यासाठी एक प्रकारचा अन्यायच ठरतो. डॉक्टरांच्या मते सतत गोड खाण्याची इच्छा ही आपल्या मेंदूमधे निर्माण होते. ती भागवण्यासाठी साखर घातलेले अती गोड पदार्थ खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चूक आहे. आरोग्य राखून गोडाची गरज भागवता येते. त्यासाठी कमी उष्मांक असलेल्या मिठाया हा त्यासाठीचा योग्य पर्याय आहे. या मिठाया बाजारात मिळणार नाही. तर आपल्याला आपल्यासाठी घरीच तयार कराव्या लागतील.

गोडाची इच्छा पूर्ण करणार्‍या पौष्टिक मिठाया

  • बेक्ड रसगुल्ला-  बाजारात मिळणार्‍या रसगुल्ल्यात 106 उष्मांक असतात. पण बेक्ड रसगुल्ल्यामधे केवळ 27.5 उष्मांक असतात. हा बेक्ड रसगुल्ला बनवण्यास अतिशय सोपा आहे. सगळ्यात आधी रसगुल्ल्याला एक मिनिट पाण्यात ठेवावं. अग ते पाणी टाकून द्यावं. हे असं तीन चार वेळेस करावं. यामुळे रसगुल्ल्यात असलेला साखरेचा पाक निघून जातो. मग मिक्सरच्या भांड्यात पनीर, दूध, शुगर फ्री साखर, केशर हे एकत्र करुन त्याची पेस्ट करावी. एका भांड्यात पाक काढून टाकलेले रसगुल्ले ठेवावेत आणि त्यात ही पेस्ट टाकावी. मग पेस्ट टाकलेले रसगुल्ले ओव्हनमधे 150 डिग्रीवर पाच मिनिटांसाठी ठेवावे. हे बेक्ड रसगुल्ले आरोग्यास हानी न पोहोचवता गोडाची गरज भागवतात.

 

  • दलियाची खीर-  कमी उष्मांकात खीर खाण्याची गरज दलियाची खीर करुन भागवता येते. तांदळाची खीर ज्याप्रकारे तयार केली जाते तशीच दलियाची खीर करतात. फक्त तांदळाच्या ऐवजी दलिय घ्यावा आणि साखरेऐवजी शुगर फ्री मध वापरावं.ही खीर गोडाची आणि पौष्टिकतेची अशी दोहोंची गरज भागवते.
  • भोपळ्याचा हलवा किंवा बर्फी-  भोपळ्यात कमी उष्मांक असतात. त्यामुळे भोपळ्याचा हलवा किंवा बर्फी आरोग्यदायी ठरते. खव्याच्या मिठाईच्या तुलनेत यात कमी उष्मांक असतात. यात खव्याच्या ऐवजी दूध आणि दूध पावडर वापरता येते. तसेच साखरेऐवजी शुगर फ्री साखर घालता येते. याच हलव्याला जास्त आटवून त्याची बर्फी करता येते.

 

  • पनीरची खीर-  वजन कमी करणार्‍यांसाठी पनीर खीर ही उपयुक्त आहे. यासाठी एक लिटर दूध घ्यावं. ते उकळून थोडं आटवून घ्यावं. त्यात 150 ग्रॅम पनीर किसून टाकावं. ते दुधात दोन तीन मिनिटं शिजू द्यावं. मग खीरीत साखर घालवी. साखरेऐवजी गूळ, किंवा मध घातलं तर ही खीर आणखी पौष्टिक होते.