Join us  

 उपवास स्पेशल: बटाट्याची चविष्ट कढी करा, कढीची चव उपवास यादगार करणार हे नक्की!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 1:27 PM

 उपवासाला भगर, थालीपिठ यांच्यासोबत खाण्यास किंवा नुसतीच खाण्यास बटाट्याची कढी करावी. ही कढी करण्यास अत्यंत सोपी आहे. ती इतकी रुचकर लागते की प्रत्येक उपवासाला ही कढी खाण्यची इच्छा नक्की होईल.

ठळक मुद्देया कढीचं वैशिष्ट्य म्हणजे बटाटे आणि शिंगाड्याच्या पिठाची भजी.भजी करण्यासाठी उकडलेले बटाटे हाताने कुस्करावेत.कढीसाठी सैंधव मीठ वापरावं. आणि मिश्रणाला उकळी आल्यावर मगच मीठ घालावं.छायाचित्रं:- गुगल

उपवासाला काय करायचं असा प्रश्न नेहमीच पडतो. कारण डोळ्यासमोर खूपच मर्यादित पर्याय असतात. तेच तेच पदार्थ खाऊनही कंटाळा येतो. पोट नीट भरत नाही. मग गळवटा, चिडचिड, डोकेदुखी असे त्रास होतात. उपवासाला छान उत्साही वाटण्यासाठी पोटातही जरा चविष्ट आणि वेगळ्या चवीचं गेलं की मस्त वाटतं. भगर, थालीपिठ यांच्यासोबत खाण्यास किंवा नुसतीच खाण्यास बटाट्याची कढी करावी. ही कढी करण्यास अत्यंत सोपी आहे. ती इतकी रुचकर लागते की प्रत्येक उपवासाला ही कढी खाण्यची इच्छा नक्की होईल.

बटाट्याची कढी

ही कढी क रण्यासाठी अर्धा किलो उकडलेले बटाटे, दोन छोटे चमचे सैंधव मीठ्, एक पाव चमचा लाल तिखट, अर्धा कप शिंगाड्याचं पीठ, तळणासाठी तेल , अर्धा कप दही, अर्धा चमचा जिरे, 2 सुक्या लाल मिरच्या, एक मोठा चमचा किसलेलं आलं, कोथिंबीर आणि 4 कप पाणी ही सामग्री घ्यावी.

कढी करताना

उपवासाला चालणारी ही बटाट्याची कढी करण्यासाठी आधी बटाटे उकडून ते हातानं कुस्करुन बारीक करुन घ्यावेत. त्यात सैंधव मीठ, तिखट, शिंगाड्याचं पीठ घालून मिश्रण चांगलं एकजीव करावं. थोड्या वेळासाठी ते बाजूला ठेवून द्यावं. नंतर एका कढईत तेल गरम करुन त्यात बटाटा-शिंगाड्याच्या मिश्रणाचे भजी तळून घ्यावीत. ही भजी छान लालसर तळावीत आणि बाजूला ठेवावीत. नंतर एका भांड्यात दही आणि पाणी घालून ते घुसळुन घ्यावं. कढीत थोडं तेल गरम करुन त्यात जीरे, सुक्या लाल मिरच्या घालून परतून घ्याव्यात. नंतर घुसळलेलं दही घालावं.

दही घातल्यानंतर मिश्रण सतत हलवत राहावं. कढीला उकळी आली की कढीत सैंधव मीठ घालावं आणि नंतर तळून ठेवलेली भजी घालवीत. भजी घातल्यानंतर कढी थोडी उकळू द्यावी. ती छान घट्टसर होते. मग गॅस बंद करुन त्यावर कोथिंबीर पेरावी.