Join us  

खिचडी खा फिट राहा! गुजराती पध्दतीची चविष्ट खिचडी  करा, डाएटसाठीही उत्तम, चवीला सरस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 3:53 PM

शरीराला पोषण देण्यासोबतच वजन कमी करण्याचं काम ही गुजराती खिचडी करते. तसेच ही खिचडी खाल्ल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे आहारतज्ज्ञ आठवडयातून एकदा तरी गुजराती खिचडी खाण्याचा सल्ला देतात.

ठळक मुद्देखिचडीतील मूगदाळ हा घटक वजन कमी करण्यास उत्तम घटक मानला जातो. खिचडीने पोट लवकर भरतं आणि दीर्घकाळ भरलेलं राहातं.खिचडी गाईचं तूप टाकून खावी. म्हणजे खिचडीतून ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे चांगले फॅटी अँसिडही शरीरास मिळतात.

वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ हे प्रामुख्याने चवीसाठी म्हणून खाल्ले जातात. पण काही पदार्थ असे आहेत की त्यांचा समावेश आपल्या आहारात आरोग्यासाठी म्हणून करायला हवा. गुजराती खिचडी हा त्यातलाच एक पदार्थ. शरीराला पोषण देण्यासोबतच वजन कमी करण्याचं काम ही गुजराती खिचडी करते. तसेच ही खिचडी खाल्ल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे आहारतज्ज्ञ आठवडयातून एकदा तरी गुजराती खिचडी खाण्याचा सल्ला देतात.

छायाचित्र- गुगल

खिचडी हा तसाही पूर्ण आहार समजला जातो. तांदूळ आणि मुगाची डाळ हे या खिचडीतले दोन मुख्य घटक. कबरेदकं, प्रथिनं, 10 प्रकारचे अमिनो अँसिडस, फायबर हे आरोग्यास आवश्यक घटक एका पदार्थातून मिळण्याचे सोय या खिचडीने होते. खिचडीने पोट लवकर भरतं आणि दीर्घकाळ भरलेलं राहातं. खिचडीतील मूगदाळ हा घटक वजन कमी करण्यास उत्तम घटक मानला जातो. यात प्रथिनांचं प्रमाण खूप आहे. आपल्या आवडीच्या भाज्याही या खिचडीत घातल्या तर खिचडीतील पोषण मूल्यं आणखी वाढतात. अशा प्रकारच्या खिचडीतून जीवनसत्त्वं, खनिजंही मिळतात. गुजराती खिचडी किंवा कोणतीही खिचडी त्यावर गाईचं तूप टाकून खावी. म्हणजे खिचडीतून जसे इतर आरोग्यदायी घटक मिळतात तसेच ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे चांगले फॅटी अँसिडही शरीरास मिळतात. हे घटक शरीरातील बॉडी मास वाढवतात आणि फॅट मास कमी करतात. शिवाय हे दोन घटक शरीरातील मेदपेशींना उर्जेत रुपांतरित होण्यासाठी प्रोत्साहित करतात. गुजराती पध्दतीच्या खिचडीतील या सर्व घटकांमुळे ती पचनास हलकी, आरोग्यास उत्तम आणि वजन कमी करण्यासाठी परिणामकारक ठरते.

छायाचित्र- गुगल

गुजराती खिचडी कशी कराल?

गुजराती पध्दतीची खिचडी ही एकाचवेळी पौष्टिक असते तशीच ती चविष्ट देखील लागते. ही खिचडी बनवणं अतिशय सोपं कम असून ती होतेही अगदी पटकन.गुजराती खिचडी करण्यासाठी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ, तांदूळ आणि मुगाच्या एकूण प्रमाणाच्या दुप्पट-तिप्पट किंवा त्यापेक्षा जरा जास्त पाणी , अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा तेल आणि वरुन खाण्यासाठी साजूक तूप घ्यावं.खिचडी करताना सर्वात आधी डाळ - तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. मंद आचेवर प्रेशर कुकर ठेवावा. त्यात डाळ-तांदूळ , हळद, मीठ आणि पाणी घालावं. कुकरला दोन शिट्या घ्याव्यात. कुकरची वाफ जाण्यासाठी कुकर बाजूला काढून ठेवावा. नंतर एक कढई घ्यावी. कढईत तेल घालून ते गरम करावं. त्यात मोहरी, जिरे घालावेत. ते तडतडले की लसणाच्या पाकळ्या टाकून त्या हलक्याशा लालसर होवू द्याव्यात. नंतर त्यात कढीपत्ता घालावा. तो परतला गेला की लाल तिखट घालून हे सर्व जिन्नस चांगलं परतून घ्यावं. आता खिचडीच्या कुकरमधली वाफ एव्हाना गेलेली असेल. झाकण उघडून त्यातली खिचडी कढईमधल्या फोडणीत घालावी. खिचडी चांगली मिक्स करुन घ्यावी. झाकण ठेवून थोडी वाफवून घ्यावी. वरुन कोथिंबीर पेरावी. ही गरम गरम खिचडी तूप घालून खावी. तोंडाला छान चव आणणारी ही खिचडी वजन कमी करण्यास , शरीर शुध्द करण्यास फार उपयुक्त आहे.ही खिचडी लोणचं, पापड, दही किंवा ताक यांच्यासोबत छान लागते.