Join us  

धोप्याचे फुणके आणि सुकोडे, विदर्भात श्राध्दाला केले जाणारे पारंपरिक पदार्थ, घ्या रेसिपी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 4:00 PM

विदर्भातले हे खास पारंपरिक पदार्थ; ते विस्मरणात जाऊ नयेत, साधे पण पौष्टिक पदार्थ

ठळक मुद्देहे पदार्थ घरोघरी, पारंपरिक रीतीने केले जातात. चवीला उत्तम.

अंजली भाईक

पितृपंधरवाड्यातल्या स्वयंपाकात विदर्भात काही पारंपरिक पदार्थ आवर्जुन केले जातात. त्यापैकी काही पदार्थांच्या या कृती. हे पदार्थ घरोघरी, पारंपरिक रीतीने केले जातात. चवीला उत्तम.त्यातलेच हे दोन पदार्थ धोप्याचे (अळूचे) फुणके आणि सुकोडे.धोप्याचे फुनके हा पदार्थ माझ्या सासुबाई आवर्जून करत तर आईकडे पक्षाला सुकोडे केले जातात.त्यांची ही कृती.

(Image : Google)

धोप्याचे (अळुचे) फुणके

आपण अळुवडी करतो ना जवळपास अगदी तशीच पाककृती आहे ही .प्रथम १ कप बेसन, १/४ कप तांदळाचे पीठ,१/४ कप घरात उपलब्ध असलेलं कुठलंही पीठ.ऊदा. कणिक, ज्वारी,बाजरी ई.एकत्र करून त्यामध्ये अर्धा कप आंबट दही, थोडे तीळ ,ओवा, तिखट,मीठ,हळद.घालुन (आलंलसूण पेस्ट नैवेद्याऐवजी )भजींच्या पीठापेक्षा थोडेसे दाट भिजवावे.आता अळूची चार ते पाच पानं स्वच्छ धुवून देठं वेगळी करावीत. पानांच्या मागील शिरा सुरीने काढून घ्याव्यात.या पानांवर वरील बेसनाचे मिश्रण थोडेथोडे पसरवून त्यावर याचप्रकारे सरळ उलट पाने ठेवुन थर करावा .व हळुवारपणे गुंडाळून पाच ते दहा मिनिटे वाफवून घ्यावे.थंडं झाल्यावर साधारणपणे आपण वड्या कापून तळतो,पण फुणक्यांसाठी वड्या न कापता बारीक तुकडे करावेत किंवा कुसकरून घ्यावेत.आता कढईमध्ये 1/4 कप तेल गरम करून नेहमीप्रमाणे जिरे मोहरी हिंगाची फोडणी करून आवडीप्रमाणे आले मिरचीची पेस्ट,कढीपत्ता व हळद घालून कुसकरलेले मिश्रण वाफवून घ्यावे. चवीला थोडी साखर वापरावी.हा पदार्थ नैवेद्याऐवजी करावयाचा झाल्यास आले लसूण व भरपूर कांदा घालुनसुद्धा झकास लागतो.

(Image : Google)

सुकोडे

होय हेच नाव आहे पदार्थाचं सुकोडे.पक्षाचे दिवशी सकाळीच शुचिर्भूत होऊन उडदाची विनासालाची दाळ भिजत घालायची .वेळ वाचवण्याकरीता उडीदाचे पीठ सुद्धा वापरू शकतो. थोडा चवीत फरक पडतो. भिजलेली डाळ थोडे आंबट दही घालुन वाटून घ्यावी. पीठ असल्यास दही किंवा आंबट ताक घालुन भिजवावे.यामध्ये एक चमचा तीळ, एक चमचा कुटलेले काळे मिरे,अर्धा चमचा आल्याचा किस, व चवीपुरते मीठ घालावे सर्व साहित्य एकत्र मिसळवून भजींप्रमाणे तळावेत. 

(लेखिका विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर येथे सहायक अधीक्षक आहेत.)

टॅग्स :अन्न