प्रतिभा भोजने जामदार
नारळी पौर्णिमा झाली. समुद्राला नारळ अर्पण करुन जशी पूजा केली जाते, तशाच नारळाच्या विविध पाककृतीही बनवून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरे केले जाते. पारंपरिक पदार्थ म्हणजे नारळी भात, ओल्या नारळाच्या करंच्या. आज यालाच जुन्याबरोबर नव्याची जोड देऊन नारळापासून बनवलेली ही खास पाककृती. हा पदार्थ अगदी सोप्या पध्दतीने बनवला आहे.नक्की करुन पहा, कोकोनट पुडिंग.
कोकोनट पुडिंग कसं करायचं?
साहित्य- २ वाट्या दाट असं नारळाचं दूध, पाऊण वाटी साखर, 2 मोठे चमचे कॉर्न फ्लोअरकृती - नारळाच्या दुधात साखर घालून ती विरघळवून घ्यावी, त्यातच कॉर्न फ्लोअर घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. मिश्रण मध्यम गॅस वर ठेवून सतत हलवत रहावे. थोड्या वेळाने ते दाटसर होईल. गॅस मंद करून सतत हलवत रहावे. मिश्रण पळीवाढं होईल इतके दाट झाले की गॅस बंद करून आपल्या आवडीप्रमाणे वाट्या किंवा बाउल मध्ये ओतून थंड होऊ द्यावे. (मिश्रण दाट होत नाही असे वाटले तर थोडं कॉर्न फ्लोअर घालून परत मिक्स करून शिजवावे) थंड झालेल्या पुडिंग च्या वाट्या फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवाव्या. ४-५ तासांनी पुडिंग सेट होईल. वाटी तशीच किंवा प्लेट मध्ये पलटवून खायला घ्यावी. थोडसं डुगडुगित पण एकसंध असं हे कोकोनट पुडिंग डेझर्टचा उत्तम प्रकार आहे.करुन पहा.आणि त्यासाठी हा व्हीडीओ पहा..
(प्रतिभा जामदार यांच्या 'संध्याई किचन' या युट्यूब चॅनलवर कोकोनट पुडिंगसह नारळ भात, नारळ आंबा वडी, नारळ बटाटा वडी, ओल्या नारळाच्या करंज्या, नारळीपाकाचे लाडू यासाठीच्या पाककृतीही पाहता येतील.)