Join us  

डोशासोबत नारळाची चटणी करायला वेळ नाही? या 2 झटकेपट चटण्या करा, डोसाही खुश होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 6:03 PM

डोसे उत्तप्पे यासोबत नारळाची चटणी खातात हे बरोबर, पण नेहेमीच नारळाची चटणी खावी हा काही नियम नाही. दोन प्रकारच्या चटण्यांसोबत डोसा अतिशय चविष्ट लागतो. एक म्हणजे लसणाची चटणी आणि दुसरा प्रकार म्हणजे तुळशीची चटणी.

ठळक मुद्देलसणाची झणकेदार चटणी डोशांसोबत छान लागते.लसणाची चटणी वाटताना आणि वाटल्यानंतरही पाणी घालू नये. डोशासोबत एकदम हटके चटणी खावीशी वाटत असल्यास तुळशीची चटणी करावी.

नवरात्रीचे उपास झाले की काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंच. कधी पावभाजी, कधी मिसळ तर कधी इडली डोसे. डोसे , उत्तप्पे यासोबत चटणी ही लागतेच. पण सतत नारळाची चटणी खाऊनही कंटाळा येतो. चटणीमधे काहीतरी नवीन चव हवी असते पण काय करावं ते सूचत नाही. डोसे उत्तप्पे यासोबत नारळाची चटणी खातात हे बरोबर, पण नेहेमीच नारळाची चटणी खावी हा काही नियम नाही. दोन प्रकारच्या चटण्यांसोबत डोसा अतिशय चविष्ट लागतो. एक म्हणजे लसणाची चटणी आणि दुसरा प्रकार म्हणजे तुळशीची चटणी. या दोन्ही प्रकारच्या चटण्या बनवणं अगदीच सोपं

Image: Google

लसणाची चटणी

लसणाची झणकेदार चटणी डोशांसोबत छान लागते. ती करण्यासाठी 100 ग्रॅम सोललेला लसूण, 25 ग्रॅम सुक्या लाल मिरच्या व्हिनेगरमधे भिजवलेल्या आणि चवीनुसार मीठ एवढीच सामग्री लागते.लसणाची चटणी करताना सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात लसूण, मीठ आणि व्हिनेगरमधे भिजवलेल्या लाल मिरच्या घालाव्यात. हे सर्व एकत्र वाटून घ्यावं. ही चटणी वाटताना शक्यतो पाणी घालू नये. लसणाच्या या चटणीत नंतरही पाणी घालू नये. ही चटणी लसूण, मिरचीचा जेवढा ओलसरपणा असतो तेवढ्या ओलसरपणातच छान लागते. 

Image: Google

तुळशीची चटणी

डोशासोबत एकदम हटके चटणी खावीशी वाटत असल्यास तुळशीची चटणी करावी. तुळशीची चटणी करताना त्यात 150 ग्रॅम तुळशीची पानं, 100 ग्रॅम कोथिंबीर, 200 ग्रॅम कांदा, 250 ग्रॅम सफरचंदाचे तुकडे ( सफरचंदाचे साल काढलेले हवे), 1 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 50 ग्रॅम आलं आणि दोन चमचे चिंचेचा कोळ एवढी सामग्री घ्यावी.तुळशीची चटणी करताना सर्वात आधी तुळशीची पानं धुवून घ्यावीत. मिक्सरच्या एका भांड्यात तुळशीची पानं, कोथिंबीर, कांदा, सरफरचंदाचे तुकडे, हिरवी मिरची, आलं आणि चिंचेचा कोळ घ्यावा. हे सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं. ही चटणी एका भांड्यात काढून फ्रिजमधे ठेवावी. गरम गरम डोशासोबत ही गार चटणी भन्नाट लागते.