Join us  

अनुष्का शर्मा ते आलिया भट फिटनेससाठी खातात चिया सीड्स; या बियांमध्ये असे खास काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 11:36 AM

सब्जा म्हणजे चिया सीडस नाहीत, तर या थोड्या वेगळ्या प्रकारच्या बिया असतात, यामध्ये प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ चे प्रमाण जास्त असते

ठळक मुद्देएकापेक्षा एक अमेझिंग फायदे असणाऱ्या या बिया एकदा खाऊन तर बघाम्हणून अभिनेत्री करतात आहारात या बियांचा समावेश

अमुक केल्यामुळे तुम्ही बारीक व्हाल, तमुक खाल्ल्याने तुमची बॉडी शेपमध्ये राहायला मदत होईल असे आपण नेहमी ऐकत असतो. या बाबतीत आपण अभिनेत्रींना फॉलोही करतो. अमुक एक जण आहारात हे घेते म्हणून मी पण ते ट्राय करणार आहे असे आपण अगदी सहज म्हणून जातो. अभिनेत्री अनुष्का शर्मा, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अभिनेत्री एकदम फीट अँड फाइन आहेत. त्यांच्या फिगरकडे पाहून तरुणींना आपलीही फिगर अशी असावी असे वाटते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी या अभिनेत्री डाएट फॉलो करतात. त्यांच्या या शिस्तबद्धतेमुळेच हे स्टार्स आपले वजन नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी होतात. आता त्या आहारात अशा कोणत्या पदार्थाचा समावेश करतात ज्यामुळे त्या इतक्या स्लीम-ट्रीम आहेत. तर अनुष्का, आलिया आणि सोनाक्षी नियमितपणे चिया सीडसचे सेवन करतात. चिया सीडस म्हणजे काय? त्याचे शरीराला काय फायदे होतात याविषयी जाणून घेऊया...

चिया सीडस म्हणजे काय? 

आपल्यातील अनेकांना असे वाटते की चिया सीडस म्हणजे सब्जा. पण तसे नाही. सब्जा हा पूर्ण वेगळा घटक आहे. चिया सीडसचे प्रामुख्याने उत्पादन हे अमेरिका आणि मॅक्सिकोमध्ये होते. सध्या चिया सीडसचा आहारात वेगवेगळ्या स्वरुपात समावेश करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण सूपरफूड म्हणून आपल्या ब्रेकफास्टमध्ये किंवा डाएटमधील काही पदार्थांमध्ये या बियांचा वापर करतात. सब्जाप्रमाणेच पाण्यात किंवा दूधामध्ये भिजवून या बिया खाल्ल्या जातात. दिसायला अतिशय लहान दिसत असल्या तरीही या बियांमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक आहेत. असे असले तरीही या बियांचे प्रमाणात सेवन करायला हवे. प्रमाणापेक्षा जास्त चिया सीडस खाल्ल्या तर त्याचा विपरित परिणामही होतो. 

चिया सीडसचे फायदे

१. हाडांसाठी फायदेशीर - हाडे मजबूत होण्यासाठी शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते हे आपल्याला माहित आहे. चिया सीडसमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्याने हाडांच्या मजबूतीसाठी या बिया खाणे अतिशय फायदेशीर ठरते. 

२. पचनक्रिया चांगली राहण्यास मदत -     चिया सीडस दूधात भिजवल्यामुळे त्या फुगतात आणि सैलसर होतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. ज्यांना अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता अशा पचनाशी निगडीत समस्या आहेत, त्यांनी आहारात या बियांचा समावेश केल्यास त्यांना निश्चित फायदा होतो. 

३. त्वचेसाठी फायदेशीर - अनेक अभिनेत्रींची त्वचा अतिशय मुलायम आणि नितळ असते. आहारात अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण योग्य असेल तर त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचेतील कडकपणा टिकून राहण्यासाठी चिया सीडस फायदेशीर ठरतात. 

४. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत - डायबिटीस ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. चिया सीडसचे सेवन केल्यास ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येऊ शकते. त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे अशांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने चिया सीडसचे सेवन करावे. 

५. केसांसाठी उपयुक्त - आपले केस मुलायम आणि चमकदार असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटते. यासाठी बाह्य उपचार जसे गरजेचे असतात तसेच आहारातील गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. चिया सीडसमध्ये फायबर, ओमेगा ३ आणि प्रोटीन या तिन्हीचे प्रमाण जास्त असल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

हे सगळे फायदे असतील तरीही या बिया प्रमाणापेक्षा जास्त खाणे धोक्याचे ठरु शकते. मर्यादेपलिकडे खाल्ल्यास पोट खराब होणे किंवा रक्तदाब कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच या बियांचे सेवन करायला हवे. तसेच काहींना या बियांची अॅलर्जीही असून शकते, यासाठी आधी थोड्या प्रमाणात घेऊन मग नियमित सेवन करावे. 

   

 

टॅग्स :अन्नअनुष्का शर्माआलिया भट