Join us  

सणावाराला खवा हवाच, पण त्यातली भेसळ कशी ओळखायची? 3 पध्दतींनी ओळखा खव्यातील भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 6:31 PM

खव्यातील भेसळ ही आता सामान्य बाब झाली आहे. त्यापासून ग्राहक म्हणून आपणच सावधान असायला हवं ही काळाची गरज आहे. त्यासाठी भेसळयुक्त खवा ओळखता यायला हवा. खव्याच्या शुध्दतेच्या तीन चाचण्या अगदीच सोप्या. करुन पाहा!

ठळक मुद्देखव्यात प्रामुख्यानं रताळी, शिंघाडा पीठ, वनस्पती तूप, स्टार्च यांची भेसळ केली जाते. भेसळ असलेला खवा खाल्ला की तो टाळुला चिकटतो.खवा हातावर चोळल्यास हात तेलकट होतात.

दिवाळीचा सर्व फराळ आता विकत मिळतो, पण हाताने केलेल्या फराळाची चव विकतच्या फराळाला कुठे? म्हणून आजही बहुतांश महिला घरातच दिवाळीचा फराळ बनवतात. यामागे असते करुन बघण्याची हौस आणि भेसळीचे भीती.

सणवार जवळ आले की वर्तमानपत्रं आणि टीव्हीवर खाद्यपदार्थातील भेसळ्, त्यामुळे आजरी किंवा जीव गमावलेल्या लोकांच्या बातम्या येऊ लागतात. हे असे प्रसंग आपल्या बाबतीत घडू नये म्हणून महिला घरात फराळ करतात. लाडू, बर्फी, करंज्या तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खव्याचा उपयोग केला जातो. हा खवा बाहेरुन विकत आणला जातो. खवा हा शुध्दच असणार अशी खात्री असल्यामुळे तो मिठायांमधे वापरला जातो आणि खवा भेसळयुक्त असेल तर मग मात्र त्रासाला, आजारपणाला आमंत्रण मिळतं.

Image: Google

खव्यातील भेसळ ही आता सामान्य बाब झाली आहे. त्यापासून ग्राहक म्हणून आपणच सावधान असायला हवं ही काळाची गरज आहे. त्यासाठी दोन उपाय एक तर भेसळयुक्त खवा घेऊ नये आणि दुसरा उपाय म्हणजे खवा घरीच तयार करावा. दुसरा पर्याय जरा वेळ खाऊ असल्यानं विकतचाच खवा जागरुकपणे घेणं हा उत्तम पर्याय आहे. जागरुकपणे खवा घेण्यासाठी शुध्द खवा, भेसळयुक्त खवा यातील फरक ओळखता यायला हवा. खव्यातील भेसळ सहज ओळखता येते. तज्ज्ञांनी यासाठी छोटे छोटे प्रयोग सांगितले आहेत.

Image: Google

खव्यात भेसळ.. कशी ओळखणार?

1. खव्यात प्रामुख्यानं रताळी, शिंघाडा पीठ, वनस्पती तूप, स्टार्च यांची भेसळ केली जाते. भेसळयुक्त खवा हातावर घासल्यास घाण वास येतो. भेसळ असलेला खवा खाल्ला की तो टाळुला चिकटतो.

2. खवा शुध्द आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडा खवा हातावर घेऊन घासून बघावा. खव्याचा पोत दाणेदार असला , तो हातावर चोळल्यानंतर हात तेलकट झाले आणि हाताला शुध्द तुपासारखा वास आला म्हणजे खवा शुध्द आहे हे समजावं. तसं नसेल तर त्यात भेसळ आहे हे समजावं.

Image: Google

3. शुध्द खवा ओळखण्याची तिसरी पध्दत अन्न मानक आणि सुरक्षा प्राधिकरण यांनी सांगितल्यानुसार एक चमचा खवा घ्यावा तो एक कप गरम पाण्यात मिसळावा. नंतर कपामधे आयोडीनचे काही थेंब टाकावेत. आयोडीन टाकल्यानं गरम पाण्यात मिसळलेला खवा जर निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ झाली आहे हे समजावं. आणि तसं झालं नाही तर मात्र खवा शुध्द आणि वापरण्यास सुरक्षित आहे हे समजावं.