Join us  

बेसनात भेसळ? दिवाळीत बेसन विकत आणाल तेव्हा भेसळ कशी ओळखाल, ही घ्या बेसन टेस्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 11:14 AM

दिवाळीत लाडू, शेव आणि आणखी कशासाठी वापरल्या जाणाऱ्या बेसनात भेसळ असेल तर? आरोग्यासाठी हे घातक आहेच पण तुमचे पैसे आणि कष्टही वाया घालवणारे, त्यामुळे वेळीच सावध व्हा

ठळक मुद्देबाजारातून तयार बेसन आणत असाल तर त्यात भेसळ नाही ना तपासून घ्याआपण खात असलेल्या लाडूत भेसळ असेल तर वेळीच जागे व्हा...

दिवाळी आली की घराघरांतून लाडू, चकली, चिवडा यांचे वास यायला लागतात. आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात आली असेल. दिवाळी ही फराळाशिवाय अपूर्णच. त्यातही बेसन लाडू म्हणजे फराळातील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ. लक्ष्मीपूजनाला देवापुढे नैवेद्य दाखविण्यापासून ते घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू. पण बेसनाच्या लाडूसाठी तयार  बेसन पीठ आणत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे बाजारातून आणलेल्या या पीठात भेसळ असण्याची शक्यता असते. अशा पीठाचे लाडू खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला त्याचा त्रास होऊ शकतो.  तोंडात ठेवल्यावर लाडू विरघळावा म्हणून हे पीठ बराच वेळ तूपात भाजावे लागते. त्यामुळे हे पदार्थ करण्यासाठी कष्ट तर पडतातच पण तूप आणि सुकामेव्यासारखे महागडे जिन्नस असूनही बेसन पीठातच भेसळ असेल तर? 

या पीठात इतर डाळींच्या पीठाची भेसळ असू शकते. त्यामुळे लाडू तर बेचव होतीलच पण इतके सगळे करुन असे का झाले हेही तुमच्या लक्षात येणार नाही. आता आपण आणलेल्या पीठात भेसळ आहे हे कसे ओळखायचे? यासाठी एक सोपी चाचणी तुम्ही घरच्या घरी करु शकता. त्यामुळे तुम्ही भेसळयुक्त पदार्थ खाण्यापासून वाचू शकता. तर फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (Fssai) याबाबत जागृती करणारा एक व्हिडिओ नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी भेसळ ओळखायची चाचणी कशी करायची याबाबत सांगितले आहे. पाहूया ही चाचणी करायच्या पायऱ्या...

१. एका टेस्ट ट्यूबमध्ये थोडे बेसन पीठ घ्या.२. त्यात पीठ भिजेल इतके पाणी घाला.३. यात कॉन्सन्ट्रेटेड एचसीएल घाला. (बाजारात हे उपलब्ध होते.)४. आता हे मिश्रण जोरजोरात हलवा. ५. या मिश्रणाचा रंग बदलला नाही तर त्यामध्ये भेसळ नाही असे आपण म्हणू शकतो. ६. पण या मिश्रणाच्या वरच्या बाजूला लाल रंगाचे पाणी जमा झाले तर त्यात भेसळ असल्याचे नक्की होईल.

त्यामुळे बेसनाचा लाडू, शेव यांसारखे फराळाचे पदार्थ करताना विशेष काळजी घ्या. अन्यथा बाजारातून डाळ आणून ती दळून घ्या. फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (Fssai) ने दोन दिवसांपूर्वी पोस्ट केलेला हा व्हिडियो इन्स्टाग्रामवर बऱ्याच जणांनी पाहिला असून तुमच्याकडूनही मिस झाला असेल तर नक्की बघा.

टॅग्स :अन्नव्यभिचारदिवाळी 2021