Join us  

धनुरासन अवघड आहे म्हणून टाळता का? हे 10 फायदे वाचा, रोज धनुरासन कराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 3:58 PM

धनुरासन करणं अवघड वाटत असल्याने अनेकजण ते करण्याचं टाळतात. पण धनुरासन केल्यानं पचन तर सुधारतच सोबतच हाडं आणि स्नायू मजबूत होतात. पाठीच्या हाडांमधे लवचिकता येते. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने याचे फायदे बघता हे आसन न कंटाळता करावं असा सल्ला फिटनेस तज्ज्ञ महिलांना देतात.

ठळक मुद्देधनुरासन करताना मान, छाती, पोट, हात, दंड, जांघा यावर ताण येतो. या आसनामुळे शरीरात उत्साह संचारतो.मासिक पाळीत अनियमितता असल्यास हे आसन जरुर करावं. यामुळे मासिक पाळीशी संबंधित दोष दूर होतात

धनुरासन हे योगसाधनेतलं एक आसन. महिलांनी हे आसन रोज करणं महत्त्वाचं आहे असं फिटनेस तज्ज्ञ म्हणतात. पचनव्यवस्था सुधारण्यापासून पोट कमी करण्यापर्यंत, हाडं आणि स्नायू मजबूत करण्यापासून नैराश्य दूर करण्यापर्यंतचे अनेक फायदे धनुरासन केल्याने मिळतात. धनुरासन करणं अवघड वाटत असल्याने अनेकजण ते करण्याचं टाळतात. पण धनुरासन केल्यानं पचन तर सुधारतच सोबतच हाडं आणि स्नायू मजबूत होतात. पाठीच्या हाडांमधे लवचिकता येते. मधुमेह, कंबरदुखी हे त्रास धनुरासनामुळे नियंत्रणात येतात तसेच जांघाचे स्नायूही या आसनामुळे मजबूत होतात. एवढे फायदे दोन ते तीन मिनिटं धनुरासन केल्याने होतात.महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने याचे फायदे बघता हे आसन न कंटाळता करावं असा सल्ला फिटनेस तज्ज्ञ महिलांना देतात.

धनुरासन करताना शरीराची स्थिती धनुष्यासारखी होते. या आसनात मान, छाती, पोट, हात, दंड, जांघा यावर ताण येतो. या आसनामुळे शरीरात उत्साह संचारतो. या आसनाचे दोन प्रकार असतात. पूर्ण धनुरासन आणि अर्ध धनुरासन. पूर्ण धनुरासन करणं हे सर्वांकडूंच शक्य होत नाही. पण याच्या नियमित सरावानं हे जमतं. पण अर्ध धनुरासन करणं पूर्ण धनुरासनच्या तुलनेत सोपं आहे. महिलांनी धनुरासन अवश्य करावं असं तज्ज्ञ सांगतात.

छायाचित्र- गुगल

धनुरासन कसं करावं?

धनुरासन करण्यासाठी जमिनीवर पालथं झोपावं. गुडघे वाकवून ते कमरेजवळ आणावेत. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडावेत. नंतर डोकं, छाती आणि जांघ हे वरच्या दिशेने ताणावे. शरीराचा संपूर्ण भार पोटाच्या खालच्या भागावर घ्यावा. शरीराल पुढच्या दिशेनें खेचण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत किमान 15- 20 सेकंद राहावं. श्वास हळुहळु सोडत छाती आणि पाय जमिनीवर टेकवावेत. हे आसन अपेक्षित परिणाम दिसण्यासाठी कमीत कमी तीन वेळा आणि जास्तीत जास्त पाच वेळा करावं.

छायाचित्र- गुगल

धनुरसन केल्यानं काय होतं?

1. या आसनामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. ज्यांना नैराश्याचा त्रास आहे त्यांनी हे आसन रोज करावं. यामुळे नैराश्याची लक्षणं कमी होतात.2. धनुरासनामुळे वजन कमी होतं. शरीर संतुलित राहातं.3. हे आसन करताना पोटावर शरीराचा भार पडतो. यामुळे या आसनानं पोटाचे स्नायू कार्यक्षम बनतात.4. स्ट्रेचिंग वर्गात मोडणार्‍या या आसनामुळे स्नायू आणि हाडं लवचिक होतात.5. पाठीचं दुखणं, कंबरदुखी या चिवट त्रासातून आराम मिळण्यास धनुरासन मदत करतं.6. धनुरासनामुळे हात आणि दंड कसदार होतात.7. मासिक पाळीत अनियमितता असल्यास हे आसन जरुर करावं. यामुळे मासिक पाळीशी संबंधित दोष दूर होतात.8. धनुरासनामुळे पाठीचा कणा आणि हाडं मजबूत होतात.9. पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो. या आसनामुळे अपचन, अजीर्ण, पोटाचे विकार दूर होतात.10 . धनुरासन केल्यानं भूक वाढते.धनुरासनाचे फायदे बघता ते सर्वांसाठीच योग्य आहे. पण ज्यांना कंबरदुखी, पाठदुखी, अर्ध शिशी, डोकेदुखी , उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळावं, तसेच गरोदर महिलांनी हे आसन करु नये असा सल्ला तज्ज्ञ देतात.