Join us  

सकाळी कामाच्या धबडग्यात व्यायामाला वेळच मिळत नाही, रिसर्च सांगतात सायंकाळी व्यायाम फायद्याचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 5:43 PM

व्यायाम आणि झोप यावर आधारित एक अभ्यास सांगतो की झोपण्याआधी व्यायाम केला तरी त्याचा झोप लागण्यावर किंवा झोपेच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होत नाही. हा अभ्यास सांगतो की हा व्यायाम तुम्ही झोपण्याच्या किती वेळ आधी करता आणि कोणत्या स्वरुपाचा व्यायाम करता या दोन गोष्टींचं पथ्यं तेवढं पाळायला लागतं.

ठळक मुद्देसंध्याकाळी उशीरा केलेल्या मध्यम स्वरुपाच्या व्यायामामुळे झोप चांगली लागते.मध्यम स्वरुपाचा व्यायाम झोपण्याआधी किमान एक ते दिड तास आधी केलेला असावा.संध्याकाळी उशिरा योग, स्ट्रेचिंग, चालणं, आरामात पोहोणं , रमतगमत सायकल चालवणं, हलके -मध्यम वजन उचलण्याचे व्यायाम हे फायदेशीर ठरतात.

 

नियमित व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. नियमित व्यायामाचा परिणाम चांगली झोप लागण्यावर होतो. व्यायामामुळे मनावरचा ताण आणि भीती जाते, आपल्या शरीरामधलं घड्याळ व्यवस्थित चालतं. व्यायामामुळे शरीराचं तापमान वाढतं. हे तापमानच आपल्याला काम करण्याची ऊर्जा देतं.व्यायाम हा आरोग्यासाठी आवश्यक आहे हे निर्विवाद. पण सकाळी केलेला व्यायाम हा आरोग्यासाठी चांगला असतो पण झोपण्याआधी केलेला व्यायाम आपल्या झोपेवर नकारात्मक परिणाम घडवून आणतो असं म्हटलं जातं. पण हेच सत्य आहे असं मानण्याची गरज नाही. कारण व्यायाम आणि झोप यावर आधारित एक अभ्यास सांगतो की झोपण्याआधी व्यायाम केला तरी त्याचा झोप लागण्यावर किंवा झोपेच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होत नाही. हा अभ्यास सांगतो की हा व्यायाम तुम्ही झोपण्याच्या किती वेळ आधी करता आणि कोणत्या स्वरुपाचा व्यायाम करता या दोन गोष्टींचं पथ्यं तेवढं पाळायला लागतं.

अभ्यास काय सांगतो?

 नुकत्याच झालेल्या या अभ्यासाने रात्री उशिरा व्यायाम केल्यानं झोप विस्कळित होते या समजाला आव्हान दिलं. या अभ्यासात 12 निरोगी पुरुष सहभागी झाले. हे 12 पुरुष तीन वेगवेगळ्या रात्री लॅब मधे आले. ते जेव्हा लॅब मधे आले तेव्हा एकतर त्यांनी अर्धा तास मध्यम स्वरुपाचा एरोबिक व्यआयाम केला होता किंवा अर्धा तास स्नायुंची ताकद वाढवणरा मध्यम स्वरुपाचं रेसिसटन्स ट्रेनिंग केलेलं होतं किंवा व्यायामच केलेला नव्हता. जो काही व्यायाम केला होता तो झोपण्यापूर्वी दीड तास आधी केलेला होता. झोप आणि व्यायाम यावर आणखी एक अभ्यास करण्यात आला ह. ज्यात 16 पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी झोपण्याआधी 4 किंवा 2 तास आधी वेगवेगळ्या वेळी मध्यम स्वरुपाचा व्यायाम केलेला होता. संशोधक सांगतात की संध्याकाळी केलेल्या व्यायामानं प्रयोगात सहभागी झालेल्या स्त्री पुरुषांच्या रात्रीच्या झोपेच्या क्षमतेवर कोणताही परिणाम झालेला आढळून आला नाही.

कोणता व्यायाम करावा?

या सर्व अभ्यासांचं विश्लेषण असं सांगतं की संध्याकाळी उशीरा केलेल्या मध्यम स्वरुपाच्या व्यायामामुळे झोप चांगली लागते. फक्त झोपण्याआधी तीव्र स्वरुपाचे कठीण व्यायाम करु नये. मध्यम स्वरुपाचा व्यायाम झोपण्याआधी किमान एक ते दिड तास आधी केलेला असावा. व्यायाम आणि झोपेचा संबंध बघितल्यास सर्व प्रकारच्या व्यायामाचा झोपेवर चांगला परिणाम होतो असं नाही. विशेषत: जेव्हा संध्याकाळी उशिरा व्यायाम केला जातो तेव्हा प्रामुख्यानं कोणत्या स्वरुपाचा व्यायाम करता आणि कधी करता याला खूप महत्त्व आहे.

साधारणत: संध्याकाळी उशिरा व्यायाम करताना हलके फुलके मध्यम तीव्रतेचे व्यायाम करण्याचा सल्ला अभ्यासक देतात. या प्रकारच्या व्यायामांनी लवकर झोप लागते आणि झोपेची गुणवत्ताही चांगली असते. झोपण्याच्या तास-दिड तास आधी व्यायाम संपवला तर व्यायामानं वाढलेलं शरीराचं तापमान कमी होण्यास तेवढा वेळ मिळतो. म्हणून संध्याकाळी उशिरा व्यायाम करणार असाल तर योग, स्ट्रेचिंग, चालणं, आरामात पोहोणं , रमतगमत सायकल चालवणं. हलके -मध्यम वजन उचलण्याचे व्यायाम हे फायदेशीर ठरतात.संध्याकाळी उशिरा जास्त तीव्रतेचे हाय इन्टेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, पळणं, जोरात पोहोणं, दोरीवरच्या उड्या मारणं, जोरात सायकल चालवणं ,जास्त वजन उचलण्याचे व्यायाम करु नये.