Join us  

कोरोनाची लस घेतल्यावर नियमित व्यायाम करा, ॲण्टीबॉडीचे प्रमाण वाढेल! -अलीकडच्या अभ्यासाचे निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:07 PM

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील ‘ग्लासगो कॅलेडोनिअन यूनिर्व्हसिटीनं हा अभ्यास केला आहे. हा अभ्यास सांगतो की आठवड्यातले पाच दिवस किमान ३० मीनिटं व्यायाम केल्यास संसर्गजन्य आजारांची लागण होऊन आजारी पडण्याचा धोका ३७ टक्क्यांनी कमी होतो. आणि लसीकरणामुळे शरीरात घडणाऱ्या परिणामकारकतेतही नियमित व्यायामानं वाढ होते.

ठळक मुद्देशारीरिक व्यायामानं मानवाची रोगांशी लढणारी रोगप्रतिकारशक्ती बळकट होते. संसर्गजन्य आजार होण्याचा, न्यूमोनियासारख्या आजारात मृत्यू होण्याचा धोका टळतो. नियमित व्यायाम करणाऱ्यांमधे स्थूलता, मधुमेह, श्वसन विकार, ह्दयासंबंधीचे आजार कमी प्रमाणात दिसून येतात. आणि ही परिस्थिती गंभीर आजरांना बळी पडण्याची शक्यता अगदी कमी करुन टाकते.‘ग्लासगो कॅलेडोनिअन यूनिर्व्हसिटी’चे अभ्यासक सरकारांना जनतेला शारीरिक व्यायामाची सवय लावण्याची गरज व्यक्त करतात.

नियमित व्यायाम ही शरीराची गरज आहे. हा नियमित व्यायाम आपल्या शरीराला आणीबाणीच्या प्रसंगात लढण्याची ताकद देतो तसेच या प्रसंगातून सहीसलामत तरुन जाण्यास मदत करतो. संसर्गजन्य आजारात व्यायामाची भूमिका आता अभ्यासातून सिध्द झाली आहे. जगभरात कोविड१९ चा विस्फोट झालेला असतानाच व्यायामासंदर्भातील एक महत्त्वाचा अभ्यास नूकताच प्रकाशित झाल आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील ‘ग्लासगो कॅलेडोनिअन यूनिर्व्हसिटीनं हा अभ्यास केला आहे. हा अभ्यास सांगतो की आठवड्यातले पाच दिवस किमान ३० मीनिटं व्यायाम केल्यास संसर्गजन्य आजारांची लागण होऊन आजारी पडण्याचा धोका ३७ टक्क्यांनी कमी होतो.

कोरोनावर लस उपलब्ध झाल्यामुळे हा कोविड १९ चा उद्रेक थांबेल अशी आशा निर्माण झाली आहे. पण सध्या तरी या आजाराचा संसर्ग , त्यातून होणारे मृत्यू हेच चित्र दिसत आहे. हे चित्र आपण आपल्यापुरतं बदलू शकतो असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. नियमित व्यायाम आपल्या शरीरालाअशा संसर्गजन्य आजारांपासून रोखतं, त्याच्याशी लढण्याचं बळ देतो आणि मृत्यूचा धोका कमी करतो.

व्यायाम, योग्य आहार आणि धूम्रपान न करणं या तीन गोष्टींमुळे आपलं अनेक घातक आजारांपासून संरक्षण होतं. सन २००८ पासून शारीरिक क्रियाशीलतेवर अभ्यास सुरु आहे. हा अभ्यास सांगतो की व्यायामाचा अभाव आणि शरीराची निष्क्रियता यामुळे दरवर्षी जगभरात अकाली 50 लाख (५ मीलिअन ) मृत्यू होतात.ग्लासगो कॅलेडोनिअन यूनिर्व्हसिटीनं केलेल्या पध्दतशीर अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की शारीरिक व्यायामानं मानवाची रोगांशी लढणारी रोगप्रतिकारशक्ती बळकट होते. संसर्गजन्य आजार होण्याचा, न्यूमोनियासारख्या आजारात मृत्यू होण्याचा धोका टळतो. तसेच नियमित शारीरिक व्यायामानं लसीकरणानंतर शरीरात दिसणाऱ्या परिणामकारकतेतही लक्षणीय परिणाम दिसून येतो.या अभ्यासाची सुरुवात कोविड१९ चा प्रादूर्भाव निर्माण होण्याच्या आधीच झाली होती. या अभ्यासात प्रामुख्यानं कोविड१९ संदर्भातील परिस्थितीचाही समावेश केला गेला.या अभ्यासात शारीरिक व्यायामाचा रोगप्रतिकारशक्तीवर कसा परिणाम होतो याबाबतचे पुरावेही आढळून आले आहेत. नियमित व्यायामामुळे 'इम्यूनोग्लोबिन आयजीए' या अ‍ॅण्टिबॉडीज ( प्रतिपिंडं)चा स्तर वाढलेला आढळून आला. हे प्रतिपिंडं फुप्फूसं आणि विषाणू /जीवाणू जिथे आक्रमण करतात त्या शरीराच्या भागावर श्लेषमल थर तयार करतात. तसेच रोगप्रतिकारशक्तीला विषाणूंच्या आक्रमाणाबाबत सजग करणाऱ्या सीडी४ आणि टी सेल्स्स यांची संख्या नियमित व्यायामानं वाढते.

लशीच्या परिणामकारकतेबाबतही शारीरिक व्यायाम कसा निर्णायक आणि महत्त्वाचा असतो याचाही अभ्यास केला गेला. त्यात असं आढळ्लं की नियमित व्यायाम करणाऱ्याच्या शरीरात लसीकरणामुळे नियमित व्यायाम न करणाऱ्याच्या तुलनेत ५० टक्के जास्त अ‍ॅण्टिबॉडीज तयार झालेल्या आढळून आल्या.नियमित व्यायाम आपलं गंभीर आणि जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करतं. नियमित व्यायाम करणाऱ्यांमधे स्थूलता, मधूमेह, श्वसन विकार, ह्दयासंबंधीचे आजार कमी प्रमाणात दिसून येतात. आणि ही परिस्थिती गंभीर आजरांना बळी पडण्याची शक्यता अगदी कमी करुन टाकते. कोविड संसर्ग , न्यूमोनियात वरील समस्या असणाऱ्यांचं मृत्युचं प्रमाण जास्त आढळून आलं आहे.

 लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकजण हातात वेळ होता म्हणून व्यायामाकडे वळले. पण अनेकांच्या बाबत हे नव्याचे नऊ दिवसच ठरले. एक विशिष्ट काळापुरतीच व्यायामाची क्रेझ राहिली .ती ओसरल्यानंतर मात्र अनेकांचं शारीरिक व्यायामाचा अभाव असलेली दिनचर्या सूरु झाली. त्यामुळे व्यायाम आणि रोगप्रतिकारशक्ती यांचा अभ्यास करणारे ‘ग्लासगो कॅलेडोनिअन यूनिर्व्हसिटी’चे अभ्यासक सरकारांना जनतेला शारीरिक व्यायामाची सवय लावण्याची गरज व्यक्त करतात. आज व्यायामाबाबतीत जगभरात विषम चित्रं दिसतं. हे चित्रं बदलण्याचं आवाहन ते सरकारला करतात. व्यायाम हा खरंतर सर्वच नागरिकांचीगरज असताना आज केवळ वरच्या गटातील लोकच व्यायाम करत आहेत. त्याचा फटका स्त्रियांच्या आरोग्याला बसला आहे. म्हणूनच अभ्यासक म्हणतात की व्यायाम ही सर्वांची गरज आहे. त्यात उच्च नीच असलेला भेदभाव काढून व्यायाम प्रत्येकानं करायला हवा याकडे आता त्या त्या देशातील सरकारांनीच लक्ष पुरवावं लागेल.कोविड१९ सारख्या भयंकर आजारांपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी नियमित व्यायामाला महत्त्व द्यायला हवं हा संदेश प्राधान्यानं सरकारनं नागरिकांपर्यंत पोहोचवायला हवा असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. 

सौजन्य:- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम