Join us  

एनर्जी हवी म्हणून सारा अली खान भल्या सकाळी करते वृक्षासन! ते करायलाही सोपं, फायदे जबरदस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 1:16 PM

सारा अली खानचा सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यातून सारा दिवसाची उत्साहानं सुरुवात करण्यासाठी वृक्षासन करण्यास सांगते तर व्हिडीओद्वारे तिने फोम रोलिंगचा आपला अनुभव शेअर केला आहे. या दोन व्यायामाचे फायदे काय?

ठळक मुद्देमन भरकटत असेल, अस्वस्थ असेल तेव्हा मुद्दाम हे आसन करायला हवं. त्यामुळे मन स्थिर व्हायला मदत होते. वृक्षासन हे शरीर, मन आणि बुध्दीसाठी महत्त्वाचं आसन आहे.फोम रोलिंग हा व्यायाम वॉर्म अप आणि व्यायामानंतर कुलडाऊन या दोन्हीसाठी केला जातो.

अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर ‘ट्रॅव्हल डायरीज’मधून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती, स्वत:चे अनुभव आणि इतरांना प्रेरणा आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून देत असते. शनिवार आणि रविवार म्हणजे सुटीचे दिवस. उशीरा उठणं, हळूहळु काम करणं, आळसात दिवस घालवणं असंच आपण करत असतो. पण सारा अली खानने रविवारी सकाळी पोस्ट केलेला फोटो मात्र सुटीच्या दिवसाचंही आपण कसं उत्साहात स्वागत करु शकतो याचं उदाहरण घालून देतो. हा फोटो सकाळचा आहे. सारा आपल्या गॅलरीत डोंगरातून उगवणार्‍या सूर्यासमोर वृक्षासन करत आहे. फोटो पोस्ट करताना सारा म्हणते की दिवसाची याच्यापेक्षा छान आणि उत्साहवर्धक सुरुवात काय असू शकते. वृक्षासनाच्या फोटोसोबतच साराने ‘फोम रोलिंग’ करतानाचेही फोटो टाकले आहे. हे फोटो पाहाणार्‍याला सारा सांगू इच्छिते की सुटीचा दिवस म्हणजे फक्त लोळायचा आणि रेलून राहायचा नाही तर रोलिंगचाही आहे. हे रोलिंग जे फिटनेस वाढवतं आणि मजाही देतं.

 

 

वृक्षासन कसं करावं?

साराच्या या वृक्षासनाच्या फोटोच्या निमित्तान योगसाधनेतील वृक्षासनाचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. वृक्षासन हे शरीर, मन आणि बुध्दीसाठी महत्त्वाचं आसन आहे. वृक्षासनात शरीराचं संतुलन खूप महत्त्वाचं असतं. या आसनात हे संतुलन साधलं गेलं तर बुध्दीवर लक्ष केंद्रित होतं. आणि बुध्दीवर लक्ष केंद्रित झालं की शरीराचं संतुलन साधलं जातं. शरीर आणि बुध्दीची सांगड घालण्यास हे आसन मदत करतं.वृक्षासन हे प्रामुख्यानं सकाळी लवकर करायला हवं. हे आसन करतान पोट रिकामं हवं. हे आसन करण्यासाठी ताठ उभं राहावं. दोन्ही हात मागे ठेवावे. मग आपला डावा पाय उचलावा आणि तो उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वर ठेवावा. श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्रिया सुरु ठेवत दोन्ही हात कानाला टेकवून सरळ वर न्यावेत आणि नमस्काराच्या स्थितीत हात एकमेकांना जोडावेत. पाठीचा कणा ताठ असावा. आपलं शरीर वरच्या दिशेनं ताणलेलं हवं. प्रत्येक वेळेस श्वास सोडल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायला हवा. या आसनात कमीतकमी 30 सेकंद ते एक मिनिटापर्यंत राहायला हवं. मग पाय आणि हात खाली आणावे. आणि मग हीच कृती उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वर ठेवून करावी. डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वर ठेवून शरीराचं संतुलन राखणं हे उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वर ठेवून संतुलन राखण्याच्या तुलनेत सोपं आहे. अशा परिस्थितीत सवय होईपर्यंत उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली ठेवावा. फक्त वृक्षासन करताना पाय गुडघ्यावर ठेवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. वृक्षासन करताना शरीराचं संतुलन साधण्यासाठी नजर समोर कुठल्यातरी गोष्टीवर स्थिर करावी. सुरुवातीला वृक्षासन करताना तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्यावा. सवयीनं हे आसन करताना शरीराचा तोल आणि संतुलन साधणं जमतं मग भिंतीचा आधार लागत नाही. फक्त ज्यांना व्हर्टिगो , मायग्रेन किंवा अनिद्रेची समस्या आहे त्यांनी हे आसन करु नये.

 

वृक्षासनाचे फायदे

* वृक्षासनामुळे गुडघे मजबूत होतात. नितंबाचे सांधे मोकळे होतात.* हे आसन मेंदू आणि स्नायूमधील सुसंवाद व्यवस्थित राखतो आणि वाढवतो.* वृक्षासनामुळे एकाग्रता वाढते आणि मन शांत होतं.* वृक्षासनामुळे शरीराचं संतुलन होतं त्यासोबतच पाठीचा कणा मजबूत होतो.* वृक्षासनामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात.* या आसनामुळे कानाचे आतील भाग, डोळे आणि खांदे सक्षम होतात.* वृक्षासन नियमित केल्यास कंबरदुखी थांबते.* हे आसन आपल्या शरीर बुध्दीला स्थिर करतं , मनाचा कणखरपणा वाढवतं आणि शरीर लवचिक करतं. मानसिक पातळीवर मन आणि * लक्ष एकाग्र करण्याचं काम जे आसन करतं.* कंबर, स्तन, हात यांचा बांधेसूदपणा या आसनानं वाढतो.* मन भरकटत असेल, अस्वस्थ असेल तेव्हा मुद्दाम हे आसन करायला हवं. त्यामुळे मन स्थिर व्हायला मदत होते.

 

 

व्यायामाची मजा आणणारं फोम रोलिंग

वृक्षासनाच्या फोटोसोबतच साराने फोम रोलिंगचा व्हिडीओही ‘ रोलिंग रोलिंग रोलिंग’ हे कॅप्शन देत सोशल मीडियावर टाकला. फोम रोलिंग हा व्यायाम वॉर्म अप आणि व्यायामानंतर कुलडाऊन या दोन्हीसाठी केला जातो. या व्यायामाचा फायदा म्हणजे सांध्यांच्या हालचाली वेगवान होतात. स्नायुंना आलेला ताठरपणा, वेदना,सूज फोम रोलिंग केल्यानं कमी होते.शरीर मनाला ऊर्जा देण्यासाठी सारा अली खान प्रमाणे तुम्हीही वृक्षासन आणि फोम रोलिंग करुन पहा!