Join us  

व्यायामानंतर शरीराला हवे असतात 2 घटक; 45 मिनिटांच्या आत ते मिळाले नाही तर व्यायामाचा फायदा शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 7:14 PM

व्यायामानंतर काहीच न खाण्याची सवय शरीरासाठी असते घातक. व्यायाम झाल्यानंतर 45 मिनिटांच्या आत शरीरात हे दोन घटक जाणं असतं आवश्यक. ते कोणते?

ठळक मुद्देव्यायामादरम्यान आपल्या शरीरातील ग्लायकोजन हे ऊर्जेच्या स्वरुपात वापरलं जातं.व्यायामानंतर शरीरात पुरेशा प्रमाणात प्रथिनं जायला हवीत तरच व्यायामानंतर शरीराची झालेली झीज शरीर भरुन काढू शकतं.व्यायामानंतर तळलेले समोसा, वडे, कचोरी यासारखे पदार्थ सेवन केल्यास व्यायामाचा काहीही लाभ शरीरास मिळत नाही.

फिटनेससाठी फक्त व्यायामच महत्त्वाचा नसतो. व्यायामानंतर आपण काय खातो पितो किंवा काही खातो की नाही यालाही तितकंच महत्त्व आहे. ' नॅशनल हेल्थ इन्स्टिटयूट'ने सांगितल्यानुसार आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरातील स्नायू ग्लायकोजनचा वापर करतात. विशेषत: धावणे, पळणे, दोरीवरच्या उड्या आणि इतर जीममधील हाय इन्टेन्सिटी वर्कआउट केले जातात तेव्हा स्नायू ग्लायकोजनचा वापर करतात त्यामुळे स्नायुतील प्रथिनांची साखळी तुटते , तिला इजाही होवू शकते. त्यामुळेच तज्ज्ञ सांगतात की व्यायामानंतर पोष्टिक खाणं खूप महत्त्वाचं आहे.

नुसतं पौष्टिक खा असं म्हटलं तर काही कळत नाही. पण व्यायामानंतर पौष्टिक खाण्यात व्यायामानंतर शरीरास आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश असतो. असे घटक जे शरीरातील व्यायामादरम्यान खर्च झलेले प्रथिनं आणि ग्लायकोजन यांच्या पुर्ननिर्माणासाठी मदत करतील. स्नायुंच्या वृध्दीसाठी पोषक घटक व्यायामानंतर शरीरात लगेच जाणं आवश्यक आहे.

Image: Google

व्यायामानंतर कोणते घटक आवश्यक1. व्यायामादरम्यान आपल्या शरीरातील ग्लायकोजन हे ऊर्जेच्या स्वरुपात वापरलं जातं. म्हणूनच व्यायामानंतरच्या खाण्यात कर्बोदकांचं सेवन केल्यास ग्लायकोजनची झीज भरुन निघते. कर्बोदकांचा आहारात समावेश करणं म्हणजे व्यायामानंतरच्या आहारात रताळी, फळं, पोळी, भात, दलिया, बटाटा यासारख्या पदार्थांचा समावेश करणं.

Image: Google

2. व्यायामानंतर शरीरात पुरेशा प्रमाणात प्रथिनं जायला हवीत तरच व्यायामानंतर शरीराची झालेली झीज शरीर भरुन काढू शकतं. म्हणूनच व्यायामानंतरच्या खाण्यात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असायला हवा. प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने अमीनो अँसिडही मिळतात. अमीनो अँसिड स्नायू वृध्दीसाठी मदत करतात. आहारात प्रथिनांचा समावेश करणं म्हणजे अंडं, दही, पनीर, प्रोटीन बार यासारखे पदार्थ खाणं. तज्ज्ञ सांगतात की व्यायामानंतर 45 मिनिटांच्या आत प्रथिनं आणि कर्बोदकयुक्त पदार्थांचं सेवन करायला हवं. व्यायामानंतर लवकरात लवकर खाल्ल्याने शरीराची झीज पटकन भरुन निघते. यासाठी 3:1 अर्थात 3 भाग कर्बोदकं आणि 1 भाग प्रथिनं शरीरात जाणं आवश्यक आहे.

Image: Google

हे पदार्थ मात्र टाळा!

व्यायामानंतर तळलेले समोसा, वडे, कचोरी यासारखे पदार्थ सेवन केल्यास व्यायामाचा काहीही लाभ शरीरास मिळत नाही. उलट या चुकीच्या आहाराचा तोटाच शरीराला सहन करावा लागतो. तज्ज्ञ म्हणतात व्यायामानंतर मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, शीतपेयं, कॉफी, फास्ट फूड, जंक फूड, आइस्क्रिम, मिठाया यासारखे पदार्थ कधीही खाऊ नये.