Join us  

walk @ home : दिवसभराचं ‘स्टेप्स टार्गेट’ सहज पूर्ण करणारी एक सोप्यात सोपी भन्नाट ‘चाल’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:45 PM

बाहेर जाऊन चालायला पूरेसा वेळ मिळत नसेल ,आरोग्य जपण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आवश्यक स्टेप्स चालणं जमत नसेल तर ऑफिसमधे काम करताना, घरात असताना आपण काय केलं तर स्टेप्स वाढतील याचा जाणीवपूर्वक विचार करायला हवा असं तज्ज्ञ म्हणतात. तज्ज्ञांच्या मते कारणं देऊन टाळण्यापेक्षा इच्छाशक्ती दाखवून संधी शोधली तर आवश्यक स्टेप्सचं लक्ष गाठलं जातं.

ठळक मुद्देथोड्या थोड्या वेळानं बसल्या जागेवरुन उठा. फिटनेस ट्रेनरच्या मते एका जागेवर ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसून राहू नका.पावलांचं उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठीही लिफ्ट टाळून जिने चढण्या उतरण्याचा नियम करावा.गाडीपेक्षा शक्य असेल तिथे सायकलनं जाण्याचा पर्याय निवडावा.

नोकरी व्यवसायातील कामाच्या आणि वेळेच्य्या निर्बंधांमुळे व्यायामावर मर्यादा येतात. आता तर या मर्यादांसाठी कोरोना हे ही कारण झालं आहे. अमुक इतक्या स्टेप्स चालाल तर आरोग्य व्यवस्थित राहील , तमुक इतक्या स्टेप्स चाललं तर वजन कमी होईल याबाबत शास्त्रीय माहितीची आधार घेत बरंच लिहिलं बोललं जात आहे. हे वाचल्यानंतर , ऐकल्यानंतर बुध्दीला पटतंही. पण प्रत्यक्षात स्वत: हे जेव्हा करण्याची वेळ येते तेव्हा पावलांचं गणित वाढवण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याचं, योग्य जागा नसल्याचं कारण पुढे केलं जातं. पण कारण सांगून स्टेप्स वाढवण्याचं टाळण्यापेक्षा रोजच्या दिनचर्येत काही छोटे मोठे बदल करुन, काही गोष्टींचा मुद्दाम समावेश करुन हे स्टेप्सचं गणित जमवून आणता येतं.बाहेर जाऊन चालायला पुरेसा वेळ मिळत नसेल ,आरोग्य जपण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आवश्यक स्टेप्स चालणं जमत नसेल तर ऑफिसमधे काम करताना, घरात असताना आपण काय केलं तर स्टेप्स वाढतील याचा जाणीवपूर्वक विचार करायला हवा असं तज्ज्ञ म्हणतात. हे स्टेप्सचं गणित कसं जमवून आणता येईल यासाठी तज्ज्ञांनी काही सोप्या युक्त्याही सांगितल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते कारणं देऊन टाळण्यापेक्षा इच्छाशक्ती दाखवून संधी शोधली तर आवश्यक स्टेप्सचं लक्ष गाठलं जातं.

 

पावलांचं उद्दिष्ट्य गाठण्यासाठी

- थोड्या थोड्या वेळानं बसल्या जागेवरुन उठा. फिटनेस ट्रेनरच्या मते एका जागेवर ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसून राहू नका. अर्धा तासानंतर उठून बाहेर जाणं शक्य नसेल तर एका जागेवर किमान तीन मिनिटं ताठ उभं राहा. हे जर शक्य वाटत नसेल तर दर एका तासानं उठून चालून या. लक्षात राहाणार नसेल तर फोनवर दर तासाचं रिमाइण्डर लावून ठेवा. सध्या घरी बसून काम करणाऱ्यासाठी तर हा दर तासाला उठून चालून येण्याचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. दर तासाला कामाच्या जागेवरुन उठून काही पावलं घरातल्या घरात चालणं, ऑफिसमधे असाल तर वॉशरुमपर्यंत जाऊन येणं , थोडं बाहेर पडून पाच दहा मिनिटं चालून आल्यास पुन्हा जागेवर बसून काम करण्याचा मूडही लागतो आणि स्टेप्सचं उद्दिष्टय गाठण्यासही मदत होते.

- लिफ्ट पेक्षा जिने चढून जाण्याचा पर्याय निवडा हे तर फार पूर्वीपासूनच सांगितलं जातं. पावलांचं उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठीही लिफ्ट टाळून जिने चढण्या उतरण्याचा नियम करावा. यामुळे स्टेप्स तर वाढतातच सोबत पायांच्या स्नायुंचाही व्यायाम होतो. फिटनेस ट्रेनर म्हणतात जिने चढता उतरताना पायऱ्यांवरुन उड्या मारण्याचा व्यायाम काही वेळ केल्यास हदयाचे ठोके वाढतात शिवाय उष्मांक जळण्यासही मदत होते.- बाहेर गेल्यावर किंवा ऑफिसला गेल्यावर गाडी मुद्दाम लांब पार्क करावी. म्हणजे त्यानिमित्तानं जास्त चाललं जातं.

 

- गाडीपेक्षा शक्य असेल तिथे सायकलनं जाण्याचा पर्याय निवडावा. यामुळे शरीराचा व्यायाम होतो आणि पावलांची संख्याही वाढते.

- ऑफिसमधे एका जागेवर बसून बोलण्यापेक्षा फिरत फिरत बोलावं. उभं राहून बोलावं.

- घरातल्या घरात राहून पुरेसा शारीरिक व्यायाम होत नाही हे खरं आहे. पण घरातल्या घरात शारीरिक व्यायाम होईल अशी कारणं शोधली तर मात्र व्यायाम होतो. घराच्या मागे- पुढे बाग असल्यास, किंवा बाल्कनीत बाग असल्यास तिथे थोडा वेळ फिरावं. कामानिमित्तानं किंवा सहज म्हणून फोनवर बोलायचं असेल तर एका जागी बसून बोलण्यापेक्षा बागेत किंवा बाल्कनीत फिरत फिरत बोलावं. फोनवर बोलताना घरातल्या घरात फिरत बोललं तरी चालण्याचा व्यायाम होतो.दिनचर्येत थोडे बदल केल्यास आपली शारीरिक हालचाल जास्त होते. पावलांची संख्या वाढते.