Join us  

दोरीवरच्या उड्या मारा. वजनही भराभर कमी होईल आणि फ्लेक्झिबिलिटीही वाढेल.. ते ही लवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 3:17 PM

दोरी उड्या आता व्यायामाचा एक प्रभावी प्रकार मानला जातो. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणं हे फायदेशीर मानलं जातं. घरच्या घरी, आपल्या व्यस्त दिनचर्येतून कधीही वेळ काढून दोरीवरच्या उड्या मारता येतात इतका सोपा व्यायाम आहे हा. दोरीवरच्या उड्यांनी वजन कमी होण्यासोबतच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहातं.

ठळक मुद्देदोरीवरच्या उड्यांनी शरीरातील अतिरिक्त उष्मांक जळतात.भविष्यात हाडासंबंधीचा ऑस्टिओपोरोसिस हा गंभीर आजार होऊ द्यायचा नसेल तर दोरीवरच्या उड्या मारणं ही गरज आहे.तज्ज्ञांच्या मतानुसार रोज 10-15 मिनिटं दोरीवरच्या उड्या मारल्यानं शरीरातील 200-250 उष्मांक जळतात.

लहानपणी खेळलेल्या अनेक खेळांमधला एक खेळ म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणे. लहानपण संपलं की त्यावेळेस खेळले जाणारे खेळही मागे पडतात. पण दोरीवरच्या उड्यांचं मात्र तसं नाही. लहानपणी खेळ म्हणून मारल्या गेलेल्या दोरी उड्या आता व्यायामाचा एक प्रभावी प्रकार मानला जातो. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणं हे फायदेशीर मानलं जातं. घरच्या घरी, आपल्या व्यस्त दिनचर्येतून कधीही वेळ काढून दोरीवरच्या उड्या मारता येतात इतका सोपा व्यायाम आहे हा. दोरीवरच्या उड्यांनी वजन कमी होण्यासोबतच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहातं.

दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे

 

  • दोरीवरच्या उड्यआ मारुन हदयाचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. हदयाची क्षमता दोरी उड्या मारुन वाढते. या व्यायामानं हदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. दोरीवरच्या उड्यआ हदयरोगापासून दूर ठेवतात. यासाठीच दोरीवरच्या उड्यांचा समावेश कार्डिओ एक्सरसाइजमधे केला गेला आहे.
  •  वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणं सर्वात लाभदायक समजलं जातं. दोरीवरच्या उड्यांनी शरीरातील अतिरिक्त उष्मांक जळतात.त्यांचं चरबीत रुपांतर होण्याचं टळतं.
  •  आपल्या स्नायुंच्या हालचालींवर शरीराचं मोटर फंक्शन अवलंबून असतं. दोरीवरच्या उड्या मारल्यानं स्नायू उत्तमप्रकारे कार्य करायला लागतात. यामुळे शरीरात संतुलन राखलं जातं. दोरीवरच्या उड्या मारल्यानं शरीराची कार्यक्षमता देखील वाढते. काम करताना येणारा थकवा नियमित दोरीवरच्या उड्या मारुन जातो.
  • चुकीची आहार शैली आणि जीवनशैलीमुळे फुप्फुसासंबंधी अनेक विकार होतात. फुप्फुसातील धमन्यांमधे विकार निर्माण होऊन त्याचा परिणाम श्वसन प्रणालीवर होतो. यासाठी फुप्फुसातील धमन्यांचं आरोग्य व्यवस्थित राखणं ही आवश्यक बाब. सध्या कोरोना संसर्गाच्या काळात तर फुप्फुसांचं आरोग्य जपण्याला खूप महत्त्व आहे. दोरीवरच्या उड्या मारुन ते साध्य होतं. दोरीवरच्या उड्या मारल्यानं शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. त्यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता सुधारते.
  •  भविष्यात हाडासंबंधीचा ऑस्टिओपोरोसिस हा गंभीर आजार होऊ द्यायचा नसेल तर दोरीवरच्या उड्या मारणं ही गरज आहे. हाडांची घनता यावर एक अभ्यास प्रकाशित झाला. या अभ्यासात मुलींचे दोन गट केले गेले. एका गटाला नियमित दोरीवरच्या उड्या मारण्याचा व्यायाम करायला सांगितलं आणि दुसर्‍या गटाला दोरीवरच्या उड्या मारायला सांगितलं नाही. काहे दिवसांनी याच्या परिणामांचा अभ्यास केला असत असं आढळून आलं की ज्या मुलींच्या गटांनी नियमित दोरीवरच्या उड्या मारण्याचा व्यायाम केला त्यांची हाडांची घनता वाढलेली दिसून आली. हाडांची घनता चांगली असेल तर ऑस्टिओपोरोसिस हा आजार होत नाही. म्हणूनच दोरीवरच्या उड्या निय्मित मारण्याचा सल्ला महिलांना दिला जातो.
  • आपल्या शारीरिक हालचालींचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. यासंदर्भात झालेला एक अभ्यास सांगतो की जी लोकं शरीराची खूप किंवा पुरेशी हालचाल करत नाही त्यांना नैराश्याचा आजार जडण्याची शक्यता जास्त असते. दोरीवरच्या उड्यांमुळे नैराश्याची लक्षणं कमी होत असल्याचंही अभ्यासकांना आढळून आलं आहे. दोरीवरच्या उड्या नियमित मारल्यानं शरीराला चांगले कष्ट पडतात. शारीरिक हालचाली सुधारण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा पर्याय उत्तम मानला जातो.
  • दोरीवरच्या उड्या मारल्याने गुडघे, नितंब, खांदे यांचे सांधे उत्तम आणि वेगानं काम करतात. त्यामुळे शरीराच्या हालचाली सहज होतात. सांधे, स्नायू आणि शरीर लवचिक ठेवण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणं हा प्रभावी व्यायाम समजला जातो.

दोरीवरच्या उड्या कशा माराव्यात

 

 

  • उड्या मारताना दोन्ही पाय एकदम उचलून उड्या मारणं हे योग्य समजलं जातं. ज्यांनी नुकतीच दोरीवरच्या उड्या मारण्याच्या व्यायामाला सुरुवात केली आहे त्यांनी दोन्ही पाय उचलून उड्या मारणं योग्य समजलं जातं.
  • एका पायावर दोरीच्या उड्या मारुनही व्यायाम होतो. पण हा प्रकार करण्यासाठी भरपूर सरावाची गरज असते. एका पायावर दोरी उड्या मारताना संपूर्ण शरीराचा तोल एकाच पायावर सांभाळत उड्या माराव्या लागतात.
  • सकाळी केलेला व्यायाम जसा उत्तम मानला जातो त्याचप्रमाणे सकाळी दोरीवरच्या उड्य मारणं फायदेशीर असतं. यामुळे संपूर्ण शरीरातील रक्त प्रवाह नीट होतो. तसेच सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारल्या तरी चालतं.
  • तज्ज्ञांच्या मतानुसार रोज 10-15 मिनिटं दोरीवरच्या उड्या मारल्यानं शरीरातील 200-250 उष्मांक जळतात.
  • रिकाम्या पोटी दोरीवरच्या उड्या मारु नये यामुळे पोट दुखतं असं तज्ज्ञ म्हणतत. दुपारच्या जेवणानंतर दोन तास दोरीवरच्या उड्या मारु नये. दोरीवरच्या उड्या एकदम न मारता आधी थोडा दुसरा व्यायाम करावा. यातून दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी शरीर तयार होतं.