Join us  

हे ‘असं’ चालून पहा, व्यायामाचा कंटाळा तर दूर पळेलच पण आयुष्यही वाढेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 7:41 PM

स्वत:ला फिट ठेवायचं तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. पण व्यायामाला जर मूडच लागत नसेल तर करायचं काय? तर तज्ज्ञ म्हणतात की सरळ ब्रिस्क वॉक करा. ब्रिस्क वॉकनं व्यायामाचा मूडही परतेल आणि वजन वाढण्यास प्रतिबंध होईल तसेच वाढलेलं वजन कमी होण्यास मदतही होईल.

ठळक मुद्देपिटसबर्ग विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार ब्रीस्क वॉकचा उपयोग वजन कमी होण्यासाठी होतो हे सिध्द झालं आहे.ब्रिस्क वॉक आणि मानसिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्यांना आढळून आलं की ज्या लोकांना नैराश्याचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून तीन ते चार वेळेस ३० मीनिटं ब्रिस्क वॉक केल्यास त्यांचा मूड सुधारतो.ब्रिस्क वॉकमुळे स्थूलता, जीवनशैलीशी निगडित मधुमेह, हायपर टेंंशन सारख्या आजारांचाही धोका टळतो.

कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊनमुळे रोजच्या दैनंदिन व्यवहारावर आलेले निर्बंध यामुळे एका जागी बसून राहाण्याची सवय वाढली आहे. यामुळे शरीराच्या समस्येसोबतच मानसिक आजारही डोके वर काढू लागला आहे. याकाळात वजन वाढण्याचा धोका सर्वात जास्त आहे. म्हणूनच स्वत:ला फिट ठेवायचं तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. पण व्यायामाला जर मूडच लागत नसेल तर करायचं काय? तर तज्ज्ञ म्हणतात की सरळ ब्रिस्क वॉक करा. ब्रिस्क वॉकनं व्यायामाचा मूडही परतेल आणि वजन वाढण्यास प्रतिबंध होईल तसेच वाढलेलं वजन कमी होण्यास मदतही होईल.

पिटसबर्ग विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानूसार ब्रीस्क वॉकचा उपयोग वजन कमी होण्यासाठी होतो हे सिध्द झालं आहे. त्यांनी जास्त वजन असलेल्यांवर प्रयोग केला. त्यांना रोज काही आठवडे ३० ते ६० मिनिटं चालण्यास सांगितलं. या प्रयोगातून हे सिध्द झालं की जीवनशैलीत इतर कोणताही बदल न करता केवळ ब्रीस्क वॉकच्या सहाय्यानं त्यांनी आपलं वजन कमी केलं. 

एका अमेरिकन अभ्यासात असं आढळून आलं की आठवड्यातून किमान चार तास ब्रिस्क वॉक केल्यानं वजन जास्त वाढत नाही. ब्रिस्क वॉकचा केवळ वजनावरच परिणाम होतो असं नाही तर कोलोरॅडो विद्यापीठानं नं केलेल्या अभ्यासानूसार ब्रिस्क वॉकमूळे धमन्यांसंबधित आजाराला प्रतिबंध होतो. मॅसॅच़्यूएटस विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात जे रोज ब्रिस्क वॉक करतात त्यांना बसून राहाण्याऱ्यांच्या तुलनेत २५ टक्के कमी प्रमाणात सर्दी तापाचा त्रास होतो. ब्रिस्क वॉक हा वजन पेलवणारा व्यायाम आहे. त्यामुळे या व्यायामानं ऑस्टोपोरोसिससारखे हाडांचे आजार होत नाही. ब्रिस्क वॉकमुळे हाडं बळकट होतात.

ब्रिस्क वॉक आणि मानसिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्यांना आढळून आलं की ज्या लोकांना नैराश्याचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून तीन ते चार वेळेस ३० मिनिटं ब्रिस्क वॉक केल्यास त्यांचा मूड सुधारतो. ब्रिस्क वॉकमुळे स्व प्रतिमा सुधारण्यास आणि आत्म विश्वास वाढण्यास फायदा होतो. तज्ज्ञ सांगतात की आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर रोज किमान दहा हजार पावलं म्हणजे पाच किलोमीटर चालावं. पण वजन कमी करण्यासाठी केवळ दहा हजार पावलं चालून भागणार नाही तर किमान रोज सोळा हजार पावलांची ब्रिस्क वॉक करणं गरजेचं आहे

ब्रिस्क वॉकमुळे स्थूलता, जीवनशैलीशी निगडित मधुमेह, हायपर टेंंशन सारख्या आजारांचाही धोका टळतो. ह्ळूहळू सूरुवात करुन इतर व्यायामांसारखं ब्रिस्क वॉकच्या अंतर, कालावधी आणि वेगात थोडी वाढ केल्यास त्याचा परिणाम म्हणून वजन कमी होतं. तज्ज्ञ म्हणतात दर दोन आठवड्यांनी पाच मिनिटं ब्रिस्क वॉकचा कालावधी वाढवत न्यावा. तीन महिन्यांनी वजनावर परिणाम दिसतो.

ब्रिस्क वॉक परिणामकारक आहे. पण त्याचं तंत्र समजून घ्यायला हवं. शिस्तबध्द चालणं. चालणं असं जे पळण्यापेक्षा हळू आणि सामान्य चालण्यापेक्षा थोडं जास्त वेगानं म्हणजे ब्रिस्क वॉक. ब्रिस्क वॉक म्हणजे असं चालणं ज्यात चालताना बोलत असू तर दम लागत नाही. आणि जर चालता चालता दम लागून तोंडातून शब्दही फुटत नसेल तर मग ते ब्रिस्क वॉकिंग नाही हे समजावं असं तज्ज्ञ म्हणतात.

ब्रिस्क वॉकिंगचे पाच नियम१ चालताना डोकं खाली झुकलेलं नसावं. ते वर असावं. समोर बघत चालावं.२ चालताना खांद्यावर ताण नको. खांदे हे सैल सोडलेले असावे. चालताना मान , पाठ ही वाकलेली नसावी.३ चालतान पोटाचे स्नायू घट्ट असावे आणि पाठ ताठ असावी.४ चालताना टाचेवरुन पावलावर भार टाकत पाय उचलावा. एक स्थिर वेगानं चालावं. वेगात चढ उतार नकोत५ चालताना हळुवारपणे हात हलवावेत.