Join us  

व्यायाम करता मग पंधरा दिवस ब्रेक, मग परत सुरु असं करता तुम्ही? मग वाचा, हे ‘ब्रेक’ घेणं किती धोक्याचं आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 5:22 PM

दोन आठवड्यांचा व्यायाम विराम आपलं काय नूकसान करणारं असं अनेकांना वाटतं. पण या विषयावर झालेला अभ्यास व्यायामात इतका मोठा ब्रेक घेऊ नका असं सुचवतो. 

ठळक मुद्देदोन आठवड्यांपेक्षा जास्त व्यायाम विराम झाल्यास जास्तीच्या रक्तप्रवाहाला हाताळण्याची हदयाची क्षमता कमी होते.व्यायामात दीर्घ विराम घेतल्यास स्नायू हे अशक्त होतात. स्नायुंमधे ताण सहन करण्याची शक्ती राहात नाही.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर जाण्याची आणि मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी व्यायामाचं महत्त्व निर्विवाद आहे. हे महत्त्व सगळ्यांना मान्यही असतं. पण कृतीचं काय? अनेकजण हुक्की आली तर व्यायाम करतात . कंटाळा आला तर सरळ ब्रेक घेतात. एक आठवडा सलग व्यायाम करतात आणि पुढे दोन आठवडे व्यायामाला बूट्टी मारतात. व्यायामातला हा अनियमितपणा वरवर सहज आणि सवयीचा भाग वाटत असला तरी त्याचा आरोग्यावर मात्र विपरित परिणाम होतो. व्यायामात सातत्य हवं, नियमितता हवी असं म्हणूनच तज्ज्ञ आणि डॉक्टर्स सांगत असतात. दोन आठवड्यांचा व्यायाम विराम आपलं काय नुकसान करणारं असं अनेकांना वाटतं. पण या विषयावर झालेला अभ्यास व्यायामात इतका मोठा ब्रेक घेऊ नका असं सुचवतो. नियमित व्यायामानं शरीरानं जे कमावलेलं असतं ते सर्व या मोठ्या व्यायाम विरामामुळे गमावलं जातं. हदय, स्नायू आणि इन्शूलिन संवेदनशिलता यावर मोठ्या व्यायाम विरामाचा गंभीर परिणाम होतो असं अभ्यासात आढळून आलं आहे.

प्रदीर्घ व्यायाम विरामाचा परिणाम

- रोज व्यायाम करणं हे हदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. पण दोन आठवड्यांपेक्षा जास्त व्यायाम विराम झाल्यास जास्तीच्या रक्तप्रवाहाला हाताळण्याची हदयाची क्षमता कमी होते. त्याचं प्रमाणेव ऑक्सिजनचा उपयोग करण्याची क्षमता कमी होते. हदयाची ही क्षमता सलग दोन ते तीन महिन्यांच्या व्यायामातून कमवावी लागते. जी पंधरा दिवसांच्या व्यायाम विरामामुळे कमी होत असल्याचं अभ्यासकांना आढळून आलं.

- नियमित व्यायाम करणा-यांच्या स्नायुंना एक विशिष्ट घडण प्राप्त होते. स्नायुंमधे ताकद ही व्यायामाने येते. पण व्यायामात दीर्घ विराम घेतल्यास स्नायू हे अशक्त होतात. स्नायुंमधे ताण सहन करण्याची शक्ती राहात नाही.

- व्यायामानं शरीर सुडौल बनतं. पण सलग काही आठवडे व्यायाम चुकवला तर शरीराचा आकार बदलायला लागतो. शरीराला सुडौलता प्राप्त होण्यासाठी वर्षानुवर्षाची व्यायाम मेहनत लागते. पण या मेहनतीवर पाणी फिरवण्यासाठी केवळ दोन आठवड्यांची व्यायाम ब्रेक पुरेसा असतो. नियमित व्यायाम करताना आपण आहाराकडेही सजगतेनं पाहात असतो. पण व्यायामात ब्रेक घेतलेला असेल तर त्या काळात खाण्यापिण्यावरचं नियंत्रण जात असल्याचंही अभ्यासकांना आढळून आलं आहे. त्याच परिणाम म्हणजे वजन वाढून शरीराचा आकारही बेढब होऊ लागतो.

- खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातील साखर वाढते. मग स्नायू आणि इतर पेशी ऊर्जेसाठी ही साखर शोषून घेतात. जेव्हा नियमित व्यायाम केला जातो तेव्हा स्नायू आणि पेशी ही साखर शोषण्याचं काम व्यवस्थित करत असतात. पण व्यायामात दोन आठ्वड्यांपेक्षा जास्त ब्रेक घेतला तर मात्र हे कार्य बिघडतं. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर जाण्याची आणि मधुमेह होण्याची शक्यता वाढते. हा धोका तरुणांमधे व्यायामातल्या ब्रेकमुळे असतो असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.