Join us  

व्यायाम करता की उरकता? व्यायामाच्या शेवटी  'कुल डाऊन' टाळल्यास त्रास अटळ.. ३ गोष्टी मोलाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 7:50 PM

कुलडाऊन व्यायामाच्या शेवटी गरजेचंच. ते केलं नाही तर आपण जो व्यायाम करतो त्याला काहीही अर्थ उरत नाही, त्याचा काहीही फायदा होत नाही आपण करत असलेल्या व्यायामाचा पूर्ण फायदा शरीराला होण्यासाठी कुल डाऊन करताना काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाव्यात आणि व्यायाम करताना त्याचा अवलंब करावा.

ठळक मुद्देव्यायामानंतर शरीराला सामान्य तापमानात यायला आणि शरीर स्थिर व्हायला थोडा वेळ लागतो. म्हणून व्यायामाच्या शेवटी आवश्यक तो वेळ कुल डाऊनसाठी दिला जायला हवा.कुल डाऊन करणं म्हणजे व्यायाम करताना हळूहळू थांबणं एकदम थांबणं नव्हे.कुल डाऊनमधे स्ट्रेचिंगचा उल्लेख आवर्जून केला जातो. कारण स्ट्रेचिंग केल्यानेच स्नायुंमधे होणाऱ्या वेदना कमी होतात.

व्यायाम हा आपल्या दिनचर्येचा भाग असायला हवा इतकं व्यायामाला महत्त्व आहे. फिटनेससाठी व्यायाम महत्त्वाचा. पण व्यायाम म्हणजे उरकून टाकण्याची गोष्ट नव्हे. व्यायामासाठी एक निश्चित वेळ ठरवून शिस्तबध्द व्यायाम केला तर त्याचा फिटनेससाठी उपयोग होतो. शिस्तबध्द व्यायाम म्हणजे व्यायामाआधी वॉर्मअप, व्यायाम , शेवटी स्ट्रेचिंग आणि कुल डाऊन. व्यायामाच्या साखळीतील या सर्व क्रिया महत्त्वाच्या. घाई आहे म्हणून अनेकजण वॉर्मअप न करताच व्यायामाला सुरुवात करतात. त्याचा परिणाम व्यायाम नीट न होण्यावर होतो. तर अनेकांना व्यायामाच्या शेवटी स्ट्रेचिंग आणि कुल डाऊनचं महत्त्वच वाटत नाही. स्ट्रेचिंग आणि कुल डाऊन हे जर व्यायामाच्या शेवटी केलं नाही तर आपण जो व्यायाम करतो त्याला काहीही अर्थ उरत नाही, त्याचा काहीही फायदा होत नाही. स्ट्रेचिंग आणि कुल डाऊन या क्रिया जर टाळल्या तर स्नायुदुखी, चमका येणं यासारखे त्रास उदभवू शकतात. आपण करत असलेल्या व्यायामाचा पूर्ण फायदा शरीराला होण्यासाठी स्ट्रेचिंग आणि कुल डाऊन करताना काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाव्यात आणि व्यायाम करताना त्याचा अवलंब करावा.

Image: Google

कुल डाऊन करताना..

१. व्यायामाच्या शेवटी शरीर सामान्य तापमानाला येणं, हदयाचे ठोके सामान्य गतीनं चालणं यासठी कुल डाऊन केलं जातं. व्यायामानंतर शरीराला सामान्य तापमानात यायला आणि शरीर स्थिर व्हायला थोडा वेळ लागतो. म्हणून व्यायामाच्या शेवटी आवश्यक तो वेळ कुल डाऊनसाठी दिला जायला हवा. जर आपण एक तास व्यायाम करणार असू तर त्यातील पहिली ५-७ मिनिटं वॉर्म अपसाठी, त्यानंतर ४०-४५ मिनिटांचा व्यायाम आणि शेवटची ५--१० मिनिटं कूल डाऊनसाठी ठेवणं अपेक्षित आहे. कुल डाऊनमधे स्ट्रेचिंग ते फॉम रोलिंगसारखे व्यायाम करायला हवेत.

२. कुल डाऊन करणं म्हणजे व्यायाम करताना हळूहळू थांबणं एकदम थांबणं नव्हे. व्यायाम करताना हे असं एकदम थांबून घेतल्यानं आपलं शरीर कुल डाऊन होईल असं वाटणं चुकीचं आहे. कुल डाऊन करताना आपण जेव्हा स्ट्रेचिंग किंवा फॉम रोलिंगसारखे व्यायाम प्रकार करतो तेव्हा शरीराचं तापमान , हदयाचे ठोके हळूहळू पूर्वपदावर येतात. त्यामुळे व्यायाम करताना एकदम थांबून आपल्या रोजच्य्या कामाल भिडणं चुकीचं आहे. म्हणजे जर आपण रनिंगचा व्यायाम करत असू तर मग शेवटी कुल डाऊन करताना जॉगिंग करावी, मग थोडं वेगानं चालावं, त्यानंतर हळूहळू चालावं आणि मग थांबावं. व्यायाम करताना एकदम थांबून घेणं हे योग्य नाही असं फिटनेस तज्ज्ञ सांगतात.

Image: Google

३. कुल डाऊनमधे स्ट्रेचिंगचा उल्लेख आवर्जून केला जातो. कारण स्ट्रेचिंग केल्यानेच स्नायूंमधे होणाऱ्या वेदना कमी होतात. पण काहींच्या लेखी या स्ट्रेचिंगला काहीच महत्त्व नसतं. त्यामुळे ते स्ट्रेचिंग करत नाही. त्याचा परिणाम म्हणजे काही काळानंतर ते व्यायाम करणं सोडून देतात. कारण स्नायुंना होणाऱ्या वेदना. या वेदना व्यायायाम झाल्यानंतर स्ट्रेचिंग न केल्यानं होतात. व्यायामानंतर शेवटी प्रत्येक स्नायुंसाठी १५ ते ३० सेकंद स्ट्रेचिंगचा व्यायाम महत्त्वाचा असतो. अर्थात स्ट्रेचिंग हे मुळातच व्यायामानं स्नायू न दुखण्यासाठी करतात. पण जर स्ट्रेचिंग करताना स्नायुंमधे वेदना होत असतील तर मग आधी डॉक्टरांकडे जावून हे का होतं  ते समजून घ्यायला हवं.,