Join us  

Anti aging exercise: करा हे 4 अँण्टि एजिंग व्यायाम आणि दिसा कायम तरुण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 5:40 PM

कोणत्याही स्त्रीला आपल्या चेहेर्‍यावरुन आपलं वय कळू नये असं वाटत असतं. पण धावपळ, ताणतणाव यामुळे पस्तीशीच्या आतच चेहेर्‍यावर चाळीशीच्या खुणा दिसू लागतात. त्या दिसू नये म्हणून व्यायाम करा!

ठळक मुद्देसिंहमुद्रा केल्यास चेहेर्‍यावरील सुरकुत्या गायब होतात.सिंहमुद्रा नियमित केल्यास ब्युटी पार्लरमधे जाऊन फेशियल करण्याची गरज पडत नाही.कपालभाति केल्यानं चेहेर्‍यावर तेज येतं.छायाचित्रं- गुगल

सदैव तरुण दिसता यावं यासाठी औषध नाही पण व्यायाम आहे. वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. दिवसागणिक आपलं वय वाढतच असतं. वाढतं वय कसं आणि किती लपवणार? पण कोणत्याही स्त्रीला आपल्या चेहेर्‍यावरुन आपलं वय कळू नये असं वाटत असतं. पण धावपळ, ताणतणाव यामुळे पस्तीशीच्या आतच चेहेर्‍यावर चाळीशीच्या खुणा दिसू लागतात.वय वाढत असलं तरी आपलं वय आपल्या चेहेर्‍यावरही दिसावं असा काही नियम नाही. उलट आता तर चेहेर्‍यावरुन वय कळूच नये म्हणून काय करता येईल याच्या शोधात असतात महिला. आपला चेहेरा तरुण दिसण्यासाठी आहार विहार जितका महत्त्वाचा आहे तितकाच व्यायामही. शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी व्यायाम महत्त्वाचा असतो. चेहेरा तरुण दिसायचा असेल तर चेहेर्‍यासाठीचेही खास व्यायाम आहेत. योगसाधनेत चेहेर्‍याच्या स्नायुंचा व्यायाम व्हावा यासाठी खास मुद्रा आणि व्यायाम प्रकार आहेत. ते रोज केल्यास आपला चेहेरा दीर्घकाळ तरुण दिसेल.

छायाचित्र- गुगल

सिहंमुद्रा

 सिंहमुद्रा केल्याने चेहेर्‍याचे स्नायू, डोळे ताणले जातात. सिंहमुद्रा नियमित केल्यास ब्युटी पार्लरमधे जाऊन फेशियल करण्याची गरज पडत नाही. चेहेर्‍यावरील सुरकुत्या या मुद्रेने गायब होतात. सिंहमुद्रा केल्याने मानेची त्वचा घट्ट होते. त्यामुळे वयानुसार ती सैल सुटत नाही. सिंहमुद्रा करण्यासाठी वज्रासनात बसावं . दोन्ही हात जमिनीवर ठेवावेत. आणि मोठ्याने आवाज करत जितकी शक्य आहे तितकी जीभ बाहेर काढावी. मग भुवयांकडे बघत एक मिनिट त्याच अवस्थेत राहून श्वास घेत रहावं. नंतर सामान्य स्थितीत यावं.

गाल फुगवणे

गाल फुगवण्याच्या व्यायामानेही त्वचा ताणली जाते. हा व्यायाम करण्यासाठी आधी दीर्घ श्वास घ्यावा आणि शक्य होईल तितकी तोंडात हवा भरुन गाल फुगवावेत. या अवस्थेत अर्धा ते एक मिनिट रहावं. त्यानंतर नाकानं श्वास सोडावा. यामुळे गालावरची त्वचा घट्ट होते. आणि त्वचेवर सुरकुत्या पडत नाही.

छायाचित्र- गुगल

कपालभाति

अनेकदा वयामुळे नाही तर ताण तणावामुळे वयाआधीच चेहेर्‍यावर वय दिसायला लागतं. ही समस्या दूर करण्यासाठी कपालभातिचा चांगला उपयोग होतो. कपालभाति हा प्राणायमचा एक प्रकार आहे. तो श्वासाचा व्यायाम हे. कपालभाति करताना डोक्यातला ऑक्सिजनप्रवाह चांगला होतो. डोक्यातल्या नसा मजबूत होतात. शिवाय या व्यायामानं चेहेर्‍यावर तेज येतं.कपालभाति करण्यासाठी पद्मासनात किंवा सुखासनात ध्यान मुद्रेत बसावं. आणि डोळे मिटून सलग श्वास सोडत रहावा. श्वास सोडताना पोट आत घ्यावं. श्वास सोडताना पोटाला झटका बसतो. या व्यायामानं पोटही आत जातं आणि त्वचाही चांगली होते.

मानेचा व्यायाम

वयानुसार मानेच्या सौंदर्यातही फरक पडतो. ती बसकी किंवा फुगलेली दिसू लागते.मानेवरही वयाच्या खुणा दिसतात. म्हणूनच मानेचा व्यायाम करणंही आवश्यक आहे.मानेचा व्यायाम करताना आधी डोकं डाव्या बाजूस नेऊन खांद्याच्या दिशेनं झुकवावं. आपले कान खांद्याला टेकतील अशा प्रकारे डोकं खाली न्यावं. पण हे करताना खांदे वर उचलू नये. कान खांद्याला टेकले की मग उजवा हात वर न्यावा आणि हळु हळु खाली आणत जमिनीवर ठेवावा. मानेच्या या व्यायामानं खांद्याचे स्नायू ताणले जातात आणि मानेवरची चरबी कमी होते.