Join us  

आपली स्माइल खास नाही, अजिबात फोटो चांगले येत नाही असा कॉम्प्लेक्स छळतो तुम्हालाही? - मग हे वाचाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2021 1:57 PM

आपली स्माइल काही खास नाही म्हणून अजिबात मोकळेपणानं न हसणाऱ्या, फोटो काढणं टाळणाऱ्या सर्वांसाठी खास टिप्स..

ठळक मुद्देतुमच्या चेहऱ्यावरची स्माइल तुम्हाला तर आनंद देतेच पण समोरच्या व्यक्तीलाही सुखावून जाते आपण कितीही ताणतणावात असलो तरी एक स्माइल तुमचा हा ताण घालवायला पुरेशी असते.

Smile on face is real ornament without ant cost असे म्हटले जाते, पण हीच स्माइल देताना अनेकदा आपण खूप विचार करतो. मोफत असलेली ही स्माइल अनेक कठीण प्रसंगातही महत्त्वाचे काम करते. दिवसभर आपण कितीही ताणतणावात असलो तरी एक स्माइल तुमचा हा ताण घालवायला पुरेशी असते. आपण कोणत्या विचारात असू आणि समोर एखाद्या लहान बाळानी आपल्याला निरागसपणे एक स्माइल दिली तर आपल्या डोक्यातील विचार नकळत मागे पडतात आणि काही काळासाठी का होईना आपल्याला रिलॅक्स वाटते. ऑक्टोबर महिन्याचा पहिला शुक्रवार जागतिक स्माइल डे म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने आपण स्माइलविषयी बोलणार आहोत. कमर्शिअल आर्टीस्ट असलेल्या हार्वे बॉल याने स्माइलचा सिम्बॉल तयार केला. तेव्हापासून हा सिम्बॉल जगभरात प्रसिद्ध झाला. १९९९ मध्ये जगभरात स्माइल डे सुरु करण्यात आला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो.

एखाद्या कठिण प्रसंगात आई-वडिलांनी किंवा घरातील वरिष्ठांनी आपल्याला दिलेली एक स्माइल आपल्या डोक्यावरचे ओझे कमी करण्याचे काम करते. तर कित्येकदा रस्त्यात एखाद्या आजी-आजोबांनी तुम्हाला सहज दिलेली स्माइल तुम्हाला आश्वासक आणि प्रेरणा देणारी ठरु शकते. तुमच्या चेहऱ्यावरची स्माइल तुम्हाला तर आनंद देतेच पण समोरच्या व्यक्तीलाही सुखावून जाते आणि वातावरण हलके करायला मदत करते. तुम्ही एक स्माइल दिली तर चेहऱ्याच्या २६ स्नायूंचा त्यामुळे व्यायाम होतो, यामुळे हे स्नायू बळकट होण्यासही मदत होते. अनेकदा आपली स्माइल चांगली नाही असे काही जणींना वाटते. त्यामुळे त्या स्माइल देताना खूपदा विचार करतात. पण प्रत्येक स्माइल ही स्माइलच असते आणि ती निश्चितच तुमच्या सौंदर्यात भर घालत असते. 

त्यामुळे आपली स्माईल छान नाही हा कॉम्प्लेक्स मनातून काढून टाका. हसा मोकळेपणानं..

आणि बघा की, तुम्ही खुलेपणानं न हसण्याची यापैकी कोणती कारणं आहेत..

( Image : Google)

१. दात पुढे असणे - काही जणींना आपले दात पुढे आहेत असे वाटते तर काहींना पुढचे दोन दात बनी टूथ म्हणजे सश्यासारखे आहेत असे वाटते. त्यामुळे आपण हसलो तर हे दात दिसतील असे वाटून या मुली किंवा महिला हसणे टाळतात. यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने काही उपाययोजना करता येऊ शकतात. दातांना क्लिप लावून ते मागे घेण्यासारखे उपाय सध्या दंतशास्त्रामध्ये सहज उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या उपायाची योग्य ती चौकशी करुन तुम्ही तुमची स्माईल न घाबरता देऊ शकता.

२. हिरड्यांची ठेवण - काही महिलांमध्ये हिरड्यांची ठेवण मोठी असते. अशावेळी आपण हसलो तर आपल्या हिरड्या जास्त दिसतील म्हणून हसणे किंवा स्माइल देणे टाळले जाते. मात्र प्रत्यक्षात असे नसते. प्रत्येक स्माइल ही तितकीच सुंदर असते. आपल्या चेहऱ्याची ठेवणच तशी असल्याने त्यावर फारसा आक्षेप घेतला जात नाही. मात्र आपणच याबाबत उगाच विचार करतो.

( Image : Google)

३. ओठांचा आकार - आपल्या ओठांचा आकार मोठा आहे किंवा ते जास्त पसरट आहेत म्हणून काही वेळा स्माइल देताना विचार केला जातो. पण असा विचार करणे तितके योग्य नाही. तुमची स्माइल ही तुमच्या सौंदर्यात भरच घालत असते. ओठ सतत कोरडे पडत असतील तरीही स्माईल दिली जात नाही. याचे कारण स्माइल देताना ओठ फाकतात आणि त्याची आग होते किंवा ओठाची त्वचा निघाल्याने ते दिसायला चांगले दिसत नाही. मात्र यासाठी ओठ मऊ राहतील याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.४. दातांच्या तक्रारी - काही महिलांमध्ये दातांमध्ये फटी असतात, काहींच्या दातांवर डाग असतात. काही वेळा दात वेडेवाकडे असण्याची शक्यता असते. अशावेळी स्माइल देणे टाळले जाते. मात्र यावर वेळीच योग्य ते उपाय केल्यास तुमची हरवलेली स्माइल तुम्ही परत मिळवू शकता.

आणि हे सारं नाही केलं तरी, आपली जी स्माइल आहे ती मस्त आहे.. आपण स्माइल करू आनंदाने.. टेंशन नाही घ्यायचं.

टॅग्स :ब्यूटी टिप्सदातांची काळजी