Join us  

म्हणा, मै अपनी फेवरिट हूं ! तू सुंदर नाहीस असं कोण सांगतं आपल्याला ? कोण ठरवतं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 2:53 PM

रुढार्थाने सुंदर नसलेली एखादी अगदी जेमतेम अवतारातही खूप सुंदर दिसते, तिला सुंदर दिसण्याचा नेमका कोणता मंत्र सापडलेला असतो?

ठळक मुद्दे तिला जे हे स्वत:चं फेवरिट होणं जमतं ते आपल्याला का नाही जमत ?

गौरी पटवर्धन

आपल्या आजूबाजूच्या सगळ्या ‘ब्यूटी क्वीन्स’ पहा. त्यांच्यात जनरली एक गोष्ट कॉमन आहे असं आपल्या लक्षात येतं. ती म्हणजे या सगळ्या जणी बहुतेक वेळा स्वतःवर खूष असतात. त्या जशा आहेत तसं त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं असतं. सौंदर्याची जी काही परिमाणं संस्कृतीने किंवा बाजारपेठेने ठरवलेली आहेत त्यात त्या बसत असतील किंवा नसतीलही. त्या चौकटीत आपण बसत नाही हे ही त्यांना अनेकदा माहिती असतं. पण त्याच वेळी त्यांना हेही माहिती असतं, की असं कोणीही स्टॅंडर्ड चौकटीत सुंदर असू शकत नाही. कदाचित त्यांच्या त्वचेचा रंग, बांधा त्यांच्या मनाप्रमाणे नसेल, पण तो जसा आहे तसा त्यांनी स्वीकारलेला असतो. त्यावरून स्वतःला त्रास करून घेणं त्यांनी थांबवलेलं असतं. त्या त्यांच्या फेव्हरिट असतात.

तसं बघितलं तर ‘मनाचं सौंदर्य हेच खरं सौंदर्य’ हे आपण सगळ्याच जणी लहानपणापासून ऐकत आलेल्या असतो. पण हे मनाचं सौंदर्य नेमकं कुठे असतं आणि ते कसं दिसतं हे आपल्याला कधीच कोणी सांगितलेलं नसतं. आपण कायम त्याचा अर्थ असाच घेतलेला असतो की ‘जो मनाने सुंदर तोच खरा सुंदर’. म्हणजेच ज्याचं मन सुंदर तो सुंदर. चांगला विचार करणारे ते सुंदर. अर्थातच हा अर्थ योग्यच आहे. चांगला विचार करणारी माणसं सुंदरच असतात. पण या सुविचाराला अजूनही एक अर्थ आहे, जो आपल्या चटकन लक्षात येत नाही. त्यामुळे शाळेत शिकवलेल्या पाच पन्नास सुविचारांपैकी एक असं आपण त्याला मोडीत काढलेलं असतं. पण हा सुविचार म्हणा नाही तर सल्ला, तो किती महत्वाचा आहे ते आपल्या लक्षात येत नाही.‘मनाचं सौंदर्य हेच खरं सौंदर्य’. म्हणजे काय? तर जी मनातून सुंदर आहे, जिचं मन तिला सुंदर असल्याची ग्वाही देतं ती सुंदर. एकदम साधा अर्थ आहे. आता तुम्ही म्हणाल की मग याचा अर्थ एखादी स्त्री दिसायला सर्व अर्थाने कुरूप असेल आणि तरीही तिचं मन तिला सांगत आहेस की तू सुंदर आहेस, तर ती काय? लगेच सुंदर दिसायला लागणार आहे का?तर हो!

आणि हे जर पटत नसेल, तर आपल्या आजूबाजूच्या असंख्य अशा बायका आठवून बघा ज्या रूढ अर्थाने सुंदर नाहीत, फॅशनेबल नाहीत आणि तरीही त्या सुंदर दिसतात. कुठेतरी भाजी विकणारी बाई, एखाद्या कॉस्मेटिकसच्या दुकानातली सेल्सगर्ल, ऐन बाजारात साडी गुंडाळून, पदर खोचून दोन्ही हातात पिशव्या घेऊन हाश्श हुश्श करत करत चाललेल्या काकू, कुठलातरी कॉलेजचा किंवा बँकेचा रटाळ युनिफॉर्म घातलेली तरुण मुलगी, शेतात काम करणारी एखादी मध्यमवयीन बाई…आपल्या सगळ्यांचंच असं कधी ना कधी होतं, की अशी कोणीतरी कुठेतरी आपल्याला दिसून जाते. ती बाई जाडी, सावळी, सुमार कपडे घातलेली, घामेजलेली, कळकट्ट अवतारातली अशीही असू शकते, पण तरीही ती सुंदर दिसते. असं का होतं?तर एकतर तिच्या मनात आपण कसे दिसतोय हा विचारच आलेला नसतो. किंवा आपण जे दिसतोय ते सुंदरच आहे असं तिच्या मनाने तिला सांगितलेलं असतं. आणि या मनातल्या सौंदर्याचं प्रतिबिंब तिच्या चेहेऱ्यावर पडलेलं असतं.ती बहुदा सांगतअसते, स्वत:लाच मै अपनी फेविरट हूं.मग तिला जे हे स्वत:चं फेवरिट होणं जमतं ते आपल्याला का नाही जमत ? तिचं मन तिला सांगतं की तू सुंदरच आहेस द तसं आपलं मन आपल्याला का सांगत नाही?

टॅग्स :ब्यूटी टिप्स