Join us  

ती beauty queen आणि आपण बोअर बटाटा ? बाकीच्या मुली कायमच कशा इतक्या सुंदर दिसतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 6:30 PM

आपण आपल्या चेहेऱ्याचं जितक्या बारकाईनं निरीक्षण करतो तितकं आपण दिसायला अत्यंत कुरूप आहोत किंवा फार फार तर अति सामान्य आहोत याबद्दल आपली खात्री पटायला लागते.अशातच आपल्या आजूबाजूला आपल्याच वयाच्या काही मुली फार सुंदर आहेत हे लक्षात यायला लागतं.

ठळक मुद्देएखादी तर आत्ताआत्ता पर्यंत बावळट असते, पण अचानक तिला भाव येतो. हा भाव येतो म्हणजे काय?ती किती सुंदर आणि स्टायलिश आहे, तिचा फॅशन सेन्स कसा क्लासी आहे याच्या चर्चा व्हायला लागतात. आणि मग हळूहळू ती जे करेल तो वर्गाचा ट्रेण्ड व्हायला लागतो.

गौरी पटवर्धन

साधारण बारा तेरा वर्षांच्या पुढे ‘सुंदर’ दिसणं फार फार महत्वाचं आहे हे आपले हार्मोन्स काही प्रमाणात आपल्याला शिकवतात. त्यात जे काही कमी असेल ती कमी मित्रमैत्रिणी, टीव्ही, इंटरनेट, ग्लॉसी मॅगझिन्स, युट्यूब व्हिडीओज भरून काढतात आणि मग सुरु होतो एक कधीही न संपणारा प्रवास. रोज सकाळ झाली की आरशात बघायचं. मग आपल्याला चेहेऱ्यावर कुठेतरी एक पिंपल दिसतो, कुठेतरी आधीचा पिंपल नाहीसा करण्याच्या खटपटीत पडलेला खड्डा दिसतो, डोळ्याखालची डार्क सर्कल्स दिसतात, मान काळी झाली आहे असं वाटतं, आपले केस पुरेसे दाट लांब/ सरळ/ कुरळे/ फॅशनेबल नाहीयेत असं वाटायला लागतं. कितीही वेगवेगळ्या आरश्यात, वेगवेगळ्या कोनातून, दिवसाच्या किंवा रात्रीच्या वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रकाशात बघितलं, तरी आपली त्वचा सावळी ती सावळीच दिसते. फार तर फार उजळ सावळी दिसते. पण काही केल्या आपण गोरे दिसत नाही. बरं गोरं नसेल तर निदान छान ग्लोईंग त्वचा तरी असावी… पण छे! आपली त्वचा फार कोरडी किंवा फार तेलकट दिसते. भुवया फार जाड दिसतात. नाक भज्यासारखं दिसतं. हनुवटी फार टोकदार किंवा फार चौकोनी बसकी वाटते. ओठांवर असलेली बारीक लव फुल फ्लेज्ड मिशीसारखी वाटायला लागते…

आपण आपल्या चेहेऱ्याचं जितक्या बारकाईनं  निरीक्षण करतो तितकं आपण दिसायला अत्यंत कुरूप आहोत किंवा फार फार तर अति सामान्य आहोत याबद्दल आपली खात्री पटायला लागते. काय केलं की आपण सुंदर दिसू हे लक्षात येत नाही. हळू हळू असं वाटायला लागतं, की आपण काहीही केलं तरी  या जन्मात सुंदर दिसू शकणार नाही.अशातच आपल्या आजूबाजूला आपल्याच वयाच्या काही मुली फार सुंदर आहेत हे लक्षात यायला लागतं. त्या कशा ऐटीत राहतात हे कळत नाही. एखादी तर आत्ताआत्ता पर्यंत बावळट असते, पण अचानक तिला भाव येतो. हा भाव येतो म्हणजे काय?तर वर्गातली बरीच मुलं तिच्या भोवती फिरायला लागतात. तिला कुठूनही मॅनेज करून नोट्स आणून द्यायला लागतात. तिला घरी जातांना सोबत करण्यासाठी चढाओढ लागते. ती किती सुंदर आणि स्टायलिश आहे, तिचा फॅशन सेन्स कसा क्लासी आहे याच्या चर्चा व्हायला लागतात. आणि मग हळूहळू ती जे करेल तो वर्गाचा ट्रेण्ड व्हायला लागतो. ती कुठून शॉपिंग करते याची माहिती काढली जाते. ती ज्या पार्लरमध्ये जाते त्या पार्लरची गिऱ्हाइकी अचानक वाढू लागते. ती ज्या ब्रॅण्डची स्किन केअर प्रॉडक्ट्स किंवा मेकअपचं सामान वापरते ते सगळ्यांकडे दिसायला लागतं… पण तिला फॉलो करणाऱ्या बहुतेक मुलींच्या मते ती मुळात फार ओव्हररेटेड आणि हाइप्ड असते.‘ती सुंदर वगैरे काही नाहीये, नुसतीच धप्प गोरी आहे.’‘नुसतीच बारीक आहे.’‘स्लीव्हलेस आणि लो नेक असलेले कपडे घालते म्हणून… नाहीतर आहे काय तिच्यात बघण्यासारखं?  ’असं तिच्याबद्दल समस्त पोरींचं म्हणणं असतं. मग तरीही ती एवढी ‘सुंदर’ ‘ब्युटी क्वीन’ वगैरे का समजली जाते?