Join us  

स्वेटर घालायचा कंटाळा येतो, मग वूलनचे कुर्ते घाला! थंडीतही दिसा मस्त स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2021 3:15 PM

हिवाळ्यात आपण घातलेले कपडे उठून दिसत नाही अशी अनेकींची तक्रार असते. पण हे मात्र खरं नाही. हिवाळ्यातले खूप थंड दिवस आकर्षक कपडे घालून सहज साजरे करता येतात. त्यासाठीच तर वूलन कुर्ते हा थंडीतल्या कपड्यांचा खास प्रकार आहे. गारठवणार्‍या थंडीतही आपण वूलन कुर्ते वापरुन फॅशनेबल राहू शकतो आणि ऊबदारही.

ठळक मुद्देकॅज्युअल विंटर वेअरसाठी वुलन कुर्ता आणि लेगिन्स ही पेअर योग्य ठरते.वूलन पॅण्टवर कुर्त्या ऐवजी टॉप/ कोट घालता येतो, नाहीतर या पॅण्टवर वूलन कुर्ता छान दिसतो. वूलन कुर्ता जीन्सवर घालायचा असेल तर त्याची लांबी ही कमी असावी.

ऋतुनुसार जसे खाण्यापिण्यात बदल होतात तसेच कपड्यांच्या फॅशनमधेही बदल होतात. पूर्वीच्या तुलनेत आता फॅशन आणि ट्रेण्डचा जास्त विचार केला जातो. त्यामुळे आता हिवाळा आहे तर कोणत्या कपड्यांचा ट्रेण्ड आहे याचा शोध तरुण मुली, बायका घेतच असतात. आपल्या वॉर्डरोबमधे विविध फॅशनचे कपडे असावेत अशी इच्छा बहुतेकजणींची असते. तसेच आपण घातलेले कपडे उठून दिसावेत यासाठी मुली महिला अनेक प्रयत्न करतात. पण थंडीत  कपड्याच्या फॅशनची जरा अडचणच होते असा हिवाळा आणि कपडे याबाबतचा समज आहे. कितीही चांगला आणि वेगळा ड्रेस घातला तरी काय उपयोग, तो तर स्वेटर, जॅकेट खाली झाकलाच जाणार, असा हिरमोड अनेकींचा होतो. पण हिवाळ्यात कपड्यांची फॅशन करता येत नाही, हिवाळ्यात आपण घातलेले कपडे उठून दिसत नाही हे मात्र खरं नाही. हिवाळ्यातले खूप थंड दिवस आकर्षक कपडे घालून सहज साजरे करता येतात. त्यासाठीच तर वूलन कुर्ते हा थंडीतल्या कपड्यांचा खास प्रकार आहे. गारठवणार्‍या थंडीतही आपण वूलन कुर्ते वापरुन फॅशनेबल राहू शकतो आणि ऊबदारही.

Image: Google

ऋतू कोणताही असो, प्रसंग / कार्यक्रम साधा असो किंवा विशेष फॅशन आणि सोय या दृष्टिकोनातून कुर्ते वापरण्याला प्राधान्य दिलं जातं. थंडीतही खास या काळातल्या हवामानाचा विचार करुन वूलन कुर्तींची फॅशन प्रचलित होत आहे. वूलन कुर्ते कशासोबत पेअर केले  म्हणजे उठून दिसतील असा प्रश्न पडला असेल तर त्याला अनेक फॅशनेबल पर्यायही आहेत. वुलन कुर्ते घालण्याची स्टाइल समजून घेतली तर ही फॅशन आपल्याला एक खास आणि मोहक लूक देईल हे नक्की!

Image: Google

वूलन कुर्ते घालताना..

1. वूलन कुर्ते घालण्यासाठी तीन चार पर्याय आहेत. यातला एक नेहमीचा , सोयीचा आणि आता सवयीचा झालेला पर्याय म्हणजे लेगिन्सवर वुलन कुर्ते घालणं. वूलन कुर्ते घालताना त्याला मॅचिंग लेगिन्स घालावी. वुलन कुर्ते आणि लेगिन्स या दोन्ही गोष्टींमुळेही आपला लूक छान दिसतो . कॅज्युअल विंटर वेअरसाठी वुलन कुर्ता आणि लेगिन्स ही पेअर योग्य ठरते. पण एखाद्या खास कार्यक्रमाला जायचं आहे आणि आपल्याला पारंपरिक लूक हवा असेल तर मग वूलन कुर्ते  आणि लेगिन्सवर विरुध्द रंगाची ओढणी किंवा स्टोल खांद्यावर घ्यावी/ घ्यावा. पायात हिल्स किंवा मोजडी घातली की विंटर लूकला आणखीनच स्टायलिश टच मिळतो.

Image: Google

2. पलाझो घातल्याने आपण फॅशनेबल दिसतो. वूलन कुर्त्यावरही पलाझो छान दिसतो. वूलन कुर्तीवर घालायला वूलन पलाझोच हवी असं नाही. किंवा वूलन कुर्त्याला मॅच होणारी वुलन पलाझो घातली तरी चालते. वुलन पलाझोवर वुलन कुर्ता घातल्यानं विशेष काही न करताही स्टायलिश दिसता येतं. अजून फॅशनेबल लूक हवा असल्यास त्यावर लांब कोट घालावा. नोकरी करणार्‍या महिला ऑफिसला जातान ही स्टाइल नक्कीच करु शकतात. वुलन कुर्ता आणि वुलन पलाझो घालणार असाल तर मग त्यासोबत स्कार्फ खांद्यावर असणं गरजेचं आहे. हा स्कार्फ स्टायलिश दिसण्यासाठी तो जरा वेगळ्या पध्दतीने गळ्यात घालावा. यामुळे आपण चारचौघात नक्कीच उठून आणि आकर्षक दिसू.

Image: Google

3. वूलन कुर्ता घालण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे वुलन पॅण्ट घालणं. वुलन पॅण्टवर कुर्त्या ऐवजी टॉप/ कोट घालता येतो, नाहीतर या पॅण्टवर वूलन कुर्ता छान दिसतो. वुलन कुर्त्याचा रंग जर फिकट असेल तर त्याखाली काळ्या रंगाची पॅण्ट घालावी. किंवा वुलन कुर्त्याला मॅच करणारी वुलन पॅण्ट घातली तरी चालते. वुलन पॅण्टवर वुलन कुर्ता घातल्यास गळ्यात किंवा खांद्यावर स्कार्फ असण्याची गरज नाही. हवं तर यावर लांब श्रग घातला तरी चालतो. यामुळे आपण मोहक तर दिसतोच सोबतच स्टायलिश आणि डॅशिंगही वाटतो. फक्त वूलन कुर्त्यावर श्रग घालताना कुर्त्यापेक्षा श्रगची लांब मात्र जास्त हवी.

Image: Google

4. जीन्स तर ऑलटाइम स्टायलिश दिसण्याचा भारी पर्याय आहे. वूलन कुर्त्यावर काय घालावं हे समजत नसेल तर सरळ जीन्स घालावी. फक्त त्यासाठी वूलन कुर्ता लांबीला जरा छोटा हवा. जॅकेट स्टाइलचा वूलन कुर्ता असेल तर त्यावर जीन्सची पॅण्ट आणि पायात बूट हा लूक छान दिसतो. वूलन कुर्ता आणि जीन्सवर ओढणी किंवा स्कार्फ घेण्याची गरज नसते.तसेच अशा प्रकारची स्टाइल केल्यास कानात, गळ्यात, हातात काही घालण्याची गरज नसते.

5.वूलन कुर्ता आणि त्यावर काय घालावं यासाठीचे हे पर्याय खास महिलांसाठी आणि मुलींसाठी आहे. पण कॉलेजात जाणार्‍या तरुणींसाठी वुलन स्कर्ट हा देखील एक चांगला पर्याय आहे. वुलन कुर्ता हा जर वुलन स्कर्टवर घालायचा असेल तर कुर्त्याची लांबी ही कमी असावी. तरच तो स्कर्टवर उठून दिसतो. वूलन कुर्ता आणि वूलन स्कर्टवर वूलन स्टोल किंवा ओढणी छान दिसते.

Image: Google

मोहवून टाकणारी वूलन व्हरायटी

वूलन कुर्ता हा खास थंडीसाठी आणि अति थंडीच्या दिवसांसाठी खास विंटर स्टाइल आहे. वूलन कुर्ते गेल्या दोन तीन वर्षांपासून बरेच ट्रेण्डमधे आहेत. त्यामुळे आता त्यात वैविध्यही खूप आहे. 100 पेक्षा जास्त डिझाइन्समधे हे कुर्ते उपलब्ध आहे.

वूलन कुर्त्यांचे ऊबदार रंग, रंगांच्या विविध छटा आणि वेगवेगळ्या रंगाचे कॉम्बिनेशन हे या वुलन कुर्त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. ऑनलाइन पोर्टलवर वुलन कुर्ते सर्च केल्यास इतकं वैविध्य आहे की काय घ्यावे आणि किती घ्यावेत असा प्रश्न पडावा. वूलन कुर्त्यांसाठी विशेष प्रकारची लोकर वापरली जाते यामुळे हे कुर्ते नेहमीच्या कुर्त्यांपेक्षा थोडे महाग असतात. 1500 ते 3000 च्या रेंजमधे हे कुर्ते मिळतात. 

टॅग्स :फॅशन