Join us  

ऑइल पुलिंग.. हे आहे अनुष्का शर्माच्या फ्रेशनेसचं रहस्य! हे ऑइल पुलिंग म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 1:47 PM

अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती सकाळी तेलाची गुळणी अर्थात ‘ऑइल पुलिंग’ बद्दल सांगते. या ऑइल पुलिंगमुळे तोंडाचं आरोग्य, पोटाचं आरोग्य आणि सौंदर्यास फायदा होतो म्हणून आपण तेलाची गुळणी करतो असं अनुष्का म्हणते. अनुष्काच्या या पोस्टनंतर तेलाची गुळणी यावर चर्चा व्हायला लागली. खरंच असं करणं फायदेशीर असतं का?

ठळक मुद्देदातांची स्वच्छता आणि एकूण आरोग्य यासाठी तेलाची गुळणी हा उत्तम उपाय आहे.नियमित तेलाची गुळणी केल्यास त्वचेवर तेज आणि तजेला येतो.तेलाची गुळणी करणं सोपी आणि उपयुक्त गोष्ट आहे. यासाठी खोबर्‍याचं, तिळाचं, मोहरी किंवा ऑलिव्ह तेलही वापरु शकतो.

त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी, आरोग्यासाठी विविध तेलांचा उपयोग होतो. नैसर्गिक तेल हे सौंदर्यविषयक समस्या दूर करतात आणि आपल्याला नैसर्गिक सौंदर्य देतात. जेव्हा आपण सेलिब्रेटींच्या सौंदर्याकडे बघतो तर आपल्याला ते मिळवणं अशक्य वाटतं. कारण ते सुंदर दिसण्यासाठी महागडी उत्पादनं वापरत असतील असा आपला समज असतो. पण वास्तव तर हेच आहे की अनेक सेलिब्रेटी हे सौंदर्य जपण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचाच उपयोग करतात. त्याबद्दलची माहिती सोशल मीडियवर विविध पोस्टमधून देतात, त्याचे व्हिडीओ तयार करतात. नुकतीच एक पोस्ट अभिनेत्री अनुष्का शर्माने पोस्ट केली आहे. त्यात ती सकाळी तेलाची गुळणी अर्थात ‘ऑइल पुलिंग’ बद्दल सांगते. या ऑइल पुलिंगमुळे तोंडाचं आरोग्य, पोटाचं आरोग्य आणि सौंदर्यास फायदा होतो म्हणून आपण तेलाची गुळणी करतो असं अनुष्का म्हणते. आणि मला जाणवणारे फायदे इतरांनाही कळावेत यासाठी पोस्ट लिहून मी ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते आहे असा अनुष्काचा यामागचा दृष्टिकोन आहे.

अनुष्का म्हणते की, ऑइल पुलिंग ही आयुर्वेदातील प्राचीन प्रथा आहे. याला कवल किंवा गंडुशा म्हणून ओळखलं जातं. हा एक दंत उपचार आहे. ज्यात पोट रिकामं असताना काही मिनिटं तोंडात तेल ठेवून मग गुळणी करायची असते. दात, पोट आणि त्वचेचं सौंदर्य या उपायातून राखलं जातं. या उपायाकडे स्वत:ची काळजी घेण्याचा चांगला पर्याय म्हणून बघायला हवं असं अनुष्का सांगते.अनुष्काच्या या पोस्टनंतर तेलाची गुळणी यावर चर्चा व्हायला लागली. खरंच असं करणं फायदेशीर असतं का? असे प्रश्न उपस्थित होवू लागले. तेव्हा आयुर्वेदिक तज्ज्ञांनी अनुष्का जे सांगतेय ते बरोबर असल्याचं म्हटलं आहे. बंगळुरु येथील जीवोत्तम आयुर्वेद केंद्र येथील वैद्य शरद कुलकर्णी यांनी या तेलाच्या गुळणीबद्दल ( ऑइल पुलिंग) सविस्तर माहिती सांगितली.

 

तेलाच्या गुळ्णीनं काय होतं?

* वैद्य शरद कुलकर्णी म्हणतात की दातांची स्वच्छता आणि एकूण आरोग्य यासाठी तेलाची गुळणी हा उत्तम उपाय आहे. या उपायाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. हा उपाय कधीही केला तरी चालतो. पण सकाळी उठल्यावर ब्रश केल्यानंतर हा उपाय केल्यास त्याचे जास्त फायदे होतात. अनेकजण काही खाल्लं की माउथ फ्रेशनर वापरतात. पण माउथ फ्रेशनर ऐवजी तेलाची गुळणी केल्यास मात्र तोंडाच्या स्वच्छतेसोबतच अनेक फायदे मिळतात.

*  रोज तेलाची गुळणी केल्यास आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहातं. करण तेलाची गुळणी जीवाणू किंवा किटाणुंच आतड्यांना होणारा संसर्ग रोखते. कारण आतड्यांना आणि लिव्हरला तोंडावाटे जीवाणू किंव विषाणूंचा संसर्ग होवू शकतो. पण तेलाच्या गुळणीनं तोंडावाटे आतड्यांना किंवा लिव्हरला होऊ शकणारा संसर्ग रोखला जाऊ शकतो

* -तेलाच्या गुळणीमुळे तोंडातील जीवाणू आणि किटाणू बाहेर पडतात आणि दात आणि हिरडया सुरक्षित रहातात. तेलाच्या गुळणीनं तोंडाची दुर्गंधी निघून जाते.

*  सायनस समस्येपासून सुटका होते.

*  नियमित तेलाची गुळणी केल्यास त्वचेवर तेज आणि तजेला येतो तसेच गालाची त्वचाही घट्ट होते. नैसर्गिक सौंदर्य दीर्घाकाळ टिकतं.

*  तोंडातील छाले , वेदनादायी व्रण या उपायाने जातात.

*  ज्यांना मायग्रेन किंवा दम्याचा त्रास आहे त्यांनाही तेलाच्या गुळणीनं फायदा होतो.

तेलाची गुळणी कशी करावी?

वैद्य शरद कुलकर्णी म्हणतात की तेलाची गुळणी करणं सोपी आणि उपयुक्त गोष्ट आहे. यासाठी खोबर्‍याचं, तिळाचं, मोहरी किंवा ऑलिव्ह तेलही वापरु शकतो. तेलाची गुळणी करतना सर्वात आधी ब्रश करुन घ्यावा. मग तोंडात दोन चमचे तेल टाकाव. एक ते दीड मिनिटं तेल तोंडातच ठेवावं. ते तोंडातल्या तोंडात सर्वत्र फिरवावं. तोंडात सर्व बाजूला तेल पोहोचलं आहे याची खात्री झाली की ते थुंकुन टाकावं. तेल तोंडात फिरवताना गिळू नये. तेल थुंकुन टाकल्यानंतर तोंडात कसंतरी वाटत असेल तर गरम पाण्यानं गुळण्या कराव्यात.