Join us  

करीना- करिश्मा लावतात मॅचा ग्रीन टीचा फेसपॅक! ते नक्की काय असतं? कसा लावावा हा पॅक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 1:17 PM

मॅचा ग्रीन टीमधील अँण्टिऑक्सिडण्टस हे त्वचेसाठी फार उपयुक्त असतात. मुरुमांवरील क्रीमपासून अँंटी एजिंग सीरम अशा कित्येक सौंदर्य उत्पादनांमधे मॅचा टीचा उपयोग केला जातो. घरच्या घरीही मॅचा टीचा उपयोग करुन सौंदर्य वाढवता येतं.

ठळक मुद्देक्लोरोफिलमुळे मॅचाला हिरवा रंग प्राप्त होतो. या घटकाचा तेलकट त्वचेस फायदा होतो. मॅचा टीमधे अ, क, ई, के आणि ब ही जीवनसत्त्वं असतात. ही जीवनसत्त्वं त्वचेतील कोलॅजनची पातळी संतुलित ठेवतात.नैसर्गिकरित्या त्वचा आद्र ठेवण्यासाठी मॅचा टीचा लेप उत्तम पर्याय आहे.

करीना कपूर, करिश्मा कपूर आणि सोहा अली खान या तिघींमधे एक बाब समान आहे. या तिघीजणीही आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मॅचा टी फेस पॅक वापरतात. मॅचा टी हा आता आपल्याकडेही बराच परिचित झालेला आहे. हा एक ग्रीन टीचा प्रकार असून तो जपानी आहे. मॅचा हा बाराव्या शतकापासून जपानी संस्कृतीचा एक भाग आहे. या चहातील पोषक तत्त्वांमुळे तो आता आपल्याकडेही खूप लोकप्रिय झाला आहे. मॅचा चहातील पोषक तत्त्वं हे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी उपयुक्त मानले जातात.

कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीच्या पानांपासून मॅचा चहा बनवला जातो. या वनस्पतींची पानं नैसर्गिकरित्या सुकवली जातात. ही पानं सुकल्यानंतर हातानं कुस्करुन त्याची चहा पावडर तयार केली जाते. त्यामुळे या चहातील नैसर्गिक तत्त्वं सुरक्षित राहातात. या चहामधील अँण्टिऑक्सिडण्टस हे त्वचेसाठी फार उपयुक्त असतात. मुरुमांवरील क्रीमपासून अँंटी एजिंग सीरम अशा कित्येक सौंदर्य उत्पादनांमधे मॅचा टीचा उपयोग केला जातो. घरच्या घरीही मॅचा टीचा उपयोग करुन सौंदर्य वाढवता येतं.क्लोरोफिलमुळे मॅचाला हिरवा रंग प्राप्त होतो. या घटकाचा तेलकट त्वचेस फायदा होतो. तेलकट त्वचेवरील मुरुम पुटकुळ्या म्हणूनच मॅचा टीच्या उपयोगानं जातात. मॅचा टीमधे अ, क, ई, के आणि ब ही जीवनसत्त्वं असतात. ही जीवनसत्त्वं त्वचेतील कोलॅजनची पातळी संतुलित ठेवतात. मॅचा टीचा वापर चेहेर्‍यासाठी केल्यास वयाच्या खुणाही पुसल्या जातात. मॅचा टी मधील ऑक्सिडेटिव्ह तत्वांमुळे त्वचा निरोगी राहाते. त्वचेशी निगडित वेगवेगळ्या कारणांसाठी मॅचा टी वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो.

मऊ आणि तजेलदार त्वचेसाठी

 एका वाटीत दोन चमचे मॅचा टी पावडर आणि गुलाब पाणी घेऊन ते एकजीव करावं. हे मिश्रण थोडं दाटसरच ठेवावं. नंतर त्यात लव्हेण्डर इसेंन्शिअल ऑइलचे काही थेंब घालावेत. मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करुन घ्यावं. ही पेस्ट मग चेहेरा आणि मानेला लावावी. पंधरा मिनिटं हा लेप चेहेर्‍यावर सुकू द्यावा. तो सुकला की चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. त्वचेचा पोत सुधारुन त्वचा तजेलदार आणि मऊ होण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा हा लेप लावावा.

त्वचेतली आद्रता टिकवण्यासाठी

त्वचा आद्र राहाणं ही त्वचेच्या निरोगीपणासाठी आवश्यक बाब आहे. त्यासाठी मॉश्चरायझर वापरता येतं. पण नैसर्गिकरित्या त्वचाआद्र ठेवण्यासाठी मॅचा टीचा लेप उत्तम पर्याय आहे. हा लेप तयार करण्यासाठी एका वाटीमधे दोन चमचे मॅचा टी पावडर घेउन त्यात कच्च दूध घालून दाटसर मिर्शण तयार करावं. ते चांगलं मिसळून घेतलं की मग अर्धा चमचा मध घालावं. हा लेप चेहेरा आणि मानेस लावावा. पंधरा मिनिटानंतर लेप सुकला की चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. या लेपामुळे त्वचेला खोलवर ओलावा मिळतो. परिणामी उन्हानं त्वचा काळवंडणे, त्वचा कोरडी होणे या समस्या दूर होतात.

तेलकटपणा कमी करण्यासाठी

एका वाटीमधे एक चमचा मॅचा टी पावडर आणि एक चमचा मुलतानी माती घ्यावी. त्यामधे टीट्री ऑइलचे काही थेंब घालावेत. यात थोडं पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करावं. ते चेहेरा आणि मानेवर लावावं. वीस मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. या लेपामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतलं जातं. त्वचेच्या रंध्रातून घाण बाहेर पडते आणि त्वचा स्वच्छ, नितळ आणि तजेलदार होते.

त्वचा स्वच्छ करण्यासाठीएक्सफोलिएशन हा त्वचा स्वच्छ ठेवण्याचा मार्ग आहे. मॅचा टी द्वारे त्वचा एक्सफोलिएटही होते. यासाठी एका वाटीमधे दोन चमचे मॅचा टी पावडर आणि एक चमच कॉफी बियांची पावडर घ्यावी. यात थोडं दही घालून मिर्शण तयार करावं. हा लेप चेहेरा आणि मानेला लावावा. हा लेप सुकला की हलक्या हातानं मसाज करुन चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. हा लेप त्वचेवर स्क्रबचं काम करतो. त्वचेवरील मृत पेशी आणि घाण काढून टाकण्याचं काम करतो.

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी

एका वाटीमधे दोन चमचे मॅचा टी पावडर घ्यावी. त्यात नारळाचे किंवा बदाम तेलाचे काही थेंब टाकावेत. नंतर रोझ इसेंन्शिअल ऑइल घालावं. ही जाडसर पेस्ट चेहेर्‍याला आणि मानेला लावावी. 15 मिनिटं लेप सुकु द्यावा. आणि मग हलक्या हातानं मसाज करावा. थंड पाण्यानं चेहेरा धुवावा. हा लेप त्वचेवरच्या वयाच्या खुणा घालवतो. उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून दोन वेळा हा लेप लावावा.असा हा मॅचा ग्रीन टी पिऊन जितका फायदा होतो तितकाच त्याचे लेप करुन चेहेर्‍यास लावल्यावर होतो.