Join us  

सुंदर केस हवेत मग प्लास्टिक कंगवा टाका आणि लाकडी कंगव्याशी दोस्ती करा, त्यानं काय होतं? हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:51 PM

केस विंचरण्यासाठी तुम्ही कोणता कंगवा किंवा ब्रश वापरता हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपले केस नैसर्गिकरित्या सूंदर करायचे असतील तर आधी आपण वापरत असलेल्या नायलॉन आणि प्लास्टिकच्या ब्रशला पर्याय शोधायला हवा. केसांचं आरोग्य टिकवण्यासाठी या कंगव्यांना केवळ लाकडी दाताचा ब्रश हा पर्याय योग्य ठरेल.

ठळक मुद्दे नायलॉन, प्लास्टिक किंवा तत्सम घटकांपासून तयार झालेले कंगवे वापरल्यानं टाळूला असलेली नैसर्गिक तेलाची व्यवस्था विस्कळित होते.लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यास टाळूला मसाज इफेक्ट मिळतो. टाळूचं रक्ताभिसरण सुधारतं. लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरण्याच्या प्रक्रियेतून केसांचं नैसर्गिकरित्या कंडिशनिंग होतं.

केस विंचरणं ही आपल्याला अत्यंत साधी बाब वाटते. म्हणूनच त्याचा काही खोलात जाऊन विचार करावा असंही वाटत नाही. पण केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी केस विंचरण्याकडे खूप बारकाईनं बघायला हवं. यासाठी आधी केस विंचरण्यासाठी तुम्ही कोणता कंगवा किंवा ब्रश वापरता हे खूप महत्त्वाचं असतं. साधारणपणे केस विंचरण्यासाठी नायलॉन, प्लास्टिक किंवा तत्सम घटकांपासून तयार झालेले कंगवे आपण वापरतो. पण या कंगव्यांचा आपल्या केसांचं नुकसान करण्यात मोठा वाटा असतो. टाळूला असलेली नैैसर्गिक तेलाची व्यवस्था या असल्या कंगव्यांने विस्कळित होते. शिवाय या कंगव्यांच्या दातामुळे टाळूला जखमा देखील होवू शकतात. प्लास्टीक किंवा नायलॉनचे कंगवे वापरल्यानं केस तेलकट दिसतात शिवाय टाळूशी असलेलं नैसर्गिक तेल केसांच्या सर्व भागांना मिळत नाही.

मग याला पर्याय काय?

सौंदर्यतज्ज्ञ केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी लाकडी दातांचे ब्रश वापरण्याचा सल्ला देतात. लाकडी दातांचे ब्रश वापरण्याचे अनेक फायदे आहेत.१ लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यास केसांच्या मुळाशी असलेल्या आवरणाला उत्तेजना मिळते. केवळ या ब्रशचा स्पर्शच चांगला वाटतो असं नाही तर नवीन केस उगवण्यासही केसांच्या मुळांना प्रेरणा मिळते.

२. लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यास टाळूला मसाज इफेक्ट मिळतो. टाळूचं रक्ताभिसरण सुधारतं. केसांच्या मुळांना पोषक तत्त्व मिळतात. त्यामुळे केसांची वाढ चांगली आणि जलद होण्यास मदत मिळते.

३. दात हे पसरट आणि मऊ असल्यानं लाकडी दातांचे ब्रश केसांना आणि टाळूला रुतत नाही. या ब्रशनं केस विंचरतांना केस छान मोकळे होतात. विंचरतांना ओढले जात नाही. अगदी हळुवारपणे केस विंचरले जातात आणि सुंदर दिसतात. केसात जर गुंता होण्याची प्रवृत्ती असेल तर लाकडी दातांचे ब्रश हे न दुखता केस विंचरण्याचा आनंद देतात. गुंता होणारे ,कुरळे आणि दाट केसांसाठी लाकडी दातांचे ब्रश हे योग्य ठरतात.

४. केस विंचरण्याच्या प्रक्रियेतून केसांचं नैसर्गिकरित्या कंडिशनिंग होणं अपेक्षित असतं. लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरतो तेव्हा टाळूशी असलेलं नैसर्गिक तेल केसांच्या टोकापर्यंत पोहोचवलं जातं आणि केसांचं नैसर्गिकरित्या कंडिशनिंग होतं आणि केस विंचरण्याच्या प्रक्रियेतूनही केसांना मऊपणा येतो. केसांना नैसर्गिक तेल मिळाल्यानं केस चमकदार होतात. केसांचा व्हॉल्यूम जास्त हवा असल्यास डोकं खाली करुन केस मानेपासून उलटे विंचरावेत.

५ प्लास्टिक आणि नायलॉनच्या दातांच्या ब्रशनं टाळूवर ओरखडे पडू शकतात. तसेच जर कोरड्या टाळूमुळे केसात कोंडा असण्याची समस्या असेल तर प्लास्टिक आणि नायलॉनच्या दातांचे कंगवे टाळू आणखी खरडतात आणि केसातला कोंडा वाढतो. पण लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यानं मसाज इफेक्ट मिळतो. त्यामुळे टाळूशी नैसर्गिकरित्या तेल निर्मिती प्रक्रियेस उत्तेजन मिळतं. त्याचा फायदा कोंडा निघून जाण्यास होतो. शिवाय यामुळे टाळूशी असलेली मृत त्वचा आणि थर हाही निघून जातो.

६ अनेकींचे केस विंचरल्यानंतर पिंजल्यासारखे, गोठल्यासारखे दिसतात. त्याचं कारण प्लास्टिक आणि नायलॉनच्या कंगव्यानं केस विचंरण हे आहे. लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरल्यास ते छान बसतात. विस्कटल्यासारखे दिसत नाही.

७ लाकडी दातांच्या ब्रशनं हळुवार केस विंचरल्यास डोक्याला आराम वाटतो. ताण निघून जाण्यास मदत होते. डोकं शांत ठेवण्यासाठी मधून मधून लाकडी दातांच्या ब्रशनं केस विंचरणं आणि रात्री झोपतांना केस विंचरणं हे फायदेशार ठरतं.८ लाकडी दातांचा कंगवा हा  पर्यावरणपूरक असतो. शिवाय तो लवकर खराब होत नाही. आणि खराब झालेल्या कंगव्याची विल्हेवाटही जलद होते.केसांना नैसर्गिकरित्या सुंदर करण्यासाठी केसांना काय लावतो यासोबतच केस कशानं विंचरतो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.