Join us  

लेगिन्स नेहमी घालता, पण 8 चुका टाळा! उत्तम लेगिन्स निवडा, दिसा फॅशनेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 3:21 PM

लेगिन्स ही केवळ सलवार, पॅण्टला पर्याय आहे असा विचार नको. लेगिन्स ही घातल्यावर उठून दिसण्यासोबतच आपला एकूण लूक लेगिन्समुळे प्रभावी दिसायला हवा. लेगिन्स घालताना तो सेन्स जर वापरला नाही तर लेगिन्स घालून अजागळ दिसण्याचा संभव असतो. लेगिन्समुळे फॅशनमधे होऊ शकणारा घोळ टाळायचा असेल तर लेगिन्स वापरताना चुका या टाळायलाच हव्यात.

ठळक मुद्देशॉर्ट टॉपवर लो वेस्ट लेगिन्स घातली तर पोट दिसणारच! स्कर्ट खाली लेगिन्स घालणं ही फॅशन आता राहिलेली नाही. वजन जास्त असल्यास मोठ्या प्रिण्टसची लेगिन्स घातली तर जास्त जाड असल्यासारखं दिसतं

 लेगिन्स ही सध्या सगळ्यात कम्फर्टेबल फॅशन मानली जाते. पूर्वी काळ्या, पांढर्‍या, क्रिमी अशा ठराविक रंगात उपलब्ध असणार्‍या लेगिन्स आता विविध रंगामधे उपलब्ध आहेत. शिवाय प्लेन, प्रिंटेड, हाय वेस्ट, लो वेस्ट , फुल लेंथ, अँंकल लेंथ या प्रकारांसोबतच लेगिन्स घातल्यावर जिन्सचा लूक मिळावा यासाठी जेगिन्स असेही लेगिन्सचे प्रकार मिळतात. त्यामुळे रोज काय त्याच त्याच लेगिन्स घालतो असा फील लेगिन्स मुळे येत नाही. लेगिन्समधल्या वैविध्यामुळे लेगिन्स हा एक प्रकार असला तरी त्यातील वैविध्यामुळे रोज आपल्याला नवा लूक मिळतो हे मात्र नक्की. पण कशाही खाली, कोणत्याही ड्रेससोबत लेगिन्स घातल्यास लूक फसू शकतो. त्यामुळे लेगिन्स ही केवळ सलवार, पॅण्टला पर्याय आहे असा विचार नको. लेगिन्स ही घातल्यावर उठून दिसण्यासोबतच आपला एकूण लूक लेगिन्समुळे प्रभावी दिसायला हवा. लेगिन्स घालताना तो सेन्स जर वापरला नाही तर लेगिन्स घालून अजागळ दिसण्याचा संभव असतो. लेगिन्समुळे फॅशनमधे होऊ शकणारा घोळ टाळायचा असेल तर लेगिन्स वापरताना चुका या टाळायलाच हव्यात.

Image: Google

लेगिन्स आणि चुका

1. लो वेस्ट लेगिन घालणं

 लांब कुर्त्यासोबत लेगिन्स घालणं हे चालून जातं. पण गुडघ्याच्या वरचे टॉप्स, शॉर्ट कुर्ते शर्ट यावर लो वेस्ट लेगिन घालणं वाईट दिसतं. या प्रकारच्या लेगिन्समुळे पोट दिसण्याचा संभव असतो. त्यामुळे टॉप्स, शर्टस, शॉर्ट कुर्ते घालायचे असतील तर हाय वेस्ट लेगिन घालणं योग्य ठरतं. हाय वेस्ट लेगिन्समुळे हिप्स जाडजूड वाटत नाही. त्यमुळे हाय वेस्ट लेगिन्स घातल्यामुळे स्लिम लूक मिळतो. तसेच व्यायमाच्या वेळेस , योग करतांना लेगिन्स घालायचे असतीक तर हाय वेस्ट लेगिन्स घालणं जास्त योग्य ठरतेल. हाय वेस्ट लेगिन्स कोणत्याही टॉपवर छान दिसते.

2. मोठ्या प्रिंटसच्या लेगिन्स घालणं

वेगवेगळ्या कलरमधे आणि प्रिण्टसमधे लेगिन्स आल्यामुळे लेगिन्समधला तोचतोचपणा लोप पावला आहे. रंगीत लेगिन्स आपल्याकडील टॉप, कुर्ता, शर्ट याच्याशी मॅच करायला सोप्या जातात. पण जर वजन जास्त असेल, स्थूलता असेल तर मात्र लेगिन्सवरच्या प्रिण्टमुळे आणखी जाड दिसण्याची शक्यता असते. कमरेवरचा लोकांच्या नजरेचा फोकस टाळायचा असल्यास , कंबर, मांड्या या स्लिम अर्थात बारीक दिसाव्यात यासाठी प्रिण्ट असलेल्या लेगिन्स टाळाव्यात. रंगीत आणि गडद रंगाच्या लेगिन्स घातल्या तर त्या उठून दिसतात.

Image: Google

3. स्कर्ट खाली लेगिन्स

अनेक स्त्रिया, मुली या ड्रेस आणि स्कर्ट खाली लेगिन्स घालतात. पूर्वी ही फॅशन होती , ट्रेण्ड होता पण आता स्कर्ट खाली लेगिन्स घालणं योग्य मानलं जात नाही. बाहेर फिरायला जाताना लेगिन्स हे कॅज्युअल वेअरिंगप्रमाणे घालायची असेल तर त्याचा योग्य पर्याय म्हणजे टी शर्ट, वर जॅकेट आणि त्यावर लेगिन हे कॉम्बीनेशन उठून दिसतं. बाहेर फिरायला जाताना, ट्रेकिंगला वगैरे जाताना टी शर्ट, जॅकेट आणि लेगिन्स याबरोबर पायात स्निकर्स घातल्यास छान स्पोर्टी लूक मिळतो.4. कुर्त्याला मॅचिंग लेगिन्स

टॉपला मॅचिंग पॅण्ट, कुर्त्याला मॅचिंग सलवारही एक स्टाइलची फॅशन होती. पण आता ही फॅशन जुनी मानली जाते. कुर्ता/ टॉप्स/ शर्ट आणि त्याखालची लेगिन हे जर एकाच कलरचे असतील तर मोनोक्रोमेटिक लूक मिळतो. शिवाय आपण बाहेर जाण्यासाठी एकाच रंगाचा टॉप किंवा शर्ट आणि त्याखाली त्याच रंगाची लेगिन्स घातली तर जिमला चालल्यासारखं वाटतं. बाहेर जाताना शर्ट/ टॉप/ शॉर्ट कुर्ता) आणि पॅण्टचा कलर वेगळा ठेवावा. शर्ट/ टॉप/ शॉर्ट कुर्ता यासोबत त्याच रंगातली डार्क शेडची लेगिन घालावी.

5. जाड मुरड/ कडा असलेली पॅण्टी 

लेगिन्सचं कापड अतिशय पातळ असतं. त्यामुळे आपण लेगिन्सच्या आत जे काही घातलं असेल ते लेगिन्सच्या बाहेर स्पष्ट दिसतं. कितीही लपवलं तरी चालताना पॅण्टीच्या कडा लेगिन्समधून स्पष्ट दिसतात. हे दिसायला अतिशय वाईट दिसतं. त्यामुळे लेगिन्सच्या आत पातळ कडा असलेली पॅण्टी घालावी.

6. क्रॉप टॉपवर लेगिन्स 

लेगिन्सचं कापड हे पातळ असतं. त्यामुळे लेगिन्स घातली की कमरेखालच्या शरीराची गोलाई स्पष्ट दिसते. त्यात जर आपण क्रॉप टॉपवर लेगिन्स घालणार असू आणि आपलं वजन जास्त असेल तर मग ही शरीराची गोलाई, पॅण्टीच्या कडा खूपच स्पष्ट दिसतात. त्यामुळे क्रॉप टॉप खाली एकतर लेगिन्स घालूच नये आणि घालायचीच असल्यास प्रिण्टेड लेगिन्स घालावी.

Image: Google

7. गडद रंगाच्या टॉपखाली लेगिन्स

 टॉपखाली लेगिन घालायची असल्यास टॉपचा रंग फिकट हवा, गडद नको. गडद रंगाच्या टॉपखाली लेगिन घातली तर ते विचित्रं दिसतं. आणि आपल्याला फॅशन सेन्स अजिबात नाही असा इतरांचा समज होवू शकतो.

8. टॉपवर चुडीदार लेगिन्स 

टॉपवर कधीही चुडीदार लेगिन्स घालू नये. जर आपल्याला कम्फर्ट लूक हवा असल्यास पायाच्या घोट्या इतकीच लेगिन्स घालावी. यामुळे लेगिन्स उठून दिसते.