Join us  

साडीचा पदर तर मोकळा सोडायचा, पण जमत नाही? 5 टिप्स, मस्त मिरवा स्टायलिश साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 1:54 PM

लग्नसराईत मिरवताना पदर हातावर सोडा, पण या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या...

ठळक मुद्देपदर हातावर घेऊन मिरवायंचय पण सांभाळता येत नाहीये? या घ्या टीप्स...साडीचा पदर हातावर घ्यायचा असल्यास, हे लक्षात ठेवा...

दसरा, दिवाळी संपली असली तरी आता लग्नसराई सुरु झाली आहे. लग्न म्हटल्यावर नटून मिरवणे आलेच. आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्र-मैत्रीणींच्या लग्नात साडी नेसून तुम्हाला हवा करायची असेल तर ही संधी अजिबात दवडू नका. मात्र यासाठी साडी चांगली नेसता यायला हवी. इतकेच नाही तर साडीच्या निऱ्या, काठ यांबरोबरच साडीचा पदरही नेटका आणि एकसारखा असायला हवा. आता घाईच्या वेळी साडी नेसताना हा पदर नेमका कसा घ्यायचा हा अनेक मुलींपुढील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. पदर पीनअप केला की आपण मोठे दिसतो असे अनेकींना वाटते. त्यामुळे यंग दिसण्यासाठी तरुणीच नाही तर कित्येक महिलाही हातावर पदर सोडण्याला प्राधान्य देताना दिसतात. 

तुमची उंची चांगली असेल तर अशाप्रकारे पदर हातावर सोडलेला चांगला दिसतो. पण उंची कमी असेल तर पदर शक्यतो पीनअप केलेलाच बरा. तसेच तुम्ही डिझायनर असे हाताला वेगळे डिझाइन असलेले ब्लाऊज घातले असेल तर पदर हातावर सोडल्यामुळे हे ब्लाऊज झाकले जाऊ शकते. हातावर सोडलेला हा पदर घेऊन लग्नसमारंभात वावरणे आणि काही कामं करणे अवघड वाटत असले तरीही या हातावरच्या पदराने मारता येणारी स्टाईल निराळीच. मग तुमची साडी सिल्की असुदे किंवा डिझायनर. पाहूयात हातावर पदर घेण्यासाठीच्या सोप्या टीप्स....

(Image : Google)

१. पदर हातावर घेणार असाल तर तुमच्या उंचीनुसार तो योग्य हवा. यासाठी पदर खूप खाली येणार नाही याची काळजी घ्या. खांद्यावरुन पदर सोडताना तो गुडघ्यापर्यंत येईल असे बघा. अन्यथा तो जमिनीवर लोळतो आणि तुमचा किंवा इतरांचा त्यात पाय अडकून पडण्याची शक्यता असते. तसेच साडीही खराब होते. 

२. हा पदर सतत हातावर घेणे शक्य नसेल तर ब्लाऊजच्या खालच्या बाजुला म्हणजेच पोटाच्या वर पदराच्या घड्या एकत्र करुन पीन लावा. त्यामुळे तुम्हाला वावरणे काहीसे सोपे होईल. 

३. सतत या पदराशी खेळणे टाळा, नाहीतर तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल नाही असे समोरच्याला वाटू शकेल. मात्र दर थोडा वेळाने पदराची खालची बाजू म्हणजेच काठ दुमडला जात नाही ना याची खात्री करा आणि तो दुमडला जात असेल तर एकसारखा करायला विसरु नका. 

(Image : Google)

४. साडीच्या निऱ्या व्यवस्थित नसलीत आणि पदर हातावर सोडलेला असेल तर पोट पुढे आल्यासारखे दिसते. त्यामुळे पदर हातावर सोडणार आहे मग निऱ्या कुठे दिसतात असे म्हणून निऱ्या नीट न घालणे योग्य नाही. कारण त्यामुळे पोटापाशी पोंगा दिसू शकतो आणि पदर हातावर असल्याने तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त जाड दिसण्याची शक्यता असते. 

५. पदर हातावर असताना मागच्या बाजुने आपण पदराचा एक काठ दुसऱ्या हातात घेऊन तो पुढच्या बाजुला धरतो. त्यामुळे पदराची नक्षी तर छान दिसतेच पण पदर अंगभर गुंडाळला गेल्याने आपण बारीकही दिसायला मदत होते. मात्र अशावेळी गडबडीत हा काठ जास्त ओढला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे साडी फाटू शकते. असे होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायला हवी. 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्स