Join us  

सीरिअलमधल्या अरुंधती, संजना, संजीवनी किती सुंदर दिसतात सणासुदीला! - तसं 'दिसायचं' तर या खास टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 1:39 PM

सणाला तयार होताना कपडे, मेकअप, हेअरस्टाइल, दागिने हे सगळे नीटनेटके हवे. सीरियलमधल्या बायकांसारख्या तुम्हीही देखण्या दिसू शकता. दसरा उद्यावर येऊन ठेपलेला असताना तुमची तयारी झाली? नसेल तर सजण्यासाठी या काही खास टिप्स...

ठळक मुद्देदसऱ्याच्या दिवशी झटपट तयार व्हायचे असेल तर मात्र काही गोष्टीं ध्यानात ठेवायला हव्यातकपडे, दागिने आणि मेकअप यांची तयारी करताना काय काळजी घ्याल

दसरा म्हणजेच विजयाजदशमी, नवरात्राची सांगता ज्या दिवशी होते तो दिवस मराठी बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आता हा विजयादशमीचा सण साजरा करताना सजणं-धजणं तर आलंच. महिला वर्ग यामध्ये नेहमीच आघाडीवर. आपणही सिरियलमधल्या चकचकीत अभिनेत्रींसारखे दिसू शकतो. त्यासाठी गरज आहे ती काही गोष्टी माहित करुन घ्यायची. सकाळी घराला तोरण बांधणे, रांगोळ्या काढणे ते अगदी साग्रसंगीत स्वयंपाक आणि पूजाअर्चेची तयारी अशा सगळ्या गोष्टी सांभाळणाऱ्या महिलेला मी छानही दिसली पाहिजे असे आवर्जून वाटत असते. वेळ कमी आणि सोंग फार असे असताना दसऱ्याच्या दिवशी झटपट तयार व्हायचे असेल तर मात्र काही गोष्टीं ध्यानात ठेवायला हव्यात. यादिवशी संध्याकाळी एकमेकांकडे सोनं लुटायला आणि देवालाही जाण्याची पद्धत आहे. मग त्यावेळी आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्या कपड्यांना साजेसा मेकअप आणि दागिने याविषयी काही गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात. पाहूयात दसऱ्याचा ट्रॅडिशनल लूक कसा करता येईल याविषयी...

१. कपड्यांची निवड कशी कराल 

दसरा सण आहे मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणत असतानाच आपण चांगले सजणे आणि दिसणे महत्त्वाचे नाही का. असे केल्याने नकळत आपल्यात एक उत्साह येतो. यामध्ये तुम्ही ड्रेस घालणार असाल तर सध्या खणाची बरीच फॅशन आहे. असाच खणाचा एखादा कुर्ता किंवा पंजाबी ड्रेस तुमचा लूक खुलवू शकतो. खण हे पारंपरिक म्हणून ओळखले जात असल्याने तुम्ही सणाच्या निमित्ताने खणाचा नक्की विचार करु शकता. तसेच सध्या बाजारात खणाच्या वेगवेगळ्या साड्याही उपलब्ध आहेत. यामध्ये दोन ते तीन रंगातील साड्या, मोर, पोपट, नथ असे नक्षीकाम केलेल्या खणाच्या साड्या यांचाही समावेश होतो. काठपदराच्या साड्यांमध्येही तुम्ही अगदी नारायणपेठीपासून ते पैठणी आणि गढवालपर्यंत वेगवेगळ्या साड्या नेसू शकता. तसेच फ्लोरल डिझाइनही पुन्हा फॅशन इन आहे. तसेच जास्त भरजरी साड्यांपेक्षा प्लेन साड्यांना किंवा चेक्सच्या साड्यांना सध्या डिमांड आहे. तुम्ही आतापर्यंत न वापरलेला एखादा वेगळआ पॅटर्न तुम्ही यादिवशी नक्की ट्राय करु शकता. 

२. कपड्यांनुसार दागिने ठरवायला हवेत 

आता कपड्यांची निवड करुन झाली की सर्वात महत्त्वाचे म्हणजे दागिने. आपल्याकडे खूप प्रकारचे दागिने असतात. यामध्ये अगदी सोन्याच्या दागिन्यांपासून ते इमिटेशन ज्वेलरीपर्यंत सगळे असते. पण तुम्ही पंजाबी ड्रेस, कुर्ता, घागरा, साडी यांपैकी काय घालणार यावर तुमची दागिन्यांची निवड अवलंबून असते. तेव्हा पाहूयात कोणत्या कपड्यांवर कशाप्रकारचे दागिने घालावेत.

१. तुम्ही घालत असलेला पंजाबी ड्रेस किंवा कुर्ता हेवी वर्कचा किंवा जास्त घेरदार असेल तर त्यावर गळ्यात काही घातले नाही तरी चालेल. अशावेळी तुम्ही फक्त मोठे कानातले घालू शकता. याबरोबर एखादी छोटी नथ घातली आणि वेगळी छान टिकली लावली तर तुमचा लूक एकदम उठून येऊ शकतो. 

२. तुम्ही खण किंवा काठाचा ड्रेस घालणार असाल तर त्यावर एखादा गोल्डन पारंपरिक सेट घालू शकता. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सेट आले आहेत. खणाला साधारणपणे गोल्डन काठ असतात. त्यामुळे गळ्याला लागून असलेली एखादी ठुशी किंवा चोकर त्यावर उठून दिसू शकतो. गोल्डन रंगाच्या मण्यांचे सेटही खणावर शोभून दिसतात. तेव्हा आधीच कपडे ठरले असतील तर त्याप्रमाणे सेट तुम्ही काढून ठेऊ शकता. तसा तुमच्याकडे नसेल तर खरेदी करु शकता. यावरही पारंपरिक नथ, दंडाला वाकी असे उठून दिसू शकते. 

३. सध्या सिल्व्हर ज्वेलरीचीही खूप फॅशन आहे. तुम्हाला सिल्व्हर ज्वेलरी आवडत असेल आणि तुमच्या कपड्यांवर ती सूट होईल असे वाटत असेल. तर सिल्व्हर मंगळसूत्र, मोठ्या आकाराचे गळ्यातले सेट आणि त्यावर मॅचिंग कानातले तुम्ही नक्की ट्राय करु शकता. यामध्ये सिल्व्हर आणि ऑक्सिडाइज असे दोन प्रकार बाजारात सध्या उपलब्ध आहेत. तुमची साडी किंवा कपडे कॉटनमध्ये असतील तर त्यावर सिल्व्हर ज्वेलरी उठून दिसते. यात तुम्ही नाकात एखादी सिल्व्हर नोज पिनही घालू शकता. सध्या त्याची बरीच फॅशन आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कडी किंवा बांगड्याही चांगल्या मिळतात. 

४. काठा-पदराच्या साडीवर लांब गळ्यातले आणि त्यावरील कानातले किंवा झुमके अगदी छान खुलून दिसतात. यात तुम्ही एक किंवा दोन सेट एकमेकांवर घातले तरीही ते चांगले दिसू शकतात. दसऱ्यासारख्या मोठ्या सणाला तुम्ही एकापेक्षआ जास्त दागिने घालू शकता. काठाच्या साडीवर हे छान दिसते. त्यामुळे इतके दागिने कशाला असा विचार न करता तुम्ही बिनधास्त स्वत:ला कॅरी करा.

मेकअप करताना 

हेअरस्टाइल 

तुमचे केस लहान असतील, ते मोकळे केस आवडत असतील आणि तुम्ही एखादा भरजरी कुर्ता घालणार असाल तर केस छान धुवा, त्याला चांगला फ्लो राहील असे ते सेट करा आणि जास्त काहीच न करता ते तुम्हाला हवे तसे सेट करा. पण जर तुम्ही हेवी पंजाबी ड्रेस किंवा साडी नेसणार असाल तर केस वरच्या बाजूला बांधलेले छान दिसतात. यामध्ये तुम्ही केसांचा आंबाडा किंवा सोप्या घरच्या घरी करता येतील अशा हेअरस्टाइल करु शकता. यासाठी तुमच्याक़डे आकडे, जाळी आणि केसांना लावण्यासाठी काही ब्रूच असणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला गुलाब आणि मोगऱ्याची फुले आवडत असतील तर तुम्ही या हेअरस्टाइलला गजऱ्याने सजवू शकता. पारंपरिक लूकवर अशाप्रकारे केसात फूलं माळली तर तुमच्या लूकमध्ये चांगली भर पडते. 

चेहरा 

चेहऱ्याला क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर या गोष्टी लावून घ्या. त्यानंतर प्रायमर लावा. सध्याच्या दिवसात उकाडा जाणवत असल्यामुळे कंसिलर आणि फाऊंडेशन यांचे प्रमाण कमी ठेवा. तुमच्या स्कीनच्या रंगाला मॅच होईल असे फाऊंडेशन निवडा. तुमचा चेहरा तेलकट असेल तर मॉइश्चरायझर जास्त लावू नका. अशावेळी पावडरने चेहरा एकसारखा करुन घ्या. 

डोळ्यांचा मेकअप 

डोळे हा तुमच्या चेहऱ्याचा सगळ्यात महत्त्वाचा बोलका भाग असतो. आपले डोळे बोलतात असे आपण म्हणतो. हे डोळे आणखी उठावदार दिसावेत यासाठी डोळयांचा मेकअप चांगला करणे आवश्यक असते. यामध्ये डोळ्याला काजळ आणि आयलायनर लावणे ही सगळ्यात पहिली आणि सोपी पायरी आहे. त्यानंतर आपल्या कपड्यांच्या रंगानुसार तुम्ही आय शॅडोचा रंग ठरवु शकता. हल्ली कॉन्ट्रास्ट रंगाचे आय शॅडो लावण्याचीही फॅशन आहे. डोळ्यांना खूप जास्त मेक अप केललाही चांगला दिसत नाही. त्यामुळे खूप बटबटीत दिसेल असे करु नका. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली असल्यास त्याठिकाणी एकसारखे फाऊंडेशन लावा. तुम्हाला स्मोकी आय शॅडो करायचे असल्यास त्याबाबत नीट माहिती घेऊन रंग एकत्र करा नाहीतर ते फसू शकते. 

ओठांना करा आकर्षक

कपड्याच्या रंगानुसार तुम्ही लिपस्टीकचा रंग ठरवू शकता. यामध्ये तुम्ही थोड्या गडद रंगाचाही वापर करु शकता. ओठाला आधी लिप बाम लावावे. त्यानंतर लिप लायनरने ओठाला योग्य तो आकार देऊन घ्यावा आणि मग तुमच्या आवडीची लिपस्टीक एकसारखी लावावी. शक्यतो ही लिपस्टीक लॉँग लास्टींग असेल असे पाहावे. जेणेकरुन तुम्ही जास्त वेळ बाहेर असलात तरी ओठ फिके पडणार नाहीत.  

टॅग्स :मेकअप टिप्सब्यूटी टिप्सदसरा