Join us  

कलर करकरुन केसांचा जीव गेलाय? - मुठभर मेथ्यांचा हा फॉर्म्यूला पहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 8:34 PM

मेथीची भाजी आपण आवडीने खातोच, पण हे औषधी गुणधर्म सौंदर्यसाधनेसाठीही महत्वाचे आहेत.

ठळक मुद्देसौंदर्योपचारात मेथी आणि मेथ्यांचा उपयोग होतो. कोरड्या आणि गळणा-या केसांना मऊसूत करण्यासाठी मेथीचा उपयोग होतो चेह-यावरच्या मुरूम आणि पुटकुळ्यांसाठी मेथीचा उपचार उपयोगी पडतो. 

- निर्मला शेट्टी

मेथी. सध्या सर्वत्र मिळते. कडूसर चवीची मेथी हे तर मेथीचं वैशिष्ट्य आहेच पण मेथीमध्ये अनेक औषधी गुणही आहेत. मेथीच्या पानांसोबतंच मेथीचं बी ज्यांना मेथ्या म्हणून ओळखलं जातं त्याही अनेक आजारांमध्ये औषध म्हणून उपयोगी पडतात.मेथीचा उपयोग ताप उतरण्यासाठी होतो. पोटाच्या तसेच श्वसनाच्या विकारातही मेथीचा उपयोग होतो. मेथीमध्ये खनिजं आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. आणि म्हणूनच मेथी आणि मेथ्यांचा उपयोग खाण्यासोबतचं इतर अनेक कारणांसाठीही होतो.सौंदर्योपचारातही मेथी आणि मेथ्यांचा उपयोग होतो. विशेषत: केसांच्या समस्यांसाठी मेथीचा उपयोग केल्यास फायदा होतो. तसेच अंगाला येणारी घामाची दुर्गंधी  आणि मुखदुर्गंधी  घालवण्यासाठी मेथीच्या पानाचा उपयोग खूपच फायदेशीर ठरतो.यासोबतच मेथीच्या भाजीमुळे बाळांतिणीच्या दुधातही वाढ होते. खरंतर मेथीच्या भाजीमध्ये तिच्या चवीसोबत इतके गुण आहेत की ती अनेकांच्या आवडत्या भाज्यांच्या लिस्टमध्ये म्हणूनच असते.घरच्या घरी सौंदर्य उपाय म्हणूनही मेथीचा आपण उत्तम उपयोग करु शकतो.

1. मेथीची पानं आणि नारळकोरड्या आणि गळणा-या केसांना मऊसूत करण्यासाठी एक कप मेथीची पानं आणि एक कप किसलेलं खोबरं घ्यावं. दोन्हीही एकत्र वाटून त्याचा रस काढावा. हा रस केसांना हलक्या हातानं मसाज करत लावावा. पंधरा मिनिटानंतर केस धुवावेत.2) मेथी आणि गूसबेरीकाळ्याभोर केसांसाठी एक कप ताजी मेथीची पानं आणि चार ते पाच गूसबेरी घ्याव्यात. दोन्हीही एकत्र वाटून त्याचा रस काढावा. आणि तो केसांना हलक्या हातानं मसाज करत लावावा. रस लावल्यानंतर साधारणत: पाऊण तासानं केस धुवावेत.3) मेथी  रस

जर मेथीसोबत इतर कोणतीही गोष्ट वापरायची नसेल तर नुसती मेथ्यांची पानं रगडून त्यांचा रस काढून केसांना लावला तरी केसांना चांगला फरक पडतो. 4) मेथ्यांचा रसकेसांना सतत कलर केल्यामुळे केस निर्जीव आणि शुष्क होतात. यासाठी पावकप मेथ्या रात्रभर भिजत घालाव्या. थोडं पाणी टाकून मेथ्या वाटाव्या. सुती कापड वापरून मेथ्यांचा रस गाळून घ्यावा. मेथ्यांचा रस केसांना मसाज करत लावावा. आणि साधारणत: पाऊण तासानं केस धुवावेत.5) मेथी आणि तुळसचेह-यावरच्या मुरूम आणि पुटकुळ्यांसाठी पाव कप मेथीची पानं आणि पाव कप तुळशीची पानं घ्यावीत. दोन्ही एकत्र वाटून त्याची पेस्ट करावी. आणि ही पेस्ट चेहे-याला लावावी. ही पेस्ट त्वचेला संसर्ग झालेल्या ठिकाणी लावल्यास त्यावरही फरक पडतो.

 

(लेखिका सौंदर्यतज्ञ आहेत.)

nirmala.shetty@gmail.com