Join us  

केस रुक्ष आणि फार पातळ झालेत? ५ नैसर्गिक उपाय, केसांचा पोत मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 4:36 PM

केसांची काळजी घ्यायची असेल तर काय करायला हवे आणि काय नको हे वेळीच लक्षात घ्या

ठळक मुद्देतुमचे आरोग्य चांगले तर केसांचे आरोग्य चांगले चांगल्या केसांसाठी बाह्य उपचारांबरोबरच आहारातही बदल करायला हवेत

स्त्रीच्या सौंदर्यातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे तिचे केस. आपले हे केस घनदाट आणि लांब, काळेभोर असावेत असे प्रत्येकीला वाटते. पण प्रत्येकीला केसांच्या बाबतीत काही ना काही तक्रारी असतातच. कधी केस खूप पातळ असतात, तर कधी कोंडा असतो, कोणाचे केस कितीही काही केले तरी वाढत नाहीत तर कधी खूप फाटे फुटलेले असतात. तुमचे केस किती हेल्दी आहेत यावर तुमचे आरोग्य किती चांगले आहे हे समजू शकते. तुमचे केस कमकुवत असतील तर तुमच्या शरीरात काहीतरी कमतरता आहेत असे दिसते. तुमची जीवनशैली योग्य नसेल तरीही केसांवर त्याचा परिणाम होतो आणि केस निस्तेज, रुक्ष दिसायला लागतात. आता चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या शरीराच्या सर्वच अवयवांवर परिणाम होतो, त्यात केसांवर परिणाम होत आहे हे कसे ओळखायचे ते पाहूया

१. केस धुतल्यानंतर बाथरुमच्या गाळणीमध्ये खूप जास्त प्रमाणात केस अडकलेले दिसतात.

२. केस विंचरताना कंगवा सरळ खाली न येता सतत अडकतो म्हणजे केसांत प्रमाणापेक्षा जास्त गुंता होतो. 

३. केस आधीपेक्षा खूप पातळ होतात. 

४. केस विरळ होतात आणि तुमची डोकयाची त्वचा दिसायला लागते.  

यातले कोणतेही एक किंवा त्याहून जास्त लक्षणे दिसत असतील तर तुमच्या केसांना पुरेसे पोषण मिळण्याची किंवा त्यांची योग्य रितीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. आता केसांची ताकद वाढवायची असेल किंवा केसांना स्ट्रॉँग बनवायचे असेल तर कोणते नैसर्गिक उपाय वापरायला हवेत ते पाहूया...

१. चांगल्या तेलाचा वापर करा - केसांना नियमित तेल लावणे अतिशय आवश्यक आहे. बदाम तेलामुळे केसांमध्ये मॉइश्चर टिकून राहायला मदत होते. तर खोबरेल तेलाने केसाच्या मूळांना नियमित मसाज केल्यास तुमचे केस मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. याबरोबरच जास्वंद तेलानेही केस चांगले वाढण्यास मदत होते. 

२. भरपूर भाज्या आणि फळे खा - केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी ज्याप्रमाणे बाह्य उपाय आवश्यक असतात. तसेच केसांचे योग्य रितीने पोषण होण्यासाठी उत्तम आहार घेणेही गरजेचे असते. भाज्या आणि फळांमध्ये शरीराला उपयुक्त असणारी जीवनसत्वे, खनिजे आणि इतर घटक असतात. त्यामुळे शरीराचे आणि पर्यायाने केसांचे चांगले पोषण होण्यास मदत होते. तसेच केसांचे आरोग्य उत्तम राहायचे असेल तर आहारात प्रोटीनचाही समावेश असणे आवश्यक असते. भाज्या आणि फळांमधून हे घटक सहज मिळतात. रताळी, सुकामेवा, दूध, पालेभाज्या आणि क जीवनसत्व असलेली फळे यांचा आहारात नियमित आणि योग्य पद्धतीने समावेश करायला हवा. 

३. मूळांना तेलाने समाज करा - केसाच्या मूळांना म्हणजेच डोक्याला नियमितपणे तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. त्यामुळे याठिकाणचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. रक्तप्रवाह सुरळीत झाला की केसांच्या मूळांना चांगले पोषण मिळते आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

४. योगासने करा - योगासने हा सर्वोत्तम व्यायामप्रकार आहे. आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी ठराविक योगासने करण्याचा सल्ला योगाभ्यासक आपल्याला देतात. त्याप्रमाणे सर्वांगासन, हस्त पादासन, शिर्षासन यांमुळे रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेला होण्यास मदत होते. साहजिकच मेंदूबरोबरच केसांच्या आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो. केसांची चांगल्या पद्धतीने वाढ होण्यास याची मदत होते. 

५. आनंदी राहा - आपण विविध कारणांनी कधी चिंतेत असतो तर कधी नैराश्यात. मात्र आपली मानसिक अवस्थाही आपल्या केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करत असते. त्यामुळे आपण आनंदी असणे आवश्यक आहे, त्यामुळे नकळतच आपले केस चांगले राहण्यास मदत होते. 

हे आवर्जून टाळा  

१. हेअर ड्रायरचा जास्त वापर टाळा२. खूप जास्त गरम पाणी केसांवर घेणे टाळा३. स्ट्रेटनरचा वापर टाळा४. केसांच्या मूळांना सतत ब्रशने विंचरु नका त्यामुळे केस आणखी हलके होतात.५. केस सतत धुणे आणि सतत शाम्पू लावणे घातक असते, आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच केस शा्म्पूने धुवा६. केस वाळविण्यासाठी कोवळ्या उल्हात उभे राहा. ७. केस पुसण्यासाठी खूप खरखरीत टॉवेल वापरु नका८. जास्तीचा ताण घेणे टाळा 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी