Join us  

Hair care: केसांच्या वाढीबाबत तुमच्याही मनात हे ४ गैरसमज आहेत का? मग हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 6:48 PM

केस वाढत नाहीत, मग त्याची अमूक अमूक कारणे असतील... असे अनेक विचार मनात सारखे डोकावून जातात. पण यातील सगळेच खरे असतात असे नाही. 

ठळक मुद्देकेस खूपच गळायला लागले आहेत. त्यामुळे कापून टाकले, असे एक वाक्य हमखास ऐकायला मिळते.

सध्या केस गळतीची समस्या खूपच वाढली आहे. केवळ केस गळतीच नव्हे तर अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये खूप कोंडा असणे, कोणाच्या केसात खूपच तेलकटपणा असतो तर कुणाचे केस अगदीच रुक्ष, कोरडे असतात. प्रत्येकाची केसांच्या बाबत वेगवेगळी समस्या आहे. जेवढ्या समस्या आहेत, तेवढेच केसांच्या बाबतीतले गैरसमजदेखील फोफावले आहेत. त्यामुळे तुमच्याही मनात केसांच्या वाढीबाबत काही गैरसमज असतील, तर ते आधी काढून टाका. 

 

केसांबाबत 'हे' गैरसमज तुमच्या मनातही असू शकतात१. केसांना दररोज तेल लावणे"आजकालच्या मुली केसांना तेलच लावत नाहीत. त्यामुळेच तर त्यांचे केस लवकर पांढरे होतात, गळू लागतात. आमच्यावेळी तर अगदी रोज केसांना तेल लावून घट्ट वेण्या घातल्या जायच्या. त्यामुळे आमचे केस खूप काळ चांगले राहिले..." अशा पद्धतीचे वाक्ये आजच्या पिढीच्या प्रत्येक तरूण मुलीने तिच्या आजीकडून, आईकडून ऐकलेली असतात. हे सगळे ऐकल्यावर खरोखरच दररोज केसांना तेल लावत नाही, म्हणून आपले केस गळतात की काय, असे वाटू लागते. पण दररोज तेल लावल्याने केसांची चांगली वाढ होते, हा एक गैरसमज आहे. पण दररोज तेल लावल्याने केसांमध्ये घाण जमा होऊ शकते. त्याऐवजी आठवड्यातून दोन- तीन वेळा तेल लावा नंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस स्वच्छ धुवा. खोबरेल तेलात थोडे इसेंशियल ऑईल टाकून डोक्याच्या त्वचेला हळूवार मालिश केली तर चांगला परिणाम दिसून येतो. 

 

२. पांढरे केस तोडू नयेडोक्यात एखादा पांढरा केस दिसला तर तरूण मुले- मुली लगेचच तो केस उपटून टाकायला बघतात. अशा वेळी असे पांढरे केस उपटू नये. पांढरे केस उपटले तर त्याच्या आजूबाजूचे केसही पांढरे होतात, असा सल्ला हमखास ऐकायला मिळतो. पण हा एक मोठा गैरसमज आहे. पांढरा केस उपटला तर त्याच्या मुळाशी अशा कोणताही पदार्थ नसतो, जेणेकरून त्या पदार्थाचा संसर्ग आजूबाजूच्या केसांना होईल आणि ते केसही पांढरे होतील. केसांचा पांढरा रंग हा संसर्गामुळे होत नाही तर पोषणामध्ये काहीतरी कमी पडते म्हणून येतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे केसांच्या बाबतीतला हा आणखी एक गैरसमज डोक्यातून काढून टाका. 

 

३. केस कापले तर चांगले वाढतातकेस खूपच गळायला लागले आहेत. त्यामुळे कापून टाकले, असे एक वाक्य हमखास ऐकायला मिळते. विशेषत: लहान मुलींच्या बाबतीतही त्यांच्या आई बऱ्याचदा असेच करतात. आपल्या मुलींना समजावून सांगतात की आता केस काप म्हणजे मग मोठेपणी तुझे केस चांगले दाट होतील. मुळात असे काहीच नसते. केस गळत आहेत, म्हणून ते कापून टाकणे तर पुर्णपणे चुकीचा विचार आहे. केस कापण्याऐवजी ते ट्रिम करत जावेत. यामुळे केसांचा शेंड्याचा जो भाग खराब झालेला असतो, तो निघून जातो आणि केसांची चांगली वाढ होते.

 

४. केसांचे प्रॉडक्ट कधीच बदलू नयेहा एक मोठा गैरसमज अनेक जणींमध्ये आढळून येताे. एवढा की अगदी नेहमीचे प्रोडक्ट नाही मिळाले तर अनेक जणी केस धुणे देखील टाळतात. पण केसांची सशक्त वाढ होण्यासाठी एकावेळी दोन ते तीन वेगवेगळ्या ब्रॅण्डचे प्रोडक्ट वापरले पाहिजेत, असा सल्ला सौंदर्यतज्ज्ञ देतात. वेगवेगळ्या कंपनीच्या प्रॉडक्ट्समध्ये वेगवेगळे गुण असतात. त्यामुळे त्या सगळ्यांचे पोषण आपल्या केसांना एकत्रितपणे मिळावे आणि केसांचे आरोग्य सुधारावे यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करायला काहीच हरकत नाही. दोन- तीन वेळा प्रोडक्ट वापरून असे लक्षात आले की हे आपल्यासाठी अजिबातच सोयिस्कर नाही, तर अशा वेळी तुम्ही वापर थांबवू शकता. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीमेकअप टिप्स