Join us  

चेहऱ्यावर ग्लो हवाय? -मग केळीची साल फेकू नका, त्यात जादू आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:50 PM

त्वचा चमकदार हवी, स्वच्छ दिसायला हवी तर घरात आणलेली केळी तुमच्यासाठी जादूची कांडी आहे.

ठळक मुद्देचेहऱ्यावरच्या मृत त्वचेमुळे चेहरा काळवंडलेला दिसतो.केळाच्या उपयोगानं अतिशय हळुवारपणे ही मृत त्वचा निघून जावू शकते.चेहरा ताजा टवटवीतही हवा असेल तर केळीची सालंही त्यासाठी पुरतात.

- निर्मला शेट्टी

केळी. साधंसं फळ. मात्र तुम्हाला सुंदर त्वचा हवी, चकाकी हवी तर ही केळी तुमच्या चेहऱ्या वर जादू करु शकते. केळी खाऊनही आणि न खाताही. केळीची ही जादू अगदी सहज सोपी तुमच्याही हातात येऊ शकते.मात्र त्यासाठी त्यातलं लॉजिकही जरा आधी समजून घेऊ.

त्वचेसाठी केळं उपयुक्त असलं तरी त्वचेच्या प्रकाराप्रमाणे आणि त्वचेच्या समस्येप्रमाणे केळाबरोबर वापरायचे घटक ठरवावे लागतात. आणि म्हणूनच केळाचा उपयोग सरसकट न करता आपल्या त्वचेचा प्रकार आणि पोत समजून करावा म्हणजे केळं वापरल्यानं मिळणारा फायदा आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळतो.

सेंसेटिव्ह त्वचेसाठी एक केळं + थोडे ओट्स

अतिसंवेदनशील त्वचेसाठी केळाचा उपयोग करतांना पिकलेलं अर्ध केळं घ्यावं. पाव कप ओट्स , एक चमचा मध आणि एक चमचा दूध किंवा दही घ्यावं. हे सर्व मिक्सरध्ये वाटून एकजीव करून घ्यावं. तयार झालेली मऊ पेस्ट     चेहऱ्याला लावावी. ती दहा मिनिटं तशीच ठेवावी.  नंतर थंड पाण्यात थोडं गुलाब पाणी टाकून त्या पाण्यानं चेहरा धुवावा.  केळाच्या या पॅकमुळे चेहरा काही क्षणात स्वच्छ आणि मऊ-मुलायम होतो. 

 

त्वचा कोरडी आहे? केळं-पपई-बदाम

कोरडय़ा आणि रूक्ष त्वचेसाठी केळाचा पॅक बनवणं अगदी सोपं आहे.

 पिकलेलं पाव केळं, पिकलेल्या पपईची एक मोठी फोड, दोन चमचे दही, दोन किंवा तीन भिजवलेले बदाम आणि दोन चमचे ग्लिसरीन घ्यावं. हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून एकत्र करावं.  ही पेस्ट चेहऱ्या ला आणि मानेला लावावी.  दहा मिनिटानंतर थोडं दूध घेवून त्यानं चेहरा धुवावा. आणि नंतर साध्या आणि थंड पाण्यानं चेहरा धुवावा.   

 

डेड स्किन आहे? - तांदुळ आणि केळं

चेहऱ्या वरच्या मृत त्वचेमुळे चेहरा काळवंडलेला दिसतो. ही मृत त्वचा  फार घासघूस करत काढण्याची गरज नसते. केळाच्या उपयोगानं अतिशय हळुवारपणे ही मृत त्वचा निघून जावू शकते. यासाठी पिकलेलं अर्ध केळं , चार बदाम, आणि दोन चमचे तांदूळ (धुवून आणि नंतर सुकवून घेतलेले) घ्यावे. हे सर्व एकत्र वाटून घेवून त्याची मऊसर पेस्ट करावी. ही पेस्ट चेहऱ्या ला हळुवारपणो मसाज करत लावावी. थोड्या वेळानं थोडं ताक घेवून चेहरा धुवावा आणि नंतर साध्या थंड पाण्यानं चेहरा धुवावा. 

तुकतुकीत पाठ हवी?- केळं आणि चंदन पावडर

चेहऱ्या सोबत पाठही छान मुख्य म्हणजे दिसावी अशी अनेकींची इच्छा. ही इच्छा केळाचा वापर करून सहज पूर्ण होवू शकते. यासाठी दोन केळी, पाव कप बदामाचं तेल, दोन चमचे मध, दोन चमचे चंदनाची पावडर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यावं. हे सर्व साहित्य मिक्सरमधून चांगलं एकत्र करून घ्यावं. तयार झालेला लेप मसाज करत रगडून लावावा. हा लेप चांगला सुकला की थोडं दूध घेवून चेहरा धुवावा आणि नंतर साध्या थंड पाण्यानं चेहरा धुवावा.  

 एवढं केलं तरी पाठ खात्रीनं तुकतुकीत होते.

टवटवीत चेहरा हवा? - मग केळीचं साल फेकू नका. 

 

खूपच घाईची वेळ असेल. चेहरा ताजा टवटवीतही हवा असेल पण साधा लेप करून लावण्याइतकाही हातात वेळ नसेल तर त्यासाठी खूप काही शोधाशोध करायची गरज नसते.  केळीची सालंही त्यासाठी पुरतात. पिकलेल्या केळाची साल घ्यायची आणि ती चेहऱ्याला घासून लावायची. एक दहा मिनिटानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवावा. या उपायानं त्वचेला आराम मिळतो आणि चेहराही मस्त टवटवीत होतो.   

 

(लेखिका सौंदर्यतज्ञ आहेत.)

nirmala.shetty@gmail.com 

टॅग्स :ब्यूटी टिप्स