Join us  

बीट खाऊन रुप येतं हे माहिती नाही तुम्हाला? - एक बीट की किंमत फीर तुम क्या जानो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 7:59 PM

शरीरात हिमोग्लोबीन वाढवायचं तर बीट खाच, मात्र त्यासोबत बिट लावाही, त्यानं तुमचा रंग नक्की खुलेल!

ठळक मुद्देबिटाच्या ज्यूसमधून शरीराला आवश्यक असलेलं नायट्रेट मिळतं. बिटामुळे रक्तप्रवाह सुधारतो, केसांची गळती कमी होते, केस चांगले वाढतात.बिटामुळे केसातला कोंडा जातो.

- निर्मला शेट्टी

लालचुटूक बीट. एरवी बिटाची कोशींबीर आपण खातो. पण बीट खाऊन रुप येतं, हे तुम्हाला कुणी सांगितलं आहे का? नाही.मग हे वाचा, तुम्हीही बिटाच्या प्रेमातच पडाल. तसंही बिटाचा रंग मोहात पडतोच. मुळात बिटामध्ये इतके काही गुण दडलेले आहेत की, आपल्या आरोग्याकडे डोळसपणे बघणा-यां नी बीट जेवणातून वगळणं शक्यच नाही.

बिटामध्ये मोठय़ा प्रमाणावर लोह, ब 1, ब 2 आणि क जीवनसत्त्व असतात. पोटॅशिअम, मॅंग्नीज, फॉस्फरस, सिलिकॉनसारखी खनिजं असतात. कमी कॅलरीज असलेल्या बिटात सहज पचवता येतील असे कार्बोहायड्रेटस  असतात. आपल्या आहारात जर बीट नियमित असेल तर रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं. पेशींमधलं ऑक्सिजन वाढतं. बिटाच्या ज्यूसमधून शरीराला आवश्यक असलेलं नायट्रेट मिळतं. बिटात डी आणि अल्फा अमिनो अँसिड असतं. शिवाय फ्लेवोनॉइड आणि कॅरेटोनॉइड्ससारखी अँण्टिऑक्सिडंट्सही बिटामध्ये असल्यानं बिटाच्या सेवनानं शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.असं हे सर्वगुणसंपन्न बीट सौंदर्योपचारातही अतिशय लाभदायी ठरतं. त्यामुळे रुप आणि ताकद दोन्ही हवं तर या बिटाशी मैत्री करा.

चेह-यावर पुटकुळ्या?- बिटाचं ज्यूस प्या!चेहऱ्या वर जेव्हा मोठय़ा प्रमाणात पुटकुळ्या येतात, फोड येतात तेव्हा त्वचेचा असह्य दाह होतो. ही आग शमवण्याचा मोठा गुणधर्म बिटाच्या ज्यूसमध्ये असतो. बिटाचं ज्यूस करताना त्यात काकडी आणि गाजर घातलं तर या ज्यूसची ताकद आणखी वाढते.बिटाचं ज्यूस रोज प्यायल्यास एकामागोमाग चेहऱ्या वर येणाऱ्या  पुटकुळ्यांना अटकाव होतो.

केस गळताहेत?-बीट है ना!

बिटामुळे रक्तप्रवाह सुधारतो, केसांची गळती कमी होते, केस चांगले वाढतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांचा पोत सुधारते. बिटामधल्या सिलिका या खनिजामुळे केसांना चमकही येते.

केसात कोंडा, बिट लावा.- बिटामुळे केसातला कोंडा जातो. यासाठी एक बीट, दहा ते पंधरा कडुनिंबाची पानं आणि एक बूच अँपल सायडर व्हिनेगर घ्यावं.- बीट आणि कडुनिंबाची पानं एकत्र वाटून तो रस गाळून घ्यावा आणि हा रस केसांना आणि केसांच्या मुळांना हलक्या हातानं मसाज करून लावावा. नंतर केस धुवावे. केस धुताना एक मग पाण्यात एक बूच अँपल सायडर व्हिनेगर घालावं. हे पाणी केसांवर टाकावं आणि नंतर साध्या पाण्यानं केस धुवावेत. हा उपचार नियमित स्वरूपात केल्यास केसातला कोंडा जातो.

मेहंदीत बीट- नैसर्गिक कलर करा!

केसांसाठी मेहंदी भिजवताना मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी त्यात चहा किंवा कॉफीचं पाणी टाकलं जातं. पण ते न टाकता बीट उकडलेलं पाणी टाकल्यास मेहंदीला रंग चढतो. मेहंदीमध्ये बिटाचं पाणी टाकल्यास मेहंदी लावल्यानं केसांना येणारा कोरडेपणाही टाळता येतो आणि केस सुंदर दिसतात.

(लेखिका सौंदर्यतज्ञ आहेत.)

nirmala.shetty@gmail.com