Join us  

Fact Check : राइस वॉटर लावल्याने केस खरंच भरभर वाढतात, मुलायम होतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 12:15 PM

Rice water benefits : आरोग्यासाठी चांगला असलेला तांदूळ सौंदर्य खुलवण्यातही उपयोगी पडतो? कसा ते पाहूया...

ठळक मुद्देराईस वॉटर कोणी, कधी , कसं लावायला हवं याविषयी...कोरड्या आणि रुक्ष केसांना वैतागला असाल तर हा उपाय नक्की ट्राय करा

तांदूळ (Rice) हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. कोकण किनारपट्टी, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये तर तांदळाशिवाय जेवणच होऊ शकत नाही. असा हा तांदूळ आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चांगला असतो त्याचप्रमाणे सौंदर्यासाठीही त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कधी चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी तांदळाचे पाणी (Rice water benefits) लावण्याचा सल्ला दिला जातो. तर कधी केस मुलायम व्हावेत आणि भरभर वाढावेत यासाठी तांदूळ पाणी (Rice water for good hair) लावण्यास सांगितले जाते. केस दाट, लांबसडक, मुलायम असावेत यासाठी आपण एक ना अनेक उपाय करत असतो. पण त्याचा उपयोग होतोच असे नाही. मग आपण निराश होतो आणि केसांसाठी नेमके काय करावे हेच कळत नाही. जाहिरातीतल्या मॉडेल्स किंवा अभिनेत्रींचे केस पाहून आपलेही तसे असावेत असे आपल्याला वाटत असते. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. तांदूळ शिजवून भात केल्यानंतर कुकरमध्ये त्याचे पाणी शिल्लक राहते. आपण इडली-डोसासाठी डाळ-तांदूळ भिजत घालतो तेव्हाही त्याचे पाणी फेकून देतो. मात्र हे पाणी फेकून न देता ते केसांना लावल्यास त्याचा फायदा होतो. पाहूयात केसांना राईस वॉटर लावण्याचे काय फायदे होतात.

(Image : Google)

राईट वॉटरचे फायदे 

१. तांदळाच्या पाण्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. केस मजबूत, लांबसडक होण्यासाठी याचा फायदा होतो. 

२. तांदळाच्या पाण्यात असणारे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, खनिजे, अमिनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंटस केसांसाठी अतिशय चांगले असतात. 

३. तांदळाच्या पाण्याने केस धुतल्याने त्यांचा रुक्षपणा कमी होऊन ते मुलायम होण्यास मदत होते. थंडीमुळे आणि एरवीही विविध प्रकारची रासायनिक उत्पादने वापरल्यामुळे केसांचा पोत बिघडतो. हा बिघडलेला पोत सुधरवायचा असेल तर तांदळाच्या पाण्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

४. अनेकदा थंडीत केसांच्या मूळाची त्वचाही खूप कोरडी होते. त्यामुळे कोंडा होणे, केस गळणे, केस तुटणे अशा समस्या निर्माण होतात. पण मूळांनाही तांदळाचे पाणी लावल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. 

५. तुमचे केस खूप भुरेभुरे होत असतील किंवा खूप चिकट, तेलकट होत असतील तरी नियमित राइस वॉटरने केस धुणे फायद्याचे ठरु शकते. एका रात्रीत याचा फरक दिसून येणार नाही, मात्र चार ते सहा आठवड्यात तुम्हाला याचा नक्कीच चांगला फरक जाणवू शकेल. 

(Image : Google)

६. आपण नियमितपणे केसांना कलर करत असाल, स्ट्रेटनिंग, रिबाऊंडनीग, केरेटीन यांसारख्या ट्रीटमेंटस घेत असाल तर राइस वॉटरने केस धुणे हा आपल्यासाठी अतिशय उत्तम उपाय आहे हे वेळीच लक्षात घ्या.

टिप्स - 

- आता हे सगळे फायदे ठिक आहेत पण तुमचे केस आधीपासूनच चांगले दाट आणि मजबूत असतील तर अशांसाठी राइस वॉटर अजिबात चांगले नाही. याचे कारण म्हणजे अशा लोकांनी राइस वॉटर वापरल्यास त्यांचे केस कोऱडे आणि कडक होण्याची शक्यता असते. 

- राइस वॉटर केसांना १० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर केस साध्या पाण्याने धुवून टाका. नाहीतर शाम्पू झाल्यावर कंडिशनरमध्ये राइस वॉटर एकत्र करुन ते केसांना लावा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी