Join us  

द्राक्षं खा, ते त्वचेचं संरक्षण करतात असं सांगितलं तर विश्वास ठेवाल?- अलीकडचे अभ्यास तरी तेच सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 5:24 PM

सूर्याच्या घातक अतीनील किरणांपासून वाचण्यासाठी द्राक्षं खाणं उपयुक्त असतं असं एका अभ्यासातून नुकतंच सिध्द झालं आहे. हा अभ्यास द्राक्षं आपल्या त्वचेचं अतीनील किरणांपासून संरक्षण करातात असं सांगतो.

ठळक मुद्देअभ्यासकांनी द्राक्षं खाल्ल्यानंतर शरीरांतर्गत काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.हा अभ्यास करताना अडीच कप द्राक्षांइतकी द्राक्षं पावडर या अभ्यासात सहभागी झालेल्यांना सलग १५ दिवस खायला दिली गेली. द्राक्षं पावडर खाल्यानंतर अतीनील किरणांचा प्रतिकार करण्याची त्वचेखालील रंगद्रव्याची क्षमता वाढलेली दिसून आली.

आंबट गोड रसाळ द्राक्षं खायला सगळ्यांनाच आवडतात. पण सूर्याच्या घातक अतीनील किरणांपासून वाचण्यासाठी द्राक्षं खाणं उपयुक्त असतं असं एका अभ्यासातून नुकतंच सिध्द झालं आहे. हा अभ्यास द्राक्षं आपल्या त्वचेचं अतीनील किरणांपासून संरक्षण करतात असं सांगतो. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मटॉलॉजी या जर्नलमधे याविषयावरचा नूकताच एक अभ्यास प्रसिध्द झाला. अभ्यासकांनी द्राक्षं खाल्ल्यानंतर शरीरांतर्गत काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना आढळून आलं की द्राक्षं खाल्ल्यानं मेड (MED) मधे वाढ होते. MED म्हणजे एक मोजमाप करणारं रसायन आहे जे किती अतीनील किरणांमूळे आपली त्वचा लाल होते, डीएनएचं नुकसान होतं हे मोजते. म्हणून अभ्यासक द्राक्षांना एक प्रकारे तोंडावाटे घेतलं जाणारं सनस्क्रीन म्हणतात.

आपण खातो ते प्रत्येक फळ, भाजी हे आपल्या शरीराला काही ना काही पोषणमूल्यं देत असतात. द्राक्षासारख्या काही फळांमूळे तर त्वचेच्या कर्करोगाला अटकावही होऊ शकतो. द्राक्षामधे तसेच वनस्पतीजन्य अन्न पदार्थांमधे पॉलिफेनॉल्स हे सूक्ष्म पोषणमूल्य असतं. तसेच त्यात अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस असतात जे त्वचेला अतीनील किरणांपासून सुरक्षा पोहोचवतात. आणि त्वचेच्या कर्करोगालाही रोखतात.

हा अभ्यास करताना अडीच कप द्राक्षांइतकी द्राक्षं पावडर या अभ्यासात सहभागी झालेल्यांना सलग १५ दिवस खायला दिली गेली. याचा त्यांच्या त्वचेतील रंगद्रव्यावर पंधरा दिवसांपूर्वी ( प्रयोगाआधी) पंधरा दिवसानंतर काय परिणाम होतो हे अभ्यासलं गेलं. त्यात द्राक्षं पावडर खाल्यानंतर अतीनील किरणांचा प्रतिकार करण्याची त्वचेखालील रंगद्रव्याची क्षमता वाढलेली दिसून आली.उन्हाळ्यात त्वचेला सनस्क्रीन लावण्यासोबतच द्राक्षंही खाल्ले तर त्वचेला अतीनील किरणोत्सारापासून दुहेरी संरक्षण मिळेल. त्यामुळे द्राक्षाच्या हंगामात आपल्या त्वचेच्या सुरक्षेचा विचार करुन अवश्य द्राक्षं खायला हवीत असं अभ्यासक सूचवतात.