Join us  

केस कोणी मातीने धुते का? तर हो, मातीने केस धुतले तर मिळते उत्तम पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:13 PM

केस स्वच्छ करण्यासाठी बाजारातल्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिकरित्या उपलब्ध गोष्टी खूप प्रभावी काम करतात. केसांना माती लावून केस धुतल्यास शाम्पूपेक्षाही चांगले परिणाम दिसून येतात. अर्थात केसांना लावण्याची माती ही विशिष्ट माती असते.

ठळक मुद्देमाती केसातील, टाळूतील घाण आणि विषारी घटक स्वत:कडे खेचून घेते. माती हा नैसर्गिक घटक आहे. मातीत अनेक खनिजं आणि पोषक तत्त्वं असतात. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं.रहसॉल/गहसॉल, बेण्टोनाइट आणि काओलिन या तीन प्रकारच्या मातीचा उपयोग केस धुण्यासाठी होतो.

केसांची निगा राखण्यासाठी महागडी उत्पादनंच हवी हा केवळ एक गैरसमज आहे. दर्जेदार ब्रॅण्डचे शाम्पू वापरुनही शाम्पू बदलावे वाटतात. चांगल्या शाम्पूचा शोध सुरुच राहातो. केस चांगले राहाण्यासाठी केस नीट धुतले जाणं, टाळू स्वच्छ होणं खूप गरजेचं असतं.त्यासाठी चांगल्या प्रतीचा शाम्पू हवा असतो. पण शाम्पूनच केस स्वच्छ होतात असं नाही. केस स्वच्छ करण्यासाठी बाजारातल्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिकरित्या उपलब्ध गोष्टी खूप प्रभावी काम करतात. केसांना माती लावून केस धुतल्यास शाम्पूपेक्षाही चांगले परिणाम दिसून येतात. अर्थात केसांना लावण्याची माती ही विशिष्ट माती असते.

छायाचित्र- गुगल

आजही ग्रामीण भागातील अनेक महिला केस धुण्यासाठी मातीचा उपयोग करतात. गावात केसांसाठीची शुध्द स्वरुपातली माती उपलब्ध असते. शहरी भागात ही सोय नाही. पण दुकानांमधे केस धुण्यासाठीची माती मिळते. केस धुण्यासाठी तीन प्रकारच्या मातीचा उपयोग होतो. रहसॉल/गहसॉल, बेण्टोनाइट आणि काओलिन या तीन प्रकारच्या मातीचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. तसेच या तीन मातींचा उपयोग हेअर मास्क म्हणून केला तर केस छान होतात.

मातीने केस धुण्याचे फायदे

1. शाम्पूनं केस धुतल्यानं केस आणि टाळू दोन्ही स्वच्छ होतात. पण शाम्पूमधील रासायनिक घटकांमुळे केसांच्या मुळांचं अर्थात टाळूचं नुकसान होतं. पण केस धुण्यासाठी वरील तीनपैकी कोणतीही माती वापरली तरी केस आणि टाळूचं कोणतंही नुकसान न करता केस स्वच्छ होतात. माती केसातील, टाळूतील घाण आणि विषारी घटक स्वत:कडे खेचून घेते. आणि माती लावून जेव्हा पाण्यानं केस धुतले जातात तेव्हा केस आणि टाळू व्यवस्थित स्वच्छ होतात. तेल लावल्यानं तेलकट झालेले, घामानं चिकट झालेले केस मातीच्या उपयोगानं छान सुळसुळीत होतात.

2. माती हा नैसर्गिक घटक आहे. मातीत अनेक खनिजं आणि पोषक तत्त्वं असतात. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं. केस निरोगी असतील तरच केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. केसांची चमक वाढते. शाम्पू लावून केस कोरडे आणि राठ होतात. केसांना असा शुष्कपणा माती लावून केस धुतल्यास येत नाही. याउलट मातीनं केस धुतल्यास केस मऊ होतात.

छायाचित्र- गुगल

3. केसांचा नैसर्गिक पीएच स्तर राखला गेला तरच केसांचं आरोग्य चांगलं राहातं. शाम्पूच्या वापरानं केसांचा पीएच स्तर खाली घसरतो. पण केसांना माती लावली तर मात्र केसांमधील पीएच स्तर टिकून राहातो आणि त्याचं प्रमाणही योग्य राहातं. केसांचं आरोग्य नीट राहाण्यासाठी केसांचा पीएच स्तर 4.5 असणं आवश्यक आहे. पीएच केसांचं जीवाणू आणि बुरशीपासून रक्षण करतं. मातीमुळे केसातील अतिरिक्त तेल सहज निघून जातं. पण केसातील नैसर्गिक तेल आणि आद्रता मात्र केसात टिकून राहाते. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. केस गळतीची समस्या सुटते.

छायाचित्र- गुगल

केसांना माती लावताना

कोणतंही उत्पादन ते नैसर्गिक असो की रासायनिक , ते वापरताना आपल्याला सूट होतंय ना याची आधी खात्री करुन घ्यायला हवी. बाजारात मिळणारी माती केसांसाठी वापरताना आधी मातीची पेस्ट हाताच्या मनगटाला लावून पाहावी. जर अँलर्जी सदृश्य परिणाम दिसले नाहीत तर मग माती केसांना लावावी. आपल्या केसांसाठी कोणत्या प्रकारची माती उपयुक्त आहे याबाबत सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.