Join us  

कुरळे, राठ केस डोक्याला ताप? मऊ केसांसाठी लावा हे 4 हेअर मास्क 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 6:15 PM

कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी अँव्होकॅडो, दही, केळ आणि मेयोनिज असे विविध प्रकारचे हेअर मास्क घरी तयार करुन लावू शकतो. त्यामुळे कुरळे केस राठ आणि कोरडे होत नाही तसेच ते सावरण्यास सोपे जातात. कुरळे केसही सुंदर करण्याचा हा आहे उत्तम मार्ग.

ठळक मुद्देअँव्होकॅडोचा क्रीमी पोत आणि त्यातील फॅटस केसांचं उत्तम कंडीशनिंग करतात. त्यामुळे केस कोरडे दिसत नाही.केसातला कुरळेपणा जर घट्ट असेल तर कुरळे केस विंचरण्यास अवघड जातात. ते सोपं व्हावं म्हणून केळाचा मास्क उपयोगी पडतो.दह्यात आरोग्यदायी फॅटस असतात. जे कुरळ्या केसातला कोरडेपणा घालवतात.छायाचित्रं- गुगल

  व्यक्तीगणिक त्वचा वेगळी असते, वैशिष्ट्यपूर्ण असते. त्वचेच्या प्रकराप्रमाणे त्वचेची काळजी घ्यावी लागते. तीच बाब केसांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे केसाच्या प्रकाराप्रमाणे केसांची काळजी घ्यावी लागते. कुरळ्या केसांची काळजी घेण्यास बरेच कष्ट लागतात. प्ण ते जर घेतले नाही तर कुरळे केस झाडूसारखे होतात. राठ आणि कोरडे होतात. एकतर कुरळ्या केसांच्य हेअर स्टाइलमधे फारसं वैविध्य आणता येत नाही. कुरळे केस जर चांगले दिसावे असं वाटत असेल तर त्यांची काळजी घेणे हाच उत्तम पर्याय आहे.कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारचे हेअर मास्क घरी तयार करुन लावू शकतो. त्यामुळे कुरळे केस राठ आणि कोरडे होत नाही तसेच ते सावरण्यास सोपे जातात.

अँव्होकॅडो मास्क

छायाचित्रं- गुगल 

अँव्होकॅडो एक असं फळ आहे जे फार कमी जणांच्या डाएटमधे असतं. पण जर केस कुरळे असतील तर केसांची काळजी घेण्यासाठी अँव्होकॅडोचा उपयोग व्हायलाच हवा. अँव्होकॅडोचा क्रीमी पोत आणि त्यातील फॅटस केसांचं उत्तम कंडीशनिंग करतात. त्यामुळे केस कोरडे दिसत नाही. उलट ते मऊ आणि चमकदार होतात.हा अँव्होकॅडो हेअर मास्क बनवण्यासाठी एक पिकलेलं अँव्होकॅडो घ्यावं. ते कापावं आणि त्यातील बी काढून टाकावी. अँव्होकॅडोची मिक्सरमधून मऊ पेस्ट करावी. या पेस्टमधे एक मोठा चमचा मध आणि दोन मोठे चमचे खोबर्‍याचं तेल घालावं. ते चांगलं एकत्र करुन घ्यावं. ही पेस्ट जर जास्त दाटसर वाटत असेल तर त्यात थोडं नारळाचं दूध घालावं. आपले केस किती लांब आणि दाट आहे त्यानुसार हेअर मास्कसाठीची सामग्री कमी जास्त करावी. ही पेस्ट केसांना लावण्याआधी केस धुवावेत. केस हलके ओलसर असतानाच त्यावर ही पेस्ट लावावी. किमान अर्धा तास किंवा एक तास ही पेस्ट केसांवर राहू द्यावी. एका तासानंतर सौम्य शाम्पूने केस धुवावेत.

दह्याचा मास्क

छायाचित्रं- गुगल 

दह्यात आरोग्यदायी फॅटस असतात. जे कुरळ्या केसातला कोरडेपणा घालवतात. हे मास्क तयार करताना त्यात अँपल सायडर व्हिनेगरचाही उपयोग करतात. या विनेगरमुळे टाळूचा पीएच स्तर संतुलित होतो तसेच अतिरिक्त तेल किंवा घाण साठली असेल तर तीही स्वच्छ होते.हा मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात अर्धा कप दही आणि एक चमचा अँपल सायडर व्हिनेगर घ्यावं. केसांना जास्तीचं मॉइश्चर मिळावं यासाठी त्यात एक चमचा मध घालावं. केस धुवून घ्यावेत. आणि मग केस वाळले की हलक्या हातानं मसाज करत हा मास्क केसांना लावावा. 20 ते 25 मिनिटानंतर केस सौम्य शाम्पूद्वारे धुवून घ्यावेत.

केळाचा मास्क

छायाचित्रं- गुगल 

केसातला कुरळेपणा जर घट्ट असेल तर कुरळे केस विंचरण्यास अवघड जातात. ते सोपं व्हावं म्हणून केळाचा मास्क उपयोगी पडतो. केळात जीवनसत्त्व, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सिलिकॉन आतात. हे घटक कुरळे केस दुरुस्त करण्यासोबतच ते वाढण्यासही मदत करतात. या हेअर मास्कमुळे केस मऊ होतात. केळाचं मास्क तयार करण्यासाठी एक पिकलेलं केळ घ्यावं. ते केळ कुस्करुन घ्यावं. त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घालावं. ऑलिव्ह ऑइल नसेल तर आपल्या आवडीचं कोणतंही केसांना लावायचं तेल घालावं. मास्क लावण्याआधी केस धुवून घ्यावेत. केस थोडे वाळले की मग हा मास्क केसांना लावावा. अर्ध्या  तासानंतर आधी केस पाण्यानं धुवावेत आणि मग केसांना सौम्य शाम्पू लावावा.

मेयोनिजचा हेअर मास्क

छायाचित्रं- गुगल 

मेयोनिजमधे फॅटी अँसिड, अ, ड जीवनसत्त्वं, फोलेट आणि बायोटिन हे घटक असतात. हे घटक कुरळ्या केसातलं मॉइश्चरचं सरंरक्षण करतं. त्यामुळे केस कोरडे दिसत नाहीत.मेयोनिज हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात चार मोठे चमचे मेयोनिज घ्यावं. यात दोन चमचे मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल घालून ते चांगलं एकत्र करावं. नंतर हे हेअर मास्क धुतलेल्या केसांना लावावं. अर्ध्या  तासानंतर सौम्य शाम्पूनं केस धुवावेत.

मास्क लावताना लक्षात ठेवा

कुरळ्या केसांसाठी मास्क तयार करताना आपण जे काही घटक घेऊ त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. कारण सामान्य केसांच्या तुलनेत कुरळ्या केसांना अधिक मॉइश्चरची गरज असते.

* केसांना लावलेलं मास्क धुतांना खास कुरळ्या केसांसाठीचा शाम्पू मिळतो त्यानेच केस धुवावेत. मास्कद्वारे केसांचं पोषण होतं म्हणून कंडिशनर लावण्याचा कंटाळा करु नये. केसांना पोषण मिळालेलं असलं तरी शाम्पू केल्यानंतर कंडिशनर लावण्याची गरज असतेच.

* केसांना मास्क लावण्याआधी केस धुतलेले असणं गरजेचं आहे. केस धुतलेले नसतील तर मास्कमधील पोषक तत्त्वं केसांच्या मुळांना मिळत नाही. त्यामुळे केस धुवावेत आणि केस ओलसर असताना हेअर मास्क लावावा.

* हेअर मास्कमुळे कुरळ्या केसांचं पोषण होत असलं तरी वारंवार केसांना हेअर मास्क लावू नये. आठवड्यातून एकदा कोणतातरी एक हेअर मास्क केसांना लावावा.