Join us  

आता करा डोळ्यांच्या मेकअपवर फोकस ! मास्कमुळे बदलतोय ब्युटी, मेकअपचा ट्रेण्ड..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 7:31 PM

कोरोनामुळे जगण्याच्या बहुतांश पद्धतीच बदलून गेल्या आहेत. वर्क फ्रॉम होम आणि बाहेर जाण्यावर आलेली बंधने यामुळे अनेक महिलांनी तर मेकअप करणेच सोडले होते. पण आता पुन्हा न्यू नॉर्मल जगण्याशी मिळते जुळते घेणे सुरू झाल्याने महिलांना घराबाहेर पडावे लागत आहे. केवळ जीवनशैलीच नव्हे तर ब्युटी आणि मेकअप ट्रेण्डही कोरोनाने बदलून टाकले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा ब्युटी प्रोडक्ट्सच्या मार्केटवरही खूपच परिणाम झाला आहे.मास्कमुळे लिपस्टिक, लिपग्लॉस, लिपलायनर यांची मागणी कमालीची घटली आहे.याउलट मात्र हेअर कलर, फाउंडेशन, आय लायनर, आय लॅशेस, आयशॅडोज खरेदी करण्याला महिलांनी प्राधान्य दिले असून या सौंदर्य प्रसाधनांची उलाढाल चांगलीच वाढली आहे.

कोरोनाची पहिली लाट आली आणि अख्खे जग स्तब्ध झाले. बाहेर जाणे- येणे बंद झाले आणि लग्न  समारंभ आणि इतर कार्यक्रम लांबणीवर पडले. ना कोेणाचे वाढदिवस ना कसले सेलिब्रेशन.  त्यामुळे मेकअप आणि महिला यांच्यामध्ये चांगलाच दुरावा आला. आता मेकअप करून जायचेय कुठे असे म्हणत अनेक महिलांचे मेकअप करणेच या काळात बंद झाले होते. त्यानंतर कोरोनातून थोडा ब्रेक मिळाला आणि लोकांनी घराबाहेर पडायला सुरूवात केली. पण मास्कची सक्ती असल्याने मेकअप करण्यात काही  अर्थच उरला  नाही, असे अनेक जणींना वाटू लागले. अर्धा चेहरा झाकलेला आणि अर्धा चेहरा उघडा अशा अवतारात घराबाहेर जाण्याची वेळ आल्याने मेकअप करायचा तरी कशाला, असे म्हणत अनेक जणी हिरमुसून गेल्या. यातूनच नव्या ब्युटी ट्रेण्डचा उदय झाला असून आता मेकअप करताना डोळ्यांचा मेकअप आणि चेहऱ्याचे हायलाईट्स यावर फोकस करा, असे सौंदर्यतज्ञ सांगत आहेत.

 

 

घराबाहेर जाताना मास्क लावणे अनिवार्य असल्याने आता डोळे आणि केस यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे सौंदर्यतज्ञ सांगत आहेत. अधिक मेकअप न करताही लिपस्टिकने तुमचा लूक बदलू शकतो, हे अगदी खरे आहे. पण मास्क लावल्यामुळे आता ओठांच्या मेकअपवर कॉन्सन्ट्रेट करून काहीही उपयोग नाही. त्यामुळे केस आणि डोळे यांच्यावर फोकस केल्यास आपण आपला लूक बदलू शकतो.

१. आय लायनरचा योग्य वापरआता डोळ्यांच्या मेकअपला प्राधान्य द्यायचे आहे. पण असे असले तरी डोळ्यांचा मेकअप अतिजास्त करून उपयोग नाही. बाहेर जाताना आता ज्याप्रमाणे काजळ घालतो त्याप्रमाणे हलक्या हाताने डोळ्यांच्या पापण्यांवर आयलायनर फिरवायला विसरू नका. आय लायनरचा ब्लॅक शेड अधिक डार्क वाटत  असल्यास  ब्राऊन किंवा ग्रे शेडही तुम्ही निवडू शकता. यामुळे डोळे उठून तर दिसतीलच पण अधिक भडकही वाटणार  नाहीत.

 

२. पापण्यांचे सौंदर्य वाढवा.मास्कमुळे आता प्रत्येकाचे लक्ष सगळ्यात आधी तुमच्या डोळ्यांकडेच जाणार आहे. त्यामुळे डोळे अधिक आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही पापण्या अधिक आकर्षक कशा दिसतील, याकडेही लक्ष द्या. तुमच्या पापण्या अखूड आणि पातळ असतील तर खोट्या आय लॅशेस लावू शकता किंवा मग मस्कारा वापरून पापण्यांना आकर्षक बनवू शकता.

३. आयशॅडोचा वापरआयशॅडोची शेड चुकली तर मेकअप अधिक भडक दिसण्याची शक्यता असते. त्यामळे नव्या ट्रेण्डनुसार मेकअप करताना आयशॅडोचा वापर अधिक बारकाईने करा. डार्क शेडचे आयशॅडो अजिबात निवडू नका. पीच, लाईट पिंक, लाईट ब्राऊन असे शेड तुम्ही निवडू शकता.

 

४. आयब्रोजला द्या योग्य आकारआयब्रोज व्यवस्थित केल्या असतील आणि त्याला परफेक्ट शेप केला असेल, तर डोळ्यांचा मेकअप करण्याचा अर्धा टप्पा आपण ओलांडलेला असताे. त्यामुळे याकाळात तुमच्या आयब्रोज नेहमी मेंटेनच असतील, याकडे कटाक्षाने लक्ष द्या.

५. कपाळ आणि टिकलीअनेकदा कपाळाची त्वचा काळवंडलेली दिसते. त्यामुळे प्रायमर आणि कॉम्पॅक्ट यांचा योग्य वापर करून कपाळावरचे डाग किंवा पिंगमेंटेशन झाकण्याचा प्रयत्न करा. प्रायमर आणि कॉम्पॅक्ट इव्हन टोनमध्येच लागेल याची काळजी घ्या. हवी असल्यास तुमच्या आवडीची टिकली लावा.

 

६. केसांकडे लक्ष द्यामास्कमुळे डोळे, कपाळ यानंतर केसांकडेच लक्ष जात असल्याने केस चांगले ठेवणे आता गरजेचे झाले आहे. त्यामुळे ऑईली, चिपचिपित आणि मधूनच पांढरे दिसणारे केस घेऊन बाहेर जाणे टाळा. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा नकारात्मक पैलू दिसू शकतो. त्यामुळे केस व्यवस्थित असणे खूपच गरजेचे आहे.  

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्समहिला