Join us  

सरसोंका तेल चंपी, ऐकून ई म्हणाल तर पस्तावाल! केसांना लावा मोहरीचं तेल, केसांचं बल्लेबल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 7:56 PM

केस दाट होण्यासाठी मोहरीचं तेल वापरा असं घरातल्यांनी सांगितल्यावर नाक मुरडणारे आपण जेव्हा हेअर एक्सपर्ट मोहरेचं तेल लावण्याचा सल्ला देतात तेव्हा त्याकडे लक्ष देतात. तो उपाय करण्यास लगेच तयार होतात. मोहरीच्या तेलातले गुणधर्म हे केसांसाठी पोषक असतात . यामुळे केस गळती तर थांबतेच शिवाय केस दाट आणि लांब होतात आणि लवकर पांढरेही होत नाही.

ठळक मुद्देमोहरीचं तेल लावून अध्र्या तासानं केस धुतल्यास केसांना आवश्यक ते पोषण मिळतं.आठवड्यातून दोन वेळेस केसांना मोहरीच्या तेलानं मसाज आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मोहरीच्या तेलानं केसांचं मॉश्चरायझिंग होतं आणि केसातील कोंड्याची समस्याही सुटते.

केस दाट होण्यासाठी, केसांसंबंधीचे प्रश्न सोडवण्यासाठी हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्याची आपली सवयच झाली आहे. त्यामुळे घरी आजी, आई, आत्या, मावशी काही सल्ले देत असतील, त्यांच्या अनुभवातले उपाय सांगत असतील तर आपण सरळ त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांच्या उपायांना चुकीचे ठरवतो. पण आपण करत असलेले उपाय हे अपाय आहे हे लक्षात येतं तेव्हा? आता तर मोठमोठे हेअर एक्सपर्ट देखील आपल्या आजी आईनं सांगितलेल्या उपायांना दुजोरा देतात. केस दाट होण्यासाठी मोहरीचं तेल वापरा असं घरातल्यांनी सांगितल्यावर नाक मुरडणारे आपण जेव्हा हेअर एक्सपर्ट मोहरीचं तेल लावण्याचा सल्ला देतात तेव्हा त्याकडे लक्ष देतात. तो उपाय करण्यास लगेच तयार होतात.

Image: Google

आयुर्वेदाचार्य वैद्य सुरेंद्र सिंह राजपूत स्वत:चं उदाहरण देऊन मोहरीच्या तेलाचे फायदे सांगतात. आयुष्यभर मोहरीचंच तेल केसांना लावल्यामुळे साठीतही आपले केस दाट राहिले. आणि केस पांढरे होण्याची प्रक्रियाही वयाच्या 55 वर्षानंतर सुरु झाली. मोहरीच्या तेलातले गुणधर्म हे केसांसाठी पोषक असतात . यामुळे केस गळती तर थांबतेच शिवाय केस दाट आणि लांब होतात आणि लवकर पांढरेही होत नाही.

मोहरीचं तेल केसांसाठी फायदेशीर कसं?

 मोहरीच्या तेलात अँण्टिऑक्सिडण्टस, अँण्टिफंगल, अँण्टि बॅक्टेरिअल हे गुणधर्म असतात. तसेच. अ, ड, ई, के हे जीवनसत्त्वं, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही महत्त्वाची खनिजंही असतात. मोहरीचं तेल केसांना लावल्यास केसांच्या मुळांना होणारा संसर्ग रोखला जातो. आणि मोहरीच्या तेलातील जीवनसत्त्वं आणि खनिजांमुळे केसांचं पोषणही होतं. मोहरीच्या तेलात अल्फा फॅटी अँसिड असतात , जे केसातील आद्रता टिकवून ठेवतात. केस मऊ, मुलायम होतात आणि केस दाटही दिसतात.

Image: Google

मोहरीचं तेल कसं लावावं?

मोहरीचं तेल केसांना का लावावं याचं उत्तर मिळालं पण ते कसं लावावं यासाठी मुंबई येथील वोकहार्ट हॉस्पिटलचे आहार आणि पोषण तज्ज्ञ प्रमुख अमरीन शेख म्हणतात की, केस गळण्याचं, केस पातळ होण्याचं, वेळेआधीच केस पांढरे होण्याचं कारण म्हणजे केसांच्या मुळांना आवश्यक असणारं पोषण न मिळणं. यासाठी आठवड्यातून दोन वेळेस मोहरीच्या तेलानं केसांच्या मुळांशी मसाज करुन नंतर केसांना शाम्पू केल्यास केसांचं व्यवस्थित पोषण होतं. शेख म्हणतात की मोहरीचं तेल लावण्याआधी ते एका वाटीत घ्यावं. त्यात दोन तीन लवंगा घालून ते गरम करावं. ते कोमट असतांनाच बोटांच्या सहाय्यानं केसांच्या मुळांशी मसाज करत लावावं. यामुळे केसांच्या मुळांशी रक्तप्रवाह सुधारतो. त्याच परिणाम केस वाढण्यावर होऊन केस गळती थांबते. मोहरीचं तेल लावून अर्ध्या  तासानं केस धुतल्यास केसांना आवश्यक ते पोषण मिळतं, केसांचं मॉश्चरायझिंग होतं आणि डोक्यामधील कोंड्याची समस्याही मिटते. आठवड्यातून दोन वेळेस केसांना मोहरीच्या तेलानं मसाज आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

मोहरीच्या तेलानं पोषणाचे चार मार्ग 

मोहरीच्या तेलानं केसांचं पोषण करण्याच्या चार पध्दती तज्ज्ञ सांगतात. यासाठी मोहरीच्या तेलाचा उपयोग करुन हेअर मास्क लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Image: Google

1. मोहरीचं तेल आणि दही

थोडं मोहरीचं तेल वाटीत घेऊन त्यात दोन ते तीन चमचे दही घालावं. ते चांगलं एकत्र करुन घ्यावं. हा लेप केसांच्या मुळांना हलका मसाज करत लावावा. केसांना लेप लावल्यानंतर सुती रुमाल गरम पाण्यात घालून कडक पिळावा आणि तो केसांना गुंडाळून ठेवावा. 30- 40 मिनिटानंतर केस सौम्य शाम्पूने धुवावेत. मोहरीच्या तेलातील गुणधर्मांमुळे केसांचं कंडिशनिंगही होतं.

2. मोहरीचं तेल आणि कोरफडीचा गर

एका वाटीत थोडं मोहरीचं तेल घेऊन त्यात थोडा कोरफडीचा गर घालावा. तेलात कोरफडीचा गर चांगला एकजीव करुन घ्यावा. हा लेप केसांना आणि केसांच्या मुळांना लावावा. एका तासानंतर सौम्य शाम्पूनं केसं धुवावेत.

Image: Google

3. मोहरीचं एल आणि लिंबाचा रस

 एका वाटीत थोडं मोहरीचं तेल , लिंबाचा रस आणि मेथ्यांची पावडर सम प्रमाणात घ्यावं. ते चांगलं एकत्र करावं. हा लेप केसांना लावावा आणि तासभर ठेवावा. केस मऊ आणि छान फुगलेले दिसण्यासाठी या लेपाचा उपयोग होतो.

4. मोहरीचं तेल आणि केळ

थोडं मोहरीचं तेल घेऊन त्यात पिकलेलं केळ घालावं. थोडं दही घालावं. हे तिन्ही घटक नीट एकजीव करावेत आणि मग हा लेप केसांना लावावा. यामुळे केस रुक्ष आणि राठ होत नाहीत. हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा.