Join us  

उफ्फ, ये डँड्रफ...केसातल्या कोंड्यानं त्रस्त आहात? मग कडुलिंबाचा हा उपाय करून बघा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 3:29 PM

केसातला कोंडा कधीकधी खूपच वैताग देतो. यामुळे केसगळती तर सुरू होतेच पण चारचौघांसमोर कोंडा दिसला, तर प्रचंड लाज वाटते. केसातला कोंडा घालविण्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा...

ठळक मुद्देकोंड्याचा काही भाग कपाळावर, चेहऱ्यावर उडतो. त्यामुळे मग चेहऱ्यावर खांद्यावर, मानेवर, पाठीवर फोड येण्याचे प्रमाणही वाढू लागते. म्हणूनच कोंडा वेळीच कंट्रोल करणे खूप आवश्यक आहे.

१० पैकी ७ व्यक्ती केसात होणाऱ्या कोंड्याच्या समस्येने हैराण असतात. केसात कोंडा असणे हा एक त्वचा  विकार आहे. पण बऱ्याचदा तो जेव्हा कमी प्रमाणात असतो, तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग एकदा का कोंडा वाढला की मग तो लवकर कंट्रोल होणे अवघड होऊन बसते. केसात कोंडा झाला की डोक्यात प्रचंड खाज येऊ लागते. चारचौघात असं खाजवणं अजिबात चांगलं दिसत नाही. याशिवाय केसात कोंडा असला, की गडद रंगाचे कपडे घालतानाही ४- ५ वेळा विचार करावा लागतो. 

 

केसात कोंडा असेल तर, वेगवेगळ्या हेअरस्टाईलसुद्धा करता येत नाहीत. कोंड्याचा काही भाग कपाळावर, चेहऱ्यावर उडतो. त्यामुळे मग चेहऱ्यावर खांद्यावर, मानेवर, पाठीवर फोड येण्याचे प्रमाणही वाढू लागते. म्हणूनच कोंडा वेळीच कंट्रोल करणे खूप आवश्यक आहे. तुम्हीही कोंड्याच्या समस्येने हैराण असाल, तर हे काही उपाय घरच्याघरी नक्की करून बघा.

 

१. कडुलिंबाचे पाणीहा उपाय करून पाहण्यासाठी कडुलिंबाची ४० ते ५० पाने घ्या आणि एक ते दिड लीटर पाण्यात ती चांगली उकळू द्या. १० ते १५ मिनिटे पाणी खळखळ उकळल्यानंतर गॅस बंद करा. पातेल्यावर झाकण ठेवा. रात्रभर ही पाने अशीच पाण्यात भिजू द्यावीत आणि सकाळी या पाण्याने केस धुवावेत. कडुलिंब हे कोणत्याही बुरशीवर प्रभावी ठरत असल्याने काेंड्याची समस्या देखील या उपायाने कमी होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करावा.

 

२. कडुलिंबाचा हेअर मास्ककडुलिंबाचा हेअर मास्क बनविण्यासाठी एक लीटर पाणी घ्या. या पाण्यात कडुलिंबाची ४० ते ५० पाने टाका. ही पाने पाण्यात चांगली उकळवून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि पातेल्यावर झाकण ठेवून पाने रात्रभर भिजू द्या. सकाळी पाने मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याची पेस्ट करा. या पेस्टमध्ये १ टेबलस्पून मध टाकावा. आता हा हेअर मास्क व्यवस्थित हलवून घ्यावा आणि केसांच्या मुळांशी लावावा. अर्ध्या तासाने गरम पाण्याने केस धुवून टाकावेत. केस धुताना आपण जे पाणी कडुलिंबाची पाने उकळवण्यासाठी वापरले होते, त्या पाण्याने केस ओले करावेत आणि नंतर पुन्हा चांगल्या पाण्याने केस धुवावेत. 

 

३. कडुलिंब आणि खोबरेल तेलअर्धाकप खोबरेल तेलात १०- १५ कडुलिंबाची पाने टाकावीत आणि तेल गरम करून घ्यावे. तेल जेव्हा उकळायला सुरूवात होईल, तेव्हा गॅस बंद करावा. तेल जेव्हा थंड होईल, तेव्हा त्यात एक टेबल स्पून लिंबाचा रस टाकावा. हे तेल एका बाटलीत भरून ठेवावे आणि आठवड्यातून दोनदा या तेलाने डोक्याच्या त्वचेची हलक्या हाताने मालिश करावी. रात्री तेल लावून ठेवावे आणि सकाळी केस धुवून टाकावेत.

 

४. ग्रीन टीएक ग्लास गरम पाण्यात ग्रीन टी च्या दोन बॅग एक तास बुडवून ठेवाव्या. एका तासाने हे पाणी केसांच्या मुळाशी लावावे. अर्ध्या तासाने केस धुवून टकावेत. आठवड्यातून दोन हा उपाय केल्यास दोन- तीन आठवड्यातच कोंडा गायब होईल.

 

५. संत्र्यांची साले आणि लिंबाचा रसपुर्वी शिकेकाईने केस धुतले जायचे. शिकेकाईची पावडर बनविताना त्यात संत्र्यांची वाळलेली साले टाकतात. कारण संत्र्याच्या सालांमध्ये केसांचे पोषण करणारे व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे केसांना कोंडामुक्त करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. यासाठी साधारण दोन संत्र्यांची साले दोन तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर सालं मिक्सरमधे टाकून वाटून घ्या. यामध्ये एक टेबलस्पून लिंबाचा रस टाका. हा हेअर स्काल्प केसांच्या मुळाशी लावा. एखाद्या तासाने केस धुवून टाका. यामुळे कोंडा तर जाईलच पण केसांची वाढही चांगली होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी