Join us  

आता घरीच बनवा गुलाब आणि कडूनिंबाचं टोनर! विकतचं टोनर विसराल इतका उत्तम इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 7:29 PM

टोनर हे मेडिकल स्टोअरमधे किंवा कॉस्मेटिक्सच्या दुकानातच मिळतात असं नाही. ते आपण घरी देखील करु शकतो. सौंदर्य तज्ज्ञांच्या मते गुलाब पाणी, कडुलिंबाची पानं यांचा वापर करुन तयार केलेले घरगुती टोनर त्वचेसाठी सुरक्षित आणि प्रभावी असतात.

ठळक मुद्देत्वचा तेलकट असेल तर त्वचेवरील तेल नियंत्रित करण्यासाठी टोनरची गरज असतेच.गुलाब पाण्याच्या टोनरनं त्वचेवरील मुरुम पुटकुळ्यांचे डाग निघून जातात आणि त्वचा स्वच्छ होते.कडुलिंबाच्या टोनरनं चेहर्‍यावर मुरुम पुटकुळ्या येत नाहीत.

 चेहर्‍यावर मुरुम पुटकुळ्या आल्यानं त्वचेचं खूप नुकसान होतं. त्वचेवर तेल जास्त प्रमाणात तयार व्हायला लागलं की मुरुम पुटकुळ्या होतातच. पण ही समस्या तेवढ्यापुरती राहात नाही. मुरुम पुटकुळ्या गेल्यानंतर चेहेर्‍यावर त्याचे डाग कायमस्वरुपी राहातात. हे डाग घालवण्याचा उत्तम उपाय आपण घरीच तयार करु शकतो. हा उपाय म्हणजे टोनर. टोनर हे मेडिकल स्टोअरमधे किंवा कॉस्मेटिक्सच्या दुकानातच मिळतात असं नाही. ते आपण घरी देखील करु शकतो. सौंदर्य तज्ज्ञांच्या मते गुलाब पाणी, कडुलिंबाची पानं यांचा वापर करुन तयार केलेले घरगुती टोनर त्वचेसाठी सुरक्षित आणि प्रभावी असतात.

टोनर वापरणं का महत्त्वाचं? 

त्वचा तेलकट असेल तर त्वचेवरील तेल नियंत्रित करण्यासाठी टोनरची गरज असतेच. टोनर हे प्रामुख्यानं त्वचा स्वच्छ करते. त्वचेवरील रंध्रं जे उघडे राहिल्याने त्यात धूळ, माती जाऊन मुरुम पुटकुळ्या होण्याचा संभव असतो. ही रंध्र टोनरच्या वापरानं आक्रसतात. टोनर वापरल्यानं त्वचा सुंदर आणि स्वच्छ होते.

गुलाब पाण्याचं टोनर

गुलाब पाण्याचं टोनर करण्यासाठी गुलाब पाण्यात अर्धा चमचा ग्लिसरीन घालावं. हे गुलाब पाण्याचं टोनर किमान 15 दिवस टिकवून ठेवण्यासाठी त्यात अर्धा चमचा अँपल सायडर व्हिनेगर घालावं. हे टोनर दिवसातून 3 ते 4 वेळेस वापरावं. चेहरा धुतला की आधी कापसाच्या बोळ्यानं किंवा स्प्रेचा वापर करत टोनर चेहर्‍यावर लावावं. ते दोन मिनिटात त्वचेत शोषलं जातं. मग त्यावर मॉश्चरायझर आणि इतर क्रीम लावावं.

कडुलिंबाचं टोनर

कडुलिंबाचं टोनर तयार करण्यासाठी कुडुलिंबाची 20 -25 पानं घ्यावीत. ती पाण्यात उकळावीत. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करावा. हे पाणी गार झालं की स्प्रे बॉटलमधे भरुन ठेवावं. हे टोनर 15 दिवस टिकू शकतं . यासाठी त्यात अर्धा चमचा अँपल सायडर व्हिनेगर घालावं. हे टोनर चेहर्‍यावरील मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी महत्त्वाचं असतं. दिवसातून 3 ते 4 वेळा चेहरा धुतल्यानंतर कडुलिंबाचं टोनर चेहर्‍यास लावलं तर फायदा होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्स