Join us  

साडीत जाड दिसता म्हणून नेसणे टाळता? दंड जाड दिसू नयेत म्हणून ब्लाऊज शिवताना लक्षात ठेवा या ६ टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2021 4:30 PM

छाती, खांदे आणि दंडाचा भाग मोठा असल्यावर अनेक महिला बुजल्यासारख्या वागतात. पण असे करण्याची काहीच गरज नाही, तुम्ही साडीवरचे ब्लाऊज शिवताना थोडी काळजी घेतली तर ही अडचण नक्की दूर होऊ शकेल.

ठळक मुद्देहटके ब्लाऊज शिवा आणि साडीतही दिसा बारीक...जाड आणि बुटके आहात म्हणून साडी टाळत असाल तर वाचा या खास टिप्स...

साडी नेसायला अनेकींना आवडते, दिवाळीसारख्या सणाला तर साडीत महिला शोभून दिसतात. साडीमध्ये बाईचे खरे सौंदर्य खुलून येते असेही आपण अनेकदा ऐकतो. पण आपण थोडे जाड असलो आणि त्यातही उंची कमी असेल की आपल्याला साडी चांगली दिसत नाही असे आपण म्हणतो. जाड असून साडी नेसली की आपण काकूबाई दिसतो असेही अनेकींना वाटते. त्यामुळे साडी नेसणे टाळले जाते. ब्लाऊजमध्ये दंड जाड दिसतात, छातीचा भाग मोठा असल्यामुळे साडीत आपण मोठे दिसतो असे वाटल्याने साडीला अनेकींकडून फाटा दिला जातो. मग कोणत्या प्रकारची साडी नेसल्यावर आपण बारीक दिसू, ती चोपून नेसली जायला हवी, त्यासाठी कोणत्या प्रकारचा ब्लाऊज निवडायचा अशा एक ना अनेक शंका महिलावर्गाला असतात. चला तर मग आज आपण पाहूयात ब्लाऊजचे असे प्रकार ज्यामध्ये तुमचे दंड फारसे जाड दिसत नाहीत आणि छातीचा भागही मोठा असल्याचे जाणवत नाही. म्हणजे काय तर तुम्ही नकळतच साडी नेसूनही बारीक दिसू शकता. 

१. स्लिव्हज आणि कापड - तुमचे हात, खांदे आणि शरीराचा वरचा भाग जाड आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फुल स्लिव्हजचे ब्लाऊज शिवू शकता. त्यामुळे तुमचे हात लांब दिसतील आणि नकळत ते बारीकही दिसतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या साडीवर तुम्ही अशाप्रकारचे ब्लाऊज शिवू शकता. पण हात दुमडायला यामुळे काही वेळा अडचण वाटू शकते. त्यामुळे पूर्ण दिवसासाठी साडी नेसायची असेल आणि फूल स्लिव्हज ब्लाऊज करायचे असेल तर तुम्ही स्ट्रेचेबल मटेरियल वापरु शकता. किंवा ब्लाऊज म्हणून तुम्ही क्रॉप टॉपचाही तुम्ही वापर करु शकता. तसेच तुम्हाला अगदी पूर्ण बाह्यांचे नको असेल तर थ्री फोर्थ स्लिव्हजचे ब्लाऊजही तुम्ही शिवू शकता. यानंतर दंडापर्यंत मोठ्या बाह्यांचे ब्लाऊजही छान दिसतात. हल्ली त्याची फॅसनही असून यामध्येही तुम्ही काही प्रमाणात बारीक दिसू शकता. 

२. लहान बाह्या आवडत असतील तर - अनेकदा आपल्याला साडी नेसायची असते, त्यात आपण जाड दिसतो असेही वाटत असते. मोठ्या बाह्यांचे ब्लाऊज म्हणावे तितके आवडत नाहीत. अशावेळी आपल्याला लहान बाह्यांचे ब्लाऊजच घालायचे असतात किंवा त्याला पर्याय नसतो. अशावेळी तुमचे हात काहीसे लहान दिसून तुमची जाडी यामध्ये जास्त दिसू शकते, लहान बाह्यांमुळे शरीराच्या इतर भागाकडे लक्ष जाते. त्यामुळे शक्यतो लहान बाह्या टाळलेल्याच बऱ्या पण घालायचेच असल्यास हे ब्लाऊज जास्त फिटींगचे असू नये. ते थोडे लूज ठेवल्यास तुम्ही कमी जाड दिसाल. तसेच लहान बाह्यांचे ब्लाऊज करायचे असल्यास ज्या रंगाची साडी आहे त्याच रंगाचे ब्लाऊज घ्या. ते प्लेन असेल तर आणखी चांगले, कारण डिझाईनमुळे आपण थोडे जास्त जाड वाटू शकतो. 

३. स्लिव्हजलेस ब्लाऊजविषयी - जाड महिलांना स्लिव्हजलेस ब्लाऊज चांगले दिसत नाही असे म्हणतात, कारण त्यामध्ये त्या आणखी जाड दिसण्याची शक्यता असते. पण तुम्हाला स्लिव्हजलेस ब्लाऊज वापरायला आवडत असेल तर त्याच्या स्ट्रीप खांद्यापर्यंत असाव्यात त्या जास्त लहान असल्या तर शरीराचा जास्त भाग दिसतो आणि आपण आहोत त्यापेक्षा आणखी जास्त जाड दिसतो. त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही स्लिव्हजलेस ब्लाऊज घालू शकता फक्त ते शिवताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच छातीच्या बाजुचे फिटींग हे खूप घट्ट न ठेवता ते सरळ ठेवल्यास तुमची जाडी काही प्रमाणात लपली जाऊ शकते. तसेच हे ब्लाऊज उंचीलाही थोडे जास्त असेल तरी चांगले वाटते. 

४. गळ्याचा पॅटर्न - तुम्ही साडीमध्ये जाड दिसता असे वाटत असेल तर ब्लाऊजच्या गळ्यांच्या काही ठराविक डिझाइन करा. त्यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा थोड्या प्रमाणात तरी बारीक दिसायला मदत होईल. यामध्ये गळ्यांना वेगवेगळ्या डिझाइन न देता साधा गोल, चौकोनी, व्ही गळा ठेवल्यास चांगले वाटू शकते. गळ्याची डिझाइन जितकी साधी ठेवाल तेवढे बारीक दिसाल. बंद गळ्यांचे ब्लाऊज आवडत असतील तर तशाप्रकारचा पॅटर्नही तुम्ही वापरु शकता. मात्र तुमचा गळा लहान असेल तर अशाप्रकारचे गळे शिवू नका. गळा थोडा उंच असेल तर असे शिवायला हरकत नाही. 

( Image : Google)

५. ब्लाऊजचे डिझाइन - अनेकदा आपण ब्लाऊजला वेगवेगळ्या प्रकारच्या लेस, कुंदन, वर्क, लटकन असे लावून सजवायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला बारीक दिसायचे असेल तर या सगळ्या गोष्टी टाळा. या सगळ्या गोष्टी ब्लाऊजला असतील तर ब्लाऊजकडे आणि त्यामुळे साहजिकच वरच्या भागाकडे जास्त लक्ष जाते. पण हे जर तुम्ही जास्तीत जास्त साधे ठेवले तर त्याकडे तितके लक्ष जाणार नाही. 

६. प्रिंटेड ब्लाऊज - बारीक दिसण्यासाठी प्लेन ब्लाऊज वापरलेले केव्हाही चांगले असे आपण म्हणत असलो तरी तुमची साडी प्लेन असेल आणि त्यावर प्रिंटेड ब्लाऊज घालणे गरजेचे असेल तर हरकत नाही. तुम्ही प्रिंटेड ब्लाऊज नक्की घालू शकता पण हे प्रिंट खूप जाड नसावे. ते बारीक असलेले चांगले. पोलका डॉटस, लहान फुल्यापानांचे डिझाइन घालू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशन