Join us  

मऊमऊ त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी करा खास सुगंधी स्नान; उन्हाळ्यात करा स्वत:ला पॅम्पर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 5:15 PM

सुगंधी तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून आंघोळ केल्यास शरीराला केवळ बाह्यस्वरुपात लाभ मिळतात असं नाही . तर अनेक आरोग्यविषयक तक्रारी कमी होतात. लव्हेण्डर, जिरेनिअम, पेपरमिंट, ऑरेंज आणि सॅण्डलवूड ही निवडक सुगंधी तेलं आहेत जी आंघोळीच्या पाण्यात घालून वापरल्यास त्याचा शरीर आणि मनाला लाभ होतो.

ठळक मुद्देआंघोळीच्या पाण्यात घालून वापरण्यासाठी लव्हेण्डर हे उत्तम इसेंन्शिअल ऑइल मानलं जातं.पेपरमिंटमधे शीत गुणधर्म  असल्यानं या तेलाचा उपयोग उन्हाळ्यात अतिशय लाभदायी ठरतो.उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड राखण्यास आणि उन्हानं उद्भवणारे मुरुम- पुटकुळ्या, सुरकुत्यांसारखे त्वचाविकार चंदन तेलाचा आंघोळीच्या वेळेस उपयोग केल्यास टाळले जातात.

उन्हाळ्यातल्या समस्येविषयी अनेकदा बोललं जातं. जसं उन्हाळ्यात खूप घाम येतो, त्वचेच्या अनेक तक्रारी डोकं वर काढतात, झोप नीट लागत नाही, चिडचिड होते आणि बरंच काही. उन्हाळा म्हटलं तर हे होणारंच. पण या समस्या सोडवण्यासाठी जर काम केलं तर उन्हाळ्याचा आनंदही घेता येतो. सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळीच्या वेळेस काही सुगंधी उपचार केलेत तर उन्हाळ्यातल्या वातावरणाचा आनंद घेता येतो. यासाठी इसेन्शिअल ऑइल्सची अर्थात सुगंधी तेलांची मदत घेता येते. सुगंधी तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून आंघोळ केल्यास शरीराला केवळ बाह्यस्वरुपात लाभ मिळतात असं नाही . तर अनेक आरोग्यविषयक तक्रारी कमी होतात, त्वचेतले विषारी घटक बाहेर पडतात , रक्ताभिसरण सुधारतं, शरीराचा दाह कमी होतो,, आजारातून उठल्यावर मनाला उभारी मिळते तसेच मनावरचा ताण निवळून छान आरामदायक वाटतं.मात्र सर्वच सुगंधी तेल आंघोळीच्या पाण्यात घालून वापरण्यासारखे नसतात. लव्हेण्डर, जिरेनिअम, पेपरमिंट, ऑरेंज आणि सॅण्डलवूड ही निवडक सुगंधी तेलं आहेत जी आंघोळीच्या पाण्यात घालून वापरल्यास त्याचा शरीर आणि मनाला लाभ होतो.

 

लवेण्डर इसेंन्शिअल ऑइलआंघोळीच्या पाण्यात घालून वापरण्यासाठी लव्हेण्डर हे उत्तम इसेंन्शिअल ऑइल मानलं जातं. शरीर आणि मनाला सुखदायक आणि शांततेचा अनुभव देण्यासाठी याचा उपयोग होतो. मनावरचा ताण, मनातली निराशा घालवण्यासाठी, रात्री उत्तम झोप लागण्यासाठी हे तेल परिणामकारक आहे. संध्याकाळी आंघोळ करण्याची सवय असेल तर रात्री उत्तम झोप लागण्यासाठी लव्हेण्डर तेल हा उत्तम पर्याय आहे.

जिरेनिअम इसेंन्शिअल ऑइलजिरेनिअम नावाच्या एका तांबड्या/ पांढऱ्या फुलापासून हे ऑइल तयार केलं जातं. ते पामूख्यानं गूलाबाच्या इसेंन्शिअल ऑइलसोबत वापरलं जातं. पण केवळ जिरेनिअम इसेंन्शिअल ऑइल वापरलं तरी ते प्रभावी ठरतं. हे तेल ताण - तणाव घालवतं. त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर आहे. जिरेनिअम इसेंन्शिअल ऑइलचे काही थेंब पाण्यात घालून आंघोळ केल्यास त्वचा सूरकूतलेली असल्यास ती मऊ होते. उन्हाळ्यात या तेलाच्या उपयोगानं कोरडी आणि तेलकट त्वचेचा समतोल साधला जातो. मुरुम , पुटकुळ्या, ब्लॅकहेडस सारख्या त्वचेच्या समस्याही तेलाच्या वापरानं जातात.

पेपरमिंट इसेंन्शिअल ऑइल

पेपरमिंटमधे शीत गुणधर्म  असल्यानं या तेलाचा उपयोग उन्हाळ्यात अतिशय लाभदायी ठरतो. पेपरमिंट इसेंंन्शिअल ऑइलचे काही थेंब आंघोळीच्या पाण्यात टाकून त्यानं आंघोळ केल्यास रक्ताभिसरण सुधारतं. ताजंतवानं वाटतं. मनाला उत्तेजन मिळतं. दिवसाची सुरुवात ताजीतवानी करण्यासाठी हे तेल सकाळी आंघोळीच्या वेळेस वापरावं. आजारपणातही पेपरमिंट तेलाचा उपयोग केल्यास तापाची लक्षणं कमी होतात. मनाला छान उभारी मिळते.

ऑरेंज इसेंंन्शिअल ऑइल

आंघोळीसाठी वापरण्यास उपयूक्त असलेलं हे आणखी एक महत्त्वाचं सुगंधी तेल. या तेलाच्या वापरानं अगदी ताजतवानं वाटतं. मूड सुधारतो. ताण कमी होतो. या तेलामधे क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. म्हणूनच या तेलाचा वापर आंघोळीच्या वेळेस केल्यास त्याचा त्वचेलाही फायदा होतो. फक्त स्वीमींगला जाण्याआधी या तेलाचा वापर टाळावा. कारण हे तेल प्रकाशाला खूपच संवेदनक्षम असतं.

सॅण्डलवूड इसेंन्शिअल ऑइल

त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी चंदनाचा उपयोग करण्याला प्राचीन परंपरा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड राखण्यास आणि उन्हानं उद्भवणारे मुरुम पुटकुळ्या, सुरकुत्यांसारखे त्वचाविकार या तेलाचा आंघोळीच्या वेळेस उपयोग केल्यास टाळले जातात. दिवसभर कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच शांत राहाण्यासाठीही चंदनाचं तेल फायदेशीर ठरतं. उन्हाळ्याच्या काळात आंघोळीसाठी या तेलाचा उपयोग प्रामुख्यानं केला जातो.उन्हाळ्यात सुगंधी तेलांचा उपयोग हा त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले आहेत. पण तरीही उपयोग करण्याआधी डॉक्टरांशी, सौंदर्यतज्ज्ञांशी चर्चा आणि सल्ला मसलत करणं गरजेचं आहे. त्वचेसंबंधी किंवा आरोग्यासंबंधी व्यक्तीविशिष्ट काही समस्या असल्यास असा सल्ला घेणं केव्हाही सुरक्षित बाब ठरते.