Join us  

हेअर डाय केल्यानंतर 6 चुका करणं पडतं महागात, केसांचे हाल भयानक अवतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 6:38 PM

चुकीच्या पध्दतीने डाय वापरणं, हलक्या प्रतीचा डाय केसांना लावणं यामुळे केस खराब होतात. तसेच डाय केल्यानंतर काही चुका झाल्या तर डाय पांढरे केस काळे करण्यास परिणामकारक ठरत नाही आणि केसांचंही नुकसान होतं. या चुका कोणत्या?

ठळक मुद्देकेस डाय केल्यानंतर केस लगेचंच शाम्पूनं धुतले की केसांवरील डायचा प्रभाव कमी होतो. डाय धुतांना गरम पाणी वापरल्यास केस कमजोर होतात. हेअर एक्सपर्ट म्हणतात, की एकदा डाय लावल्यानंतर 6 आठवड्यानंतरच पुन्हा केसांना डाय लावावं त्याआधी नाही. 

हल्ली केस पांढरे होण्यासाठी वय होण्याची वाट पाहावी लागत नाही. अगदी तरुणपणातही केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यासाठी अनुवांशिकता, खाण्या पिण्याच्या बाबतीत होणाऱ्या चुका, पोषणाची कमतरता, चुकीच्या सवयी आणि विशिष्ट आजार कारणीभूत ठरतात.  कारण कोणतंही असो, पांढरे केस वय झालेल्या लोकांनाही आवडत नाही तर तरुण वयातल्या मुला मुलींना, चाळीशीही पार न केलेल्या स्त्रियांना कसं बरं आवडेल? पांढरे केस लपवण्यासाठी केसांना मेहंदी लावणं, केस डाय करणं किंवा कलर करणं असे उपाय केले जातात. त्यातही मेहंदी लावणं म्हणजे वेळखाऊ आणि किचकट काम. म्हणून पांढरे केस काळे दिसण्यासाठी डायचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. 

Image: Google

क्रीम डाय, पावडर डाय, शाम्पू डाय असे डायचे विविध प्रकार आहेत. डाय केल्यानं किमान महिनाभर तरी पांढरे केस वर डोकावत नाही म्हणून डाय वापरला जातो. चुकीच्या पध्दतीने डाय वापरणं, हलक्या प्रतीचा डाय केसांना लावणं यामुळे केस खराब होतात. तसेच डाय केल्यानंतर काही चुका झाल्या तर डाय पांढरे केस काळे करण्यास परिणामकारक ठरत नाही आणि केसांचंही नुकसान होतं. डाय केल्यानंतर प्रामुख्याने 6 चुका अनभिज्ञतेने होतात. या चुका टाळल्यास केसांवर डाय व्यवस्थित राहातो आणि केसही खराब होत नाही असं हेअर एक्सपर्ट सांगतात.  या चुका कोणत्या?

Image: Google

हेअर डाय केल्यानंतर 5 चुका टाळाच!

1.  केसांना डाय लावल्यानंतर ते सांगितलेल्या वेळेतच धुवायला हवेत.निर्धारित वेळेपेक्षा केसांवर डाय राहिल्यास केस आणि टाळुची त्वचा खराब होते. 

2. केस डाय केल्यानंतर केस लगेचंच शाम्पूनं धुतले की केसांवरील डायचा प्रभाव कमी होतो. डाय धुतांनाच शाम्पू लावला तर केसांवर डाय जास्त काळ टिकत नाही. डाय टिकण्यासाठी आणि पुढे केस सुरक्षित राहाण्यासाठी हेअर एक्सपर्ट डाय केवळ साध्या पाण्यानं धुण्याचा सल्ला देतात. डाय लावून किमान तीन दिवस झाल्यावर केस शाम्पुनं धुवावेत. केसांना मेहंदी लावण्यासारखे नैसर्गिक उपाय केल्यास केसांना तीन दिवसांच्या आतच शाम्पू लावणं चुकीचं ठरतं. 

3.  डाय धुताना जर गरम पाण्यानं धुतले तर केस खराब होतात. कारण डायमधे रासायनिक घटक असतात. यामुळे डाय लावल्यानंतर केस संवेदनशिल होतात. त्यामुळे डाय धुतांना गरम पाणी वापरल्यास केस कमजोर होतात. टाळुची त्वचा कोरडी होते. त्यामुळे डाय केल्यावर अनेकांना डोकं खाजण्याची समस्या निर्माण होते, ती डाय धुतांना गरम पाणी वापरल्यानेच. तसेच गरम पाण्यामुळे डायचा प्रभाव कमी होतो. केस जास्त दिवस काळे राहात नाही. हेअर एक्सपर्ट म्हणतात, की डाय केल्यावर ते धुतांना साधं पाणी वापरावं. ते नको असेल तर कोमट पाणी वापरावं, पण गरम पाणी चुकूनही वापरु नये. 

Image: Google

4. डाय केलेले केस डायमधील रासायनिक घटकांमुळे संवेदशिल झालेले असतात. त्यामुळे हेअर एक्सपर्ट म्हणतात, की केसांचं नुकसान टाळायचं असेल तर डाय केलेल्या केसांवर कधीही ब्लो डायर, हेअर स्ट्रेटनर किंवा केस कुरळे करण्याचं मशीन वापरु नये. यामुळे केस तुटतात आणि गळतातही.

5. हेअर डाय लावला, तो सांगितला तितका वेळ ठेवला आणि झाले केस काळे असं होत नाही.  केसांवर डाय चढण्याची एक प्रक्रिया असते.  ती डाय लावल्यानंतर काही काळ सुरु राहाते. त्यामुळे डाय लावून केस धुतल्यानंतर लगेच प्रखर उन्हात जाणं टाळावं. आणि त्यानंतरही डोक्याला स्कार्फ बांधूनच बाहेर पडावं. प्रखर उन्हामुळे डायचा केसांवरील प्रभाव कमी होतो.

6. हेअर डाय दिलेल्या मुदतीनंतरच केसांना पुन्हा लावावं. त्याआधी केसांना लावल्यास डायमधील रासायनिक घटकांमुळे केसांचं , केसांच्या मुळांचं आणि टाळुच्या त्वचेचं नुकसान होतं. हेअर एक्सपर्ट म्हणतात, की एकदा डाय लावल्यानंतर 6 आठवड्यानंतरच पुन्हा केसांना डाय लावावं त्याआधी नाही. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी