Join us  

एकाच रंगाच्या ६ लिपस्टिक्स ?- असं होतं ना तुमचंही मग त्यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 2:26 PM

आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये इतक्या अडकतो की तेच ते करतो, आणि तिथेच फसतो 

ठळक मुद्दे“तुझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर ये जरा!

गौरी पटवर्धन

सुंदर दिसण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट. आपल्याला आतून स्वतःबद्दल छान वाटणं. पण हे छान वाटणं येतं कशातून? तर मुख्यतः आत्मविश्वासातून. आणि आत्मविश्वास कशातून? येतो? तर स्वतःला स्वतःबद्दल छान वाटण्यातून! आता हे कोंबडी आधी की अंडं आधी याचं कोडं सोडवायचं कसं? ते कधी सुटू शकतं का? तर ते नक्कीच सुटू शकतं. आणि त्याचं उत्तर अंडंही नाही आणि कोंबडीही नाही. त्याचं उत्तर आहे ते म्हणजे कम्फर्ट!जे कपडे, दागिने, मेकअप, इतर ऍक्सेसरीज, शूज आपल्याला कम्फर्टेबल वाटतात त्याने आपला कॉन्फिडन्स वाढतो. जे कपडे आपल्यालाच घालायला कम्फर्टेबल वाटत नाहीत त्यांनी आपल्याला कॉन्फिडन्ट वाटत नाही. उदाहरणार्थ, आपण समजा लो नेक असलेला फिटिंगचा टॉप घातला असेल तर? आपल्याला जर का तो कम्फर्टेबल वाटत असेल तर गोष्ट वेगळी. आपल्याला जर का तो कम्फर्टेबल वाटला तर आपण तो अक्षरशः फ्लॉन्ट करू शकतो. पण आपल्याला जर का असं वाटलं, की हा जरा जास्तच घट्ट आहे, अंगाला काचतो आहे, याचा गळा जरा जास्तच खोल आहे… तर?

तर आपण तो टॉप घातल्यावर पूर्ण वेळ तो कसा दिसतोय याबद्दल कॉन्शस असतो. तो मागून वर जातोय का? सॅंडल काढायला थोडं वाकताना काही दिसतंय का? असे प्रश्न सतत मनात येत राहतात. मग आपण अर्थातच कॉन्शस होतं. आपल्याही नकळत आपण तो टॉप बाजूने थोडासा ओढतो. थोडा खाली ओढतो. गळा थोडा वर ओढतो. आणि एकूणच तो टॉप घालून आपण अजिबातच कम्फर्टेबल नसतो.

जी गोष्ट कपड्यांची तीच गोष्ट मेकअपची. होतं काय, तर आपण दर काही दिवसांनी / महिन्यांनी लिपस्टिक आणतो. आपल्याला अतिशय आवडलेली, आपल्या स्किन टोनला सूट होणारी अशी लिपस्टिक आपण आणतो. केव्हातरी अशी आणलेली लिपस्टिक आपण घरी आलेल्या आपल्या बालपणीच्या मैत्रिणीला दाखवतो. आणि मग ती बोलायला जरा जास्तच स्पष्ट, प्रेमळ पण त्यातही दुष्ट असलेली मैत्रीण आपल्याच घरातला आपलाच ड्रॉवर उघडून आपल्याला ऑलमोस्ट एकाच रंगाच्या पाच लिपस्टिक काढून दाखवते. आपण तिला कौतुकाने दाखवलेली लिपस्टिक त्याच शेडची, वेगळ्या कंपनीची सहावी लिपस्टिक असते.

आपल्याला असं मुद्देमालासकट पकडल्यानंतर ती आपली लाडकी मैत्रीण आपली यथेच्छ शाळा घेते, “तुझं हे शाळेपासून बघते आहे मी. एक पॅटर्न आवडला की सगळे ड्रेस त्याच पॅटर्नचे. आठवतंय का? सेकंड इयरला पाच ड्रेसेस बँगल स्लीव्हचे शिवले होतेस तू. शेवटी दोन ड्रेसेस परत आल्टर करून थ्री फोर्थ स्लीव्ह्ज करून आणायला लागल्या होत्या.” तो किस्सा अर्थातच आपल्याला आठवत असतो. आणि तो आपल्याला आठवतोय हे आपल्या तोंडावर दिसतं. मग ती दुष्ट मैत्रीण पुढचा बाण काढते,

“तू अजूनही बदलली नाहीयेस. एकाच रंगाच्या ६ लिपस्टिक्स ? 

आपण त्या सहा रंगांच्या शेड्स मध्ये कसा फरक आहे असं केविलवाणं आर्ग्युमेंट करतो खरे, पण त्यात काही दम नाही हे आपल्यालाही नीट माहिती असतं. त्यामुळे ते आर्ग्युमेंट झुरळासारखं झटकून मैत्रीण आपल्याला ग्रुमिंगसाठी लाखमोलाचा सल्ला देते…

“तुझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर ये जरा!

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्स