Narayan Rane: भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही; नारायण राणे यांची न्यायालयात ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 11:18 IST
1 / 8अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 2 / 8न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर रात्री उशिरा पडदा पडला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जल्लोष केला. नाशिक आणि पुणे पोलिसांनीही राणे यांचा ताबा मागितला नाही. त्यामुळे राणेंना मोठा दिलासा मिळाला.3 / 8सोमवारी महाड येथे राणे यांनी ‘मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चढवली असती,’असे विधान केले होते. या विधानाबद्दल महाड, पुणे आणि नाशिक येथे राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यानंतर राणे यांना अटक केली जाणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. राणे यांच्या अनुद्गाराचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी राणे यांच्या पोस्टरला काळे फासणे, जोडे मारणे, पुतळा दहन यासारखी आंदोलने केली. भाजपची कार्यालये लक्ष्य करीत तोडफोड केली. 4 / 8 नारायण राणे यांना पावणे दहा वाजण्याच्या सुमारास महाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ५५ मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद चालला. त्यानंतर १५ हजारांच्या जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच, नारायण राणे यांनी भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही, अशी ग्वाही दिली.5 / 8 तसंच, महिन्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्याचे आदेश कोर्टाने नारायण राणे यांना दिले आहे. त्याचबरोबर, भविष्यात यापुढे असे वादग्रस्त विधान करणार नाही, अशी ग्वाही खुद्द नारायण राणे यांनी कोर्टात दिली आहे. त्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.6 / 8दरम्यान, पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते एक जबाबदार व्यक्ती आहेत. मग ते बेजबाबदारपणे कसे वागले, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. राणे यांनी केलेल्या वक्तव्यामागे कट आहे. त्यामुळे त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. 7 / 8मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा राजकीय गदारोळ, नेमका कोणाच्या पथ्यावर पडेल, हे आज सांगणे कठीण असले तरी, आमच्या खेळीमुळे शिवसेना मात्र एकत्र आली, हे वास्तव नाकारता येणार नाही.8 / 8मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची राडेबाजी झाली. सत्ता असूनही शिवसेनेत अस्वस्थता होती. मंत्री जुमानत नाहीत, कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशा भावना वाढीस लागल्या होत्या. त्याच वेळी हा सगळा प्रकार घडल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकत्र आले. याचा फायदा शिवसेनेलाच होईल, असे सांगितले जात आहे.