असं आहे 'मराठी भाषा भवन', मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 13:12 IST
1 / 8मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.2 / 8विशेष म्हणजे आज मराठी नववर्षाच्या पहिल्या दिनाच्या आणि गुढी पाडव्याच्या शुभ मुहू्र्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मुंबईत मराठी भाषा भवनच्या भूमीपूजन करण्यात आले. मंत्री सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित होते. 3 / 8मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा भवन मुख्य केंद्र” प्रस्तावित होते. त्यासाठी, चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव मांडले. यामध्ये प्रदर्शन दालन सभागृह, परिषद दालने, ग्रंथालय असे विभाग दर्शविण्यात आले. 4 / 8या प्रकल्पासाठी शासनाने 2500 चौ.मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे. त्यानंतर, कोविडवरील निर्बंध हटताच गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून आज बांधकामास सुरुवात करण्यात आली. 5 / 8अंदाजे 126 कोटी रुपये एवढा खर्च मराठी भाषा भवन उभारणीसाठी लागणार आहे. मुंबईच्या मे. पी.के. दास ॲन्ड असोसिएट्स यांची वास्तु विशारद म्हणून निवड करण्यात आली आहे.6 / 8हे स्थळ मरीन ड्राइव्हच्या समोर आहे आणि पश्चिमेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि पूर्वेला सावित्रीदेवी फुले महिला वसतीगृहाने वेढलेले आहे. जागेची लांबी अंदाजे 54 मीटर आणि रुंदी सरासरी 32 मीटर असेल.7 / 8मराठी भाषा भवन हे (G+7) तळमजला अधिक सात मजल्याचे असून त्यात तळघर देखील असेल. त्याची लांबी 39 मीटर आणि रुंदी सुमारे 22 मीटर असेल. संकल्पनेनुसार पहिल्या मजल्यावर एक खुले सार्वजनिक मंच असेल. इथे मरीन ड्राईव्हच्या लोकांना थेट प्रवेश करता येईल. मरीन ड्राईव्हपासून या मंचापर्यंत पायऱ्यांची मालिका जाईल.8 / 8मराठी भाषेचा इतिहास आणि तिच्या उत्क्रांतीचा प्रवास इथे बघता येणार आहे. या दर्शिकेतील प्रदर्शनात विशेष तयार केलेले चलचित्रपट, त्रिमितीय प्रतिमा (होलोग्राम्स) आणि छायाचित्रांच्या प्रती असतील.