शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:54 IST
1 / 7उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांची युती झाली. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. मुंबई महापालिका आणि इतर काही महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढताना दिसणार आहे.2 / 7उद्धवसेना आणि मनसे पहिल्यांदाच एकत्र लढत असल्याने दोन्ही पक्षाच्या ताकदीचीही चर्चा होत आहे. पक्षात फूट पडल्यानंतर उद्धवसेना पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरं जात आहे. तर राज ठाकरे यांच्या मनसेची महापालिका निवडणुकांमधील कामगिरी फारशी प्रभावी राहिलेली नाही.3 / 7२०१२ आणि २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगवेगळे लढले. यात उद्धवसेनेची कामगिरी चांगली राहिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत २०१२ च्या तुलनेत २०१७ मध्ये उद्धवसेनेने जास्त जागा जिंकल्या होत्या. तर मनसेची २०१२ च्या तुलनेत २०१७ कामगिरी आणखी घसरली.4 / 7मनसेने २०१२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये २८ जागा जिंकल्या होत्या. तर २०१७ मध्ये फक्त ७ जागा मनसेला जिंकता आल्या होत्या. दुसरीकडे उद्धवसेनेने २०१२ मध्ये ७५ जागा जिंकल्या होत्या, तर २०१७ मध्ये ८४ जागा जिंकल्या होत्या.5 / 7ठाणे महापालिकेत मनसेने २०१२ मध्ये ७ जागा जिंकल्या होत्या. तर २०१७ मध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. उद्धवसेनेने मात्र २०१२ मध्ये ५३ जागा जिंकल्या होत्या, तर २०१७ मध्ये ६७ जागा जिंकत गुलाल उधळला होता. कल्याण डोंबिवली महापालिकेतही मनसेला २०१२ मध्ये २७, तर २०१७ मध्ये ९ जागा मिळाल्या होत्या. उद्धवसेनेला २०१२ मध्ये ३१ जागा जिंकल्या होत्या, तर २०१७ मध्ये ५२ जागांवर विजय मिळवला होता.6 / 7नाशिक महापालिका निवडणुकीत २०१२ मध्ये मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले होते. २०१७ मध्ये मनसेला फक्त ५ जागा जिंकता आल्या. दुसरीकडे उद्धवसेनेने २०१२ मध्ये १९, तर २०१७ मध्ये ३५ जागा जिंकल्या होत्या. पुणे महापालिका निवडणुकीत मनसेचे २०१२ मध्ये २९ नगरसेवक जिंकून आले होते. २०१७ मध्ये फक्त २ जागा मनसेला जिंकता आल्या. उद्धवसेनेला २०१२ मध्ये १५ जागा मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये त्यात घसरण होऊन ती १०वर आली.7 / 7जळगाव महापालिकेत मनसेला २०१२ मध्ये १२ जागा मिळाल्या होत्या, तर २०१७ मध्ये एकही जागा मिळाली नव्हती. उद्धवसेनेला २०१२ मध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती, २०१७ मध्ये १३ जागा मिळाल्या. राज्यातील इतर महापालिकांमध्ये २०१२ मध्ये मनसेला १९ जागा मिळाल्या होत्या, २०१७ मध्ये फक्त ३ जागा जिंकल्या होत्या. उद्धवसेनेने २०१२ मध्ये २२० जागा, तर २०१७ मध्ये २०७ जागा जिंकल्या होत्या.